मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (14:36 IST)

उत्तर प्रदेश : मुस्लीम रिक्षाचालकाला मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल, हे प्रकरण नेमकं काय आहे?

Uttar Pradesh: Video of beating of Muslim rickshaw puller goes viral
समीरात्मज मिश्र
कानपूरमध्ये एका मुस्लीम रिक्षाचालकाला झालेली मारहाण आणि त्याच्याकडून जबरदस्तीने 'जय श्रीराम' म्हणवून घेण्याच्या प्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे.
 
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओत काही लोक एका रिक्षाचालकाला मारहाण करताना दिसत आहेत. या दरम्यान ते लोक अहमद या रिक्षाचालकाला जबरदस्तीने 'जय श्रीराम'च्या घोषणा द्यायला लावत आहेत.
 
कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरूण यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, "कानपूरमधल्या थाना बर्रा भागात असरार अहमद यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी तीन लोकांना अटक केली आहे. अटक झालेल्यांची नावं अजय उर्फ राजेश बँडवाला, अमन गुप्ता आणि राहुल कुमार अशी आहेत. इतर आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न चालू आहेत."
 
काय आहे प्रकरण?
व्हायरल झालेल्या व्हीडिओत सात वर्षांची लहान मुलगी आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी गयावया करताना दिसतेय. व्हीडिओत असंही दिसतंय की मारहाणीनंतर काही पोलीस त्या रिक्षाचालकाला जीपमध्ये घालून नेत आहेत. पण जेव्हा अहमदला मारहाण होत होती तेव्हा पोलीस तिथे उपस्थित होते हेही दिसतंय.
 
या घटनेसाठी आणखी एक घटना कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जातंय. बर्रा - 8 मध्ये राहाणाऱ्या एका कुटुंबातल्या अल्पवयीन मुलीची काही लोकांनी कथितरित्या छेड काढली होती. कुटुंबातल्या लोकांनी याचा विरोध केल्यानंतर आरोपींनी धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला असंही म्हटलं जातंय. पीडित कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली पण त्यांची तक्रार दाखल करून घेतली गेली नाही.
 
31 जुलैला भाजपचे स्थानिक आमदार महेश त्रिवेदी यांनीं हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेतली. या तक्रारीवरून तीन सख्खे भाऊ सद्दाम, सलमान आणि मुकुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
 
मुलीच्या आईने बीबीसीला सांगितलं की, "आमच्या चौदा वर्षांच्या मुलीला हे लोक रोज छेडायचे. तक्रार केली तर मारहाण करण्याची धमकी द्यायचे. धर्मांतरासाठी दबाब टाकायचे. आम्ही आमच्या तक्रारीत धर्मांतराबद्दलही सांगितलं होतं पण पोलिसांनी फक्त विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे."
 
या घटनेबदद्ल कळताच बजरंग दलाचे काही कार्यकर्ते बुधवारी, 11 ऑगस्टला आरोपींच्या घरी गेले. तिथे आरोपी न सापडल्यामुळे त्यांचे एक नातेवाईक असरार अहमद यांना बाहेर ओढून आणलं आणि सार्वजनिकरित्या मारहाण करायला लागले. पोलीस हे सगळं घडत असताना मुकदर्शक बनून राहिले असाही आरोप केला जातोय.
 
दरम्यान, दोन समाजांत तणाव वाढू नये म्हणून या भागात पोलीसांची संख्या वाढवली गेली आहे.
 
कानपुर दक्षिणच्या डीसीपी रवीना त्यागी यांनी माध्यमांना सांगितलं की, "12 जुलैला छेडछाड आणि धर्मांतराचा दबाव टाकणाऱ्या आरोपीची पत्नी कुरैश बेगम हिने धर्मांतराचा आरोप करणारी महिला आणि तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर दुसऱ्या पक्षाने 31 जुलैला सद्दाम, सलमान आणि मुकुल या तीन भावांविरोधात गुन्हा दाखल केला. बर्रा पोलीस दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत."
असरार अहमदला मारहाण करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार महेश त्रिवेदेही होते असा आरोप केला जातोय. पण पोलिसांनी आधी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. पण या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन लोकांना अटक केली.
 
दुसरीकडे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक दिलीप सिंह बजरंगी यांनी पोलिसांवर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप लावला आहे. त्यांनी म्हटलं की, 'जर पोलिसांनी न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या मुलीबाळींवर अत्याचार होताना पाहू शकत नाही.'
 
तर या मारहाणी प्रकरणी झालेल्या अटकेच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त असीम अरूण यांच्या घराबाहेर निदर्शनं केली.