मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

उत्तर प्रदेश सरकारकडून हिंसाचाराची 'वसुली'; 67 दुकाने सील

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित जबाबदार लोकांकडून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. आता, या नुकसानीची वसुली सुरू झाली असून जवळपास 67 दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. या दुकान मालकांचा हिंसाचारात सहभाग असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  
 
उत्तर प्रदेशमध्ये सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात हिंसाचार उफाळला होता. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाच्या हिंसेत सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले होते.
 
प्रशासनाने मुझफ्फरनगरमधील 67 दुकानांना सील लावले आहे. लखनौ आणि संबळमध्ये अद्याप कारवाई सुरू झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुझफ्फरनगरमधील मिनाक्षी चौक आणि परिसरातील दुकानांना सील करण्यात आले आहे. या परिसरातील लोकांकडून हिंसाचार करण्यात आला असल्याची माहिती एसएसपी अभिषेक यादव यांनी दिली.
 
ही दुकाने आधीच बंद का होती आणि दुकानांजवळ जमाव का जमला होता याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सील करण्यात आलेले दुकानांचे मालक हिंसाचारात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.