रेल्वेसेवा पूर्वपदावर येईपर्यंत 'शिवनेरी'च्या जादा फेऱ्या
मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरळीत होईपर्यंत शिवनेरी बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. दररोज नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त शिवनेरीच्या 32 जादा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी यासंदर्भात माहिती दिली.
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत ते लोणावळा दरम्यान रुळावर दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या पुढील काही दिवसांसाठी रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत.
शिवनेरीसह एसटी महामंडळाच्या साध्या बसही या मार्गावर धावतील. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी काही दिवसांसाठी बसचा मार्ग अवलंबावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास प्रवाशांना 15 ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे.