शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (16:57 IST)

वरुण सरदेसाई कोण आहेत : आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ 4 वेळा वादात का सापडले?

नितेश राणे यांनी केलेल्या आरोपानंतर वरुण सरदेसाई यांचं नाव चर्चेत आहे.
वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात काय संबंध आहे, त्यांचे सीडीआर तपासावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. वाझे यांच्याबरोबर शिवसेना नेत्याचे टेलिग्राम चॅटही आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली आणि ते तपासण्याची मागणीही राणे यांनी केली.
नितेश राणे, आशीष शेलार आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये वेळोवेळी ट्वीटरवर आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध पाहायला मिळतं. इतकच नव्हे तर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्येही ट्वीटरवर चकमकी झडत असतात. यासर्व आरोप-प्रत्यारोपांमध्ये वरुण सरदेसाई शिवसेनेची बाजू लावून धरताना दिसतात. 2019 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून वरुण सरदेसाई यांचं नाव त्यांच्या पक्षामध्ये आणि माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर झळकताना दिसून येतं.
आदित्य ठाकरे यांच्या निकटच्या वर्तुळात त्यांचा समावेश असल्यामुळे आणि ते आदित्य यांचे थेट नातेवाईक असल्यामुळे त्यांच्याबद्दल चर्चाही होत असते. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरदेसाई यांचं थेट नाव घेऊन आरोप केले होते. कोणत्याही पदावर नसताना ही व्यक्ती मंत्रालयात का फिरते? त्यांना वाय प्लस दर्जाचं संरक्षण का मिळालं आहे असे प्रश्न विचारुन वांद्र्यामधील एका इमारतीचा उल्लेखही केला होता. मात्र त्यावेळेस या आरोपांची फारशी चर्चा झाली नाही.
 
मावसभाऊ ते स्टार प्रचारक
वरुण सरदेसाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत.
वरुण सरदेसाई यांच्याकडे शिवसेनेच्या युवासेनेची सचिवपदाची जबाबदारी आहे. तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.
2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती.
वरुण सरदेसाई यांच्यामुळे अनेकदा वादही निर्माण झाला आहे.
 
1) संरक्षण दिल्यामुळे वाद
उद्धव ठाकरे सरकारनं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली होती, मात्र त्याचवेळी वरुण सरदेसाई यांना मात्र सरकारनं सुरक्षा दिली होती. भाजपनं सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती.
 
2) सीकेपी मुमेंट, सुळे-ठाकरे-सरदेसाई-पाटणकर फोटोचा वाद
गेल्या वर्षी म्हणजेच 31 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोला 'माय सीकेपी मुमेंट-पाटणकर, सरदेसाई, ठाकरे, सुळे' अशी फोटो ओळ सुप्रिया यांनी दिली होती.
या फोटोत सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती, मंत्री आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, तेजस उद्धव ठाकरे, शौनक पाटणकर हे दिसत होते. या ट्वीटनंतर सुप्रिया यांना जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.
 
3) शासकीय बैठकांमध्ये उपस्थिती
वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत. ते शासकीय बैठकांना उपस्थित राहू लागले. यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वरुण सरदेसाई बैठकांमध्ये दिसेनासे झाले.
 
4) मनसेशी वाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये नुकताच ट्वीटरवर एक वाद झाला. दोन्ही नेत्यांनी समोरचा पक्ष खंडणी घेतो असे आरोप केले होते.
संदीप देशपांडे यांनी 'विरप्पन नि जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल' असे एक ट्वीट केले होते. त्यावर वरुण सरदेसाई यांनी देशपांडे यांना उत्तर दिलं होतं.
मग संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या खंडणी आणि इतर गुन्ह्यांसदर्भातील बातम्या आणि सरदेसाई यांनी मनसे संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या ट्वीट करायला सुरुवात केली होती.
 
नितेश राणे यांचे आरोप
नितेश राणे 15 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, "गेल्या वर्षी आयपीएल खेळलं गेलं. त्या टुर्नामेंटअगोदर बेटिंगचं रॅकेट मुंबईत चालतं. काही लोक फ्लॅटमध्ये, हॉटेलमधून करतात. या सगळ्या बेटिंगवाल्यांना सचिन वाझेचे फोन जातात. आणि त्यांना सांगितलं जातं. तुम्ही जे करत आहात ते सगळं आम्हाला माहिती आहे. मग ते लोक घाबरल्यावर तुमची अटक, छापे टाळायचे असतील तर दीडशे कोटी रुपये द्या अशी मागणी केली जायची. ती पूर्णपणे माझ्याकडे पोहोचवा किंवा मी छापे मारेन असं सांगितलं जायचं. तुमची बदनामी, अटक करू अशी धमकी दिली गेली."
 
नितेश राणे पुढे म्हणाले, "अशी रक्कम मागितली गेल्यावर वाझेंना एका व्यक्तीचा फोन जायचा. तू इतकी रक्कम मागितली आहेस, त्यात आमचे किती, आम्हाला किती देणार असं संभाषण केलं जायचं. ही व्यक्ती कोण? विधिमंडळात मी ज्याचं नाव घेतलं, त्याला वाय प्लस संरक्षण दिलेलं आहे, पालिकेच्या सर्व टेंडरमध्ये ज्याचं नाव आहे अशा वरुण सरदेसाईचं वाझेशी हे संभाषण झालं होतं. हा सरदेसाई कोणाचा नातेवाईक आहे, तो कोणाच्या आशीर्वादाने फोन करायचा, त्याला कोणी अधिकार दिले? ही सगळी चौकशी झाली पाहिजे. वाझेचे आणि सरदेसाईचं भाषण तपासलं पाहिजे. वरुण सरदेसाईचा सीडीआर काढा, या महिन्यात त्या दोघांत व्हॉट्सअप कॉल झाले होते का हे चौकशीतून उघड होईल."
 
वरुण सरदेसाई यांचं राणेंना उत्तर
नितेश राणे यांनी आरोप केल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी 15 मार्च रोजीच संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळले. यावेळेस बोलताना सरदेसाई यांनी आपण सुशिक्षित कुटुंबातील असून राणे यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देवेंद्र फडणवीस यांनीच विधिमंडळात सांगितली होती असं सांगितलं.
त्याचप्रमाणे जर पुरावे दिले नाहीत तर कायदेशीर नोटीस पाठवू असंही ते म्हणाले. त्यांच्या मदतीला परिवहन मंत्री अनिल परबही होते. त्यांनीही या आरोपांना उत्तर दिलं
नितेश राणे यांची पुन्हा पत्रकार परिषद
वरुण सरदेसाई यांनी उत्तर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 मार्च रोजी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी 'याला चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतो. ही माहिती तपासून घ्या हे एनआयएला मी सांगितलं. मला धमकी देताय का?अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. मला जी माहिती आहे ती तपास यंत्रणांना देणार, यांना देणार नाही', असं राणे यावेळेस म्हणाले.
इतर प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा
सरदेसाई यांच्या नोटीस पाठवण्याच्या वक्तव्याला उत्तर देताना राणे म्हणाले, ' 39 वर्षे आम्ही बाळासाहेबांची सेवा केलीय आम्हाला सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. माझ्या देशाविरोधात माझ्या राज्यविरोधात कुणी काही करत असेल तर तर मी बोलणार. आम्ही पण रमेश मोरे प्रकरण बाहेर काढू का? चतुर्वेदी प्रकरण बाहेर काढू का?'
अशाप्रकारे राणे-सरदेसाई यांच्यामध्ये वाद होत आहे.
 
नात्यामुळे महत्त्व
वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत आणि ते शिवसेनेत सक्रिय आहेत. आदित्य ठाकरे थेट सत्तेत आल्यानंतर वरुण सरदेसाई यांचं महत्त्व वाढलं आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे व्यक्त करतात.
तर ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान यांच्या मते, वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जाते. शिवसेना पक्ष किंवा निवडणुकांमध्ये त्यांचं विशेष असं योगदान नाहीये.