गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (15:28 IST)

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल का?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यातही धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आणखीच नवे प्रश्न निर्माण झालेत.
 
धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राचं सामाजिक न्याय मंत्रालय आणि विशेष सहाय्य विभाग त्यांच्याकडे आहे. बीडमधील परळी मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
 
धनंजय मुंडे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानं विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाकडूनही टीकेची झोड उठण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा लागलंय.
 
त्यामुळे सहाजिक एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसू शकतो का?
 
बीबीसी मराठीनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी, आपण हे नेमकं प्रकरण काय आहे, हे पाहूया.
 
नेमकं प्रकरण काय आहे?
11 जानेवारी 2021 रोजी पीडित महिलेने तक्रारीचं पत्र ट्वीट केलं.
 
या ट्वीटसोबत या महिलेनं म्हटलं, "मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ओशिवरा पोलीस स्टेशन माझी तक्रारसुद्धा दखल करून घ्यायला तयार नाही."
 
तसंच, या महिलेनं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महिलेने सांगितलं, "धनंजय मुंडे माझ्यासाठी केवळ मंत्री नाहीत. त्यांना मी 1996 पासून ओळखते. तेव्हा ते माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंधात होते. त्यावेळी मी 16-17 वर्षांची असेन. ते कुणीच नव्हते, तेव्हापासून मी त्यांना ओळखते. ते मंत्री आता आहेत. 1998 साली त्यांनी माझ्या बहिणीशी लग्न केलं होतं. मी तेव्हा या दोघांसोबत मुंबईत राहयचे. माझी बहीण बाळ झाल्यानंतर इंदुरला घरी गेली होती. तेव्हा घरात कुणी नसताना माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला."
 
दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी मात्र बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी याबाबत विस्तृत फेसबुक पोस्ट लिहिली.
 
"समाजमाध्यमांमध्ये माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी तसंच ब्लॅकमेल करणारे आहेत," असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
 
मुंडेंनी लिहिलंय, "कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचं तसंच मीडिया आणि सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत."
 
या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल, असंही धनंजय मुंडे यांनी लिहिलं आहे.
 
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकावं - किरीट सोमय्या
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
"या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे जोपर्यंत मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही," असं किरीट सोमय्या म्हणालेत.
 
पोलिसांच्या तपासात सत्य समोर येईल - नवाब मलिक
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, "एखादी तक्रार आल्यानंतर पोलीस निश्चितपणे चौकशी करतील. पण जी महिला आरोप करतेय, तिच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांचं लग्न झालंय, त्यांची दोन मुलं आहेत. त्यांचं नावही मुलांना दिलंय. आता त्यांची बहीण पुढे आलीय. पण पोलीस निश्चितपणे चौकशी करतील."
 
"हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यामुळे धनंजय मुंडेच यावर बोलू शकतात," असं मलिक पुढे म्हणाले.
 
तसचं, पोलिसांवर कुठलाही दबाव नसून, हा नात्यातला विषय असल्यानं पोलीस तपासात सत्य समोर येईल, असंही मलिक म्हणाले.
 
भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीच मागणी केल्यानं आता हे प्रकरण राजकीय वर्तुळात पोहोचलंय. त्यामुळे याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका धनंजय मुंडेंच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादीला बसू शकतो का, हे आम्ही राजकीय विषयांच्या जाणकारांशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
राष्ट्रवादीला फटका बसू शकतो का?
ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी म्हणतात, "सर्वप्रथम हे सांगायला हवं की, सामाजिक न्यायमंत्र्यावरच असे आरोप होत असतील, तर काही ठीक नाही. आरोपांची चौकशी व्हायलाच हवी. जे खातं त्यांच्याकडे आहे, त्या खात्याद्वारे अशा प्रकरणांमध्ये खरंतर न्याय देण्याची भूमिका असते. अशावेळी याच खात्याचा मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकत असेल, तर चिंता वाटण्याची गोष्ट आहे."
 
त्या पुढे म्हणतात, "दुसरा मुद्दा म्हणजे, भाजप या प्रकरणाचा फायदा घेत टीका करेल, यात शंका नाही. त्यामुळे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांना चौकशीची ग्वाही द्यावी लागेल."
 
धनंजय मुंडे यांना बाजूला व्हावं लागेल, अशी शक्यता प्रतिमा जोशी वर्तवतात.
 
याच मुद्द्याला अनुसरून त्या पुढे म्हणतात, "धनंजय मुंडे चौकशीला सामोरं गेले तर अधिक योग्य राहील, त्यांनाही आणि पक्षालाही. अन्यथा, भाजपकडून किंवा विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरला जाऊ शकतो. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो."
'हे प्रकरण आता कायम राष्ट्रवादीची अडचण ठरणार'
बीडमधील वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी म्हणतात, "धनंजय मुंडे यांना त्यांच्या मतदारसंघात फारसा फटका बसणार नाही. कारण तिथे हा मुद्दा फारसा लागू होणार नाही. पण राष्ट्रवादीला इतर मतदारसंघांमध्ये फटका बसेल. कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षावरही असेच आरोप झाले होते."
 
भाजप धनंजय मुंडे यांचं प्रकरण उचलून धरणार यात शंका नसल्याचं सांगत सुशील कुलकर्णी पुढे म्हणतात, "याआधी ज्या ज्यावेळी महिलांचा प्रश्न समोर यायचा, तेव्हा भाजप आमदार राम कदम यांच्या दहिहंडीवेळी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून संदर्भ दिला जायचा. अशावेळी भाजपकडून धनंजय मुंडे यांचं हे प्रकरण पुढे कायम समोर आणलं जाईल आणि त्यावरून टीका केली जाईल."
 
"यापुढे जेव्हा कधी महिला सुरक