मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (13:51 IST)

विनायक सावरकर - नथुराम गोडसे यांच्यात गुरू-शिष्याचं नातं होतं का?

रोहन नामजोशी
काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाचं 10 दिवसीय निवासी शिबिर सुरू असताना शिबिरार्थींना विविध नेते, महापुरुषांबद्दलच्या माहितीपर पुस्तिका वाटण्यात आल्या. यातली एक पुस्तिका सावरकरांवरही लिहिण्यात आली होती - 'वीर सावरकर कितने 'वीर'?'.
 
त्यात महात्मा गांधीची हत्या करणारे नथुराम गोडसे आणि वि. दा. सावरकर यांच्यात शारीरिक संबंध असल्याचा खळबळजनक उल्लेख करण्यात आला आहे.
 
'ब्रह्मचर्य स्वीकारण्यापूर्वी नथुराम यांचे राजकीय गुरू वीर सावरकर यांच्याशी शारीरिक संबंध होते,' या असं या पुस्तिकेत म्हटलं गेलं आहे. यासाठी लॅरी कॉलिंस आणि डोमॅनिक लॅपिएर यांच्या 'फ्रीडम अॅट मिडनाईट' पुस्तकातल्या पृष्ठ क्रमांक 423चा संदर्भ देण्यात आला होता.
 
यावरून काँग्रेस विरुद्ध भाजप असा नवा संघर्ष नव्याने उफाळून आला. तर सावरकरांच्या कुटुंबीयांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.
 
सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे उद्धव ठाकरेंना यासंबंधी भेटायला गेले असता, वारंवार विनंत्या करूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिली नाही. हा सावरकरांचा अपमान आहे, असा आरोप रणजीत सावरकरांनी केला. तसंच राहुल गांधी आणि काँग्रेस सेवादलवर खटला दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
 
पण हा दावा का आणि कसा करण्यात आला?
 
काय खरं काय खोटं?
लॅरी कॉलिंस आणि डोमॅनिक लॅपिएर यांच्या 'फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकात सावरकर आणि गोडसे यांच्यात शारीरिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावा नथुराम गोडसेंचे भाऊ गोपाळ गोडसे यांच्या हवाल्याने करण्यात आला होता.
 
अक्षय जोग यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव' हे पुस्तक लिहिलं आहे. 'फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकाविषयी बोलताना म्हणतात, "या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत हा उल्लेख करण्यात आला होता. या लेखकद्वयींनी यासाठी गोपाळ गोडसेंच्या मुलाखतीचा आधार घेतला होता. जेव्हा हे पुस्तक बाहेर आलं तेव्हा गोपाळ गोडसेंनी अशी कोणतीही मुलाखत दिली नाही असं सांगितलं. असं मी काही सांगितलं असेल तर मला त्याचा पुरावा दाखवा, असं आव्हान दिलं. तो पुरावा ते दाखवू शकले नाहीत.
 
"माधवराव पाठक नावाच्या एका वकिलांनी या लेखकांवर खटला भरला. नंतर कोर्टाबाहेर लेखकांनी तडजोड केली आणि बाजारातल्या पुस्तकाच्या प्रती मागे घेतल्या आणि ती वाक्यं काढून टाकली. सध्या बाजारात जी आवृत्ती आहे त्यात हा उल्लेख नाही."
पत्रकार वैभव पुरंदरे यांनीही The True Story of father of Hindutva हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांनीही या दाव्याचं खंडन केलं आहे.
 
सावरकर गोडसेंना भेटले होते का?
"गोडसे सावरकरांना गुरुस्थानी मानायचे," असं ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले. हे अनेकांना ठाऊकही असेल.
 
पण मध्य प्रदेश काँग्रेस सेवादलाने वितरित केलेल्या पुस्तिकेमध्ये दावा करण्यात आला आहे की सावरकरांनी म्हटलं होतं की "गांधी हत्येत सहभागी असलेल्या लोकांना मी ओळखत नाही".
 
सावरकरांनी कोर्टात खरंच असं म्हटलं होतं का? ते गोडसेंना कधीच भेटले नव्हते का?
 
पत्रकार वैभव पुरंदरे यांच्यामते गोडसेंना ओळखत असल्याबद्दल सावरकरांनी कधीच नकार दिला नाही. "त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. गोडसे त्यांना राजकीय गुरू मानायचे. गोडसेंनी जे वृत्तपत्र सुरू केलं, त्याच्या मास्टहेडवर सावरकरांचा फोटो होता. त्याशिवाय सावरकरांनी त्या वृत्तपत्रासाठी सहाय्य करण्याचं आवाहनही केलं होतं. त्यामुळे गोडसे आणि सावरकरांच्या भेटी झाल्या."
 
पुढे ते म्हणतात, "मी सावरकरांच्या आयुष्याचा खोलवर अभ्यास केला. उलटपक्षी त्यांच्या गुरू शिष्याच्या नात्यामुळे सावरकरांच्या कारकीर्दीला डाग लागला. एखाद्या विदेशी लेखकांनी जी थिअरी मांडली त्याला काही आधार नाही."
 
गोडसे-सावरकर भेटी आधी झाल्या होत्या, पण गांधी खुनाच्या आधी भेट झाली की नाही, हा मुद्दा कोर्टात आला होता.
ज्येष्ठ घटनातज्ज्ञ, राजकीय विश्लेषक ए. जी. नुरानी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की गोडसे सावरकरांना गुरुस्थानी मानायचे, मात्र आपण गांधी हत्येच्या खटल्यातून सुटू की नाही, अशी भीती सावरकरांना होती.
 
दिगंबर बडगे या माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या साक्षीत सावरकरांनी माधव आपटे आणि नथुराम गोडसे यांना गांधीहत्येपूर्वी झालेल्या भेटीत 'यशस्वी होऊन या' असं सांगितलं होतं, असं बडगे यांनी कोर्टात सांगितलं होतं.
 
यावेळी सावरकरांनी कोर्टात एक शपथपत्र सादर करत दिगंबर बडगे या माफीच्या साक्षीदाराचा दावा खोडून काढला.
 
सावरकर तेव्हा म्हणाले होते, "17 जानेवारीला (माधव) आपटे, गोडसे आणि माझी भेट झाल्याचं बडगे सांगतात. त्यादिवशी मी या दोघांना 'यशस्वी होऊन या' असं सांगितलं असाही त्यांचा दावा होता. तसंच बडगे सांगतात की ते खालच्या मजल्यावर होते आणि आम्ही पहिल्या मजल्यावर चर्चा करत होतो. समजा असं मानलं की ते त्यादिवशी मला भेटायला आले होते तर खालच्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावरचं कसं ऐकू येईल?"
 
शेवटी सावरकर दावा करतात की त्यादिवशी किंवा त्यानंतर कधीही ते आपटे आणि गोडसेंना भेटले नाहीत. नंतर बडगेंची साक्ष संशयास्पद असल्याच्या कारणावरून कोर्टाने गांधी खून खटल्यातून सावरकरांना निर्दोष सोडलं होतं.
 
या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायाधीश जीवनलाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला होता. त्यांच्यासमोर सावरकरांचे निकटवर्तीय अप्पासाहेब कासार आणि सावरकरांचे सचिव गजानन दामले यांचीही साक्ष झाली होती.
 
या दोघांच्या साक्षी कोर्टात झाल्या असत्या तर सावरकर नक्कीच दोषी सिद्ध झाले असते, असा दावा नुरानी एका लेखात करतात.
 
सावरकर सतत चर्चेत
मात्र या ताज्या वादाला निमित्त ठरलेल्या त्या पुस्तिकेबद्दल विचारणा केली असता काँग्रेस सेवादलाचे प्रमुख लालजी देसाई म्हणाले, "या पुस्तिकेत जे काही लिहिलं गेलंय, ते तथ्यांवर आधारित आहे. यासाठी ही पुस्तिका लिहिणाऱ्या आमच्या कार्यकर्त्याने संशोधनही केलं आहे. तसंच, प्रत्येक ठिकाणी पुराव्यांसाठी संदर्भ दिले गेले आहेत. भाजप आणि RSS नेहमीच सावरकरांचा गांधी हत्येशी संबंध नाही असा उल्लेख करतात. मात्र या पुस्तिकेवरून हे कसं खोटं आहे, हे आम्हाला पुढे आणायचंय."
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, "वीर सावरकर हे महान होते, आहेत आणि राहतील. त्यांच्याबद्दलची आमची श्रद्धा अशा फालतू पुस्तकाने कधीच कमी होणार नाहीत. भोपाळमध्ये तयार झालेली ही घाण म्हणजे हे पुस्तक आहे. ते अनाधिकृत असून ते महाराष्ट्रात आणलं जाणार नाही. सावरकरांवर इतरांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही."
 
विनायक दामोदर सावरकर हे नाव कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. सावरकर हा विषय काँग्रेस विरुद्ध भाजप असा नाही.
 
काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संसदेत वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरून एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून वादंग झाला आणि राहुल गांधींनी माफी मागावी अशी सातत्याने मागणी होऊ लागली. त्यावर "माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही," असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनही प्रचंड गदारोळ झाला होता.
 
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलंय. शिवसेनेला सावरकर कायमच वंदनीय आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस सातत्याने सावरकरांवर टीका करत असतं. त्यामुळे या वादाचा परिणाम महाराष्ट्रातील सरकारच्या स्थैर्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.