सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (10:30 IST)

Ind vs WI: विराट कोहलीने मोडला महेंद्र सिंह धोनीचा विक्रम, भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

भारतीय संघाने जमैका कसोटीत 257 धावांनी दणदणीत विजय मिळवत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्टच्या मालिकेत 2-0 असं निर्भेळ यश मिळवलं.
 
या विजयासह भारतीय संघाने ICC टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 120 गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. जर तुम्हाला ही चॅम्पियनशिप नेमकी काय भानगड आहे, माहिती नसेल, तर ही बातमी आवर्जून वाचा.
 
याबरोबरच विराट कोहली भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कर्णधार ठरला आहे. कॅप्टन म्हणून कोहलीच्या कारकीर्दीतला हा 28वा टेस्ट विजय आहे. यापूर्वी सर्वाधिक यशस्वी भारतीय कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी (27) होता.
 
त्याखालोखाल 21 टेस्ट विजयांसह सौरव गांगुली तिसऱ्या स्थानी तर 14 टेस्ट विजयांसह मोहम्मद अझरुद्दीन चौथ्या स्थानी आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. हनुमा विहारीने 16 चौकारांसह 111 धावांची खेळी केली. विराट कोहली (76), मयांक अगरवाल (55), इशांत शर्मा (57) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. वेस्ट इंडिजतर्फे जेसन होल्डरने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाचा डाव 117 धावांतच गडगडला. शिमोरन हेटेमेयरने 34 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 27 धावांत 6 विकेट्स घेतल्या. भरतीय संघाला 299 धावांची भक्कम आघाडी मिळाली. भारताने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला.
 
भारतीय संघाने दुसरा डाव 168/6 वर घोषित केला. अजिंक्य रहाणेने 64 तर हनुमा विहारीने 53 यांनी अर्धशतकी खेळी केल्या. भारतीय संघाने वेस्ट इंडिजला 468 धावांचं लक्ष्य दिलं.
 
468 धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी 45/2हून पुढे खेळायला सुरुवात केली. डॅरेन ब्राव्हो फिट नसल्याने त्याच्या जागी जरमाईन ब्लॅकवूडला काँशन सबस्टिट्यूट म्हणून समाविष्ट करण्यात आलं.
 
शामरान ब्रुक्सने 50, ब्लॅकवुडने 38 तर कर्णधार जेसन होल्डरने 39 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 210 धावांतच आटोपला.
भारतीय संघातर्फे मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
 
पहिल्या डावात 111 तर दुसऱ्या डावात 53 धावांची खेळी करणाऱ्या हनुमा विहारीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
दोन सामन्यांच्या या मालिकेत हनुमा विहारीने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 96.33च्या सरासरीने 289 धावा केल्या. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला. किंग्स्टन कसोटीत हॅट्ट्रिक घेणाऱ्या बुमराहने या मालिकेत 13 विकेट्स घेतल्या.
 
भारतीय संघ आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे.