मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (22:19 IST)

कोरोना संकट भारताच्या मोदी ब्रँडसाठी धक्का का आहे?

अपर्णा अल्लुरी
ब्रिटनच्या संडे टाईम्स वृत्तपत्रात नुकतीच एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीचा मथळा होता, "मोदींनी भारताला लॉकडाऊन आणि कोव्हिड संकटाच्या खाईत लोटलं."
 
ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्राने हीच बातमी पुनःप्रकाशित केली. या बातमीचा सारांश होता, "अहंकार, अति-राष्ट्रवाद आणि प्रशासनाची अकार्यक्षमता यांच्यामुळे भारताचं संकट अधिक मोठं झालं. लोकप्रिय पंतप्रधानांचा आधार असलेल्या लोकांचा श्वास गुदमरला जात आहे."
 
ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासाने या लेखावर आक्षेप नोंदवला आहे.
 
भविष्यात अशाप्रकारे निराधार बातम्या प्रकाशित करू नये, असं दूतावासानं म्हटलं आहे.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला भारतातील कोव्हिड संकटाने मोठा दणका दिला, हे वास्तव आहे.
 
जगभरातील माध्यम आणि समाजमाध्यमांमध्ये भारतातील दुसऱ्या कोव्हिड लाटेची जोरदार चर्चा आहे.
 
बेड, ऑक्सिजन आणि उपचारांअभावी रुग्ण जीवाच्या आकांताने तळमळत आहेत. तर त्यांचे नातेवाईक या गोष्टींची सोय करण्यासाठी आकाश-पाताळ एक करत फिरताना दिसत आहेत.
मृतांवर सामूहिक अंत्यविधी केले जात आहेत. इतकंच नव्हे तर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा न उरल्याने पार्किंग म्हणून वापरल्या जाणाऱ्या मोकळ्या जागांचा वापर मृतदेह जाळण्यासाठी केला जात आहे.
 
मोदी यांनी स्वतःची प्रतिमा जगभरात सक्षम प्रशासक म्हणून पुढे आणली होती. पण सध्या भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असून या संकटासाठी जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरलं जात आहे.
 
प्रतिमेला धक्का
राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मिलन वैष्णव सांगतात, "आता अनेक जण मोदींच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. संकटादरम्यान सरकार कमी पडलं, इतकंच नव्हे तर परिस्थिती आणखी बिकट करण्यात त्यांनी हातभार लावला."
 
अशा परिस्थितीत अडकलेले नरेंद्र मोदी हे काही एकमेव नेते नाहीत. पण त्यांचं अपयश स्पष्टपणे दिसून येतं, ही वस्तुस्थिती आहे.
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्याप्रमाणे त्यांनी कोरोना संकटाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं नव्हतं. पण तरीही आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती टाळण्यात त्यांना अपयश आलं.
नरेंद्र मोदी यांनी कोव्हिड संकटाच्या काळात हिंदू धर्मियांच्या कुंभमेळ्याला परवानगी दिली. पश्चिम बंगालमध्ये महिनाभर चाललेल्या निवडणूक प्रक्रियेचं समर्थन केलं. या निवडणुकीत मास्क न घालता त्यांनी प्रचार केला. मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतल्या.
 
भारतातील हे चित्र धक्कादायक होतं, जगभरात लॉकडाऊन करण्यात येत असताना या निष्काळजीपणाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं, असं इकॉनॉमिस्टचे भारतातील प्रतिनिधी अॅलेक्स ट्रॅव्हेली म्हणतात.
 
जानेवारी महिन्यात भारताने कोरोना व्हायरसचा पराभव केल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले होते. पण त्यानंतर वेगळंच चित्र देशात निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
 
परदेशी निरीक्षकांच्या मते, नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रवादी विचारांना नेहमीच तांत्रिक कार्यक्षमतेशी जोडून पाहण्यात येत होतं. पण कोरोना संकटात ही कार्यक्षमता कुठेच दिसली नाही, असं स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमधील राज्यशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक ख्रिस्तोफर क्लेरी यांना वाटतं.
लोकप्रिय नेता आणि कणखर प्रशासक म्हणून नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीच्या काळात प्रतिमा बनवली होती. पण 2016 मध्ये नोटबंदीनंतर या प्रतिमेला पहिल्यांदा तडा गेला. त्यावेळी दैनंदिन रोख उत्पन्नावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांना नोटबंदीचा फटका बसला होता.
 
त्यानंतर गेल्यावर्षी एका रात्रीतून नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्याही वेळी लाखो नागरिकांनी आपली नोकरी गमावली आणि त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या काळात झालेलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न अजूनही भारताकडून सुरू आहे.
 
काळा पैसा असो किंवा कोव्हिड-19 या समस्या दूर करण्यासाठी आपण देशहितासाठी असे निर्णय घेतल्याचा मोदी यांचा दावा होता.
 
पण फॉरेन पॉलिसी या मासिकाचे मुख्य संपादक रवी अग्रवाल यांच्या मते, "ही व्याख्या इतक्या सहजपणे केली जाऊ शकत नाही. तुम्ही GDP सारखे नंबर वापरून ही गोष्ट सविस्तर मांडू शकता."
 
"पण, नरेंद्र मोदी यांच्याकडून काही चुका झाल्या असल्या तरी त्यांनी घेतलेले काही निर्णय योग्य ठरल्याचं काहींना वाटतं. मोदी आपल्यासाठी लढत आहेत, म्हणून ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पण यंदाच्या वेळी हीच मंडळी मोदींच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला गेलेला हा तडा आहे," असं अग्रवाल म्हणाले.
 
ब्रँडचा उदय
'मोदी मीन्स बिझनेस' (Modi Means Business) असा मथळा टाईम मासिकावर 2012 साली पाहायला मिळाला होता.
 
तत्पूर्वी, 2002 मध्ये रेल्वेला लावलेल्या आगीत 60 हिंदूंचा मृत्यू झाल्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये 1 हजार जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश मुस्लीम होते.
 
त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर दंगल होऊ दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पण नरेंद्र मोदींनी सगळे आरोप फेटाळून लावले होते आणि त्यांच्या प्रतिमेला काहीएक धक्का लागला नव्हता.
2012 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे त्यांच्या समर्थकांकरिता चांगलं सरकार आणि प्रभावी प्रशासनाचं एक उदाहरण बनले होते.
 
काही माध्यमांच्या बातम्यांमध्ये त्यांना 'निरंकुश नेतृत्व' किंवा 'वाईट प्रतिनिधी' असंही संबोधल गेलं. तसंच नरेंद्र मोदींच्या काळात गुजरातमध्ये परिवर्तन घडलं, व्यवसाय वाढला, असंही सांगण्यात आलं.
 
गुजरातमध्ये 13 वर्षं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या नरेंद्र मोदी यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून वर्णी लागली. या गोष्टीला भारताचं आर्थिक पुनरुज्जीवन करण्याची संधी म्हणून मांडलं गेलं.
 
मोदींच्या चेहऱ्यामुळे ध्रुवीकरण होण्याचा धोका होता. पण एक सक्षम प्रशासक या अर्थाने भाजपनं त्यांना पुढे केलं.
 
मोदी यांच्यावर पुस्तक लिहिणारे लेखक निलंजन मुखोपाध्याय सांगतात, "गुजरातवर राज्य करणं हे तुलनेनं सोपं होतं."
 
"नवे रस्ते, वीज, कमी केलेला लालफितीचा कारभार, गुजरातमध्ये वाढलेली खासगी गुंतवणूक यांमुळे मध्यमवर्गीय आणि श्रीमंत मतदार प्रभावित झाले. पण कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात या क्षेत्रात मिळवलेलं यश इतकं मोठंही म्हणता येणार नाही. शिवाय गुजरातचा सामाजिक दर्जाही उंचावला नाही," असं मुखोपाध्याय सांगतात.
 
मोदी यांच्याभोवती निर्माण झालेल्या वलयाने सर्वांना प्रभावित केलं होतं. मीही ती चूक केली होती. आमच्याकडे लाल फित नसून रेड कार्पेट आहे, असं मोदी एकदा म्हणाले होते. पण आता जी विदेशी मदत आहे, तिच्यासाठी ही रेड कार्पेट कुठे आहे, असा प्रश्न मुखोपाध्याय विचारतात.
 
माध्यमांनुसार, भारताला विदेशातून मिळालेली मदत विमानतळांवर अडकून पडली आहे.
 
सध्याच्या परिस्थितीने मोदींची कमकुवत बाजू उघडी पाडली आहे, असं निरीक्षकांचं मत आहे.
 
ते सांगतात, मोदी यांची केंद्रीकृत शैली गेल्या वर्षी आश्वासक वाटली होती. पण यंदाच्या वर्षी त्यांनी राज्याकडे चेंडू टोलवल्याने त्यांच्यातील पोकळपणा दिसून आला.
 
इतर देशांना लशींचा पुरवठा त्यांनी केला होता. पण तोच निर्णय आता निष्काळजीपणाचा वाटू लागला आहे. नरेंद्र मोदी यांचे समर्थक त्यांच्या बहुसंख्याकवादाचं समर्थन करतात. पण आता याच कारणामुळे सध्याच्या संकटाच्या काळात मोदी विरोधी पक्षासोबतही चर्चा करू शकत नाहीयेत, असं तज्ज्ञांना वाटतं
रवी अग्रवाल सांगतात, "नरेंद्र मोदी प्रत्येक ठिकाणी श्रेय घेण्यास, स्वतःच्या नावाचा शिक्का मारण्यास उत्सुक असतात. पण आता उलट परिस्थिती निर्माण होत असताना त्यांना ती जबाबदारीही स्वीकारावी लागेल."
 
नरेंद्र मोदी यांनी परदेशातही एक आकर्षक प्रतिमा निर्माण केली आहे. भारताबाहेर त्यांची प्रतिमा सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचली.
 
मेडिसन स्क्वेअरमध्ये त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना सोबत घेऊन मोठी सभा घेतली. हाऊडी मोदी कार्यक्रमात टेक्सासमध्ये त्यांनी लोक जमा केले होते. त्यांनी आपल्या प्रतिमेचा अतिशय आक्रमकपणे वापर केला होता, त्यावेळी मोदींना आगामी काळातील सर्वात प्रभावी नेते असंही संबोधण्यात आलं होतं, असं अग्रवाल म्हणाले.
 
नरेंद्र मोदी यांचा आक्रमक राष्ट्रवाद हा भारताला महासत्ता बनवण्याच्या दिशेने भारतातील आणि परदेशातील भारतीयांना दिलेलं एक आश्वासन होतं.
 
पण कोव्हिड संकटादरम्यान थायलंड, व्हिएतनाम, बांग्लादेश या देशांनी भारतापेक्षाही चांगली कामगिरी केली आहे, असं अग्रवाल म्हणतात.
 
"त्यामुळे परदेशातील भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. तिथल्या मित्रांसमोर आपल्या देशाचे गुणगान गाण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. पण त्याच देशात आज अशी परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांच्यात निराशेचं वातावरण आहे," असं अग्रवाल म्हणाले.
 
नरेंद्र मोदींची प्रतिमा सुधारणार का?
वैष्णव यांच्या मते, "आतापर्यंत मोदी यांनी स्वत:ला एक असामान्य नेता अशाप्रकारे सादर केलं आहे. एक असा नेतो जो वाईट परिस्थितीतही मार्ग काढू शकतो, त्यातून बाहेर पडू शकतो. मोदी आतापर्यंत अनेक असाधारण अशा परिस्थितीतून बाहेर आले आहेत. त्यामुळे आता लगेच त्यांचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही."
 
सरकारही सध्या डॅमेज-कंट्रोल मोडमध्ये आहे. आरोप करणाऱ्या विरोधी नेत्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. भारतविरोधी ट्वीट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सरकारनं ट्वीटरकडे केलेली आहे.
 
भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर षड्यंत्र रचलं जात असून देशावर आरोप करणाऱ्या पोस्ट डिलीट करण्याची ट्वीटरकडे करण्यात आली आहे.
 
नंतर त्याच ट्वीटरचा वापर मोदी यांचा बचाव करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी केला जात आहे.
 
ट्रॅव्हेली सांगतात, "कोरोना संकटाच्या सुरुवातीला भारतानं आणि जगानं आपल्याकडे कसं पाहावं हे नरेंद्र मोदी यांना माहीत होतं. भारताचं नेतृत्व करत असलेला नेता म्हणून त्यांनी स्वतःला पुढे आणलं. पण सध्या असा कोणताच पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध नाही. त्यांना माफी मागण्यात किंवा मदत मागण्यात कोणताही रस नाही."
 
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनल्यापासून फक्त मोजक्या प्रसंगीच पत्रकारांना मुलाखत दिली. कोव्हिड संकटाच्या काळातही त्यांनी एकही पत्रकार परिषद आयोजित केली नाही.
 
"आपल्याला कुणी प्रश्न विचारू नये, असं मोदींना वाटतं," असं मुखोपाध्याय सांगतात.
 
पण आता भारतातल्या लोकांसमोर फक्त प्रश्नच उरलेत. गरीब आणि मध्यमवर्ग, तसंच उपचारासाठी भटकत असेलेल श्रीमंत लोक, इतकंच काय तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हे समजत नाहीये की मोदींनी अशी स्थिती कशी काय येऊ दिली. सगळे जण प्रश्न विचारत आहेत, पण त्यांची उत्तर देणारा मात्र कुणीच नाहीये.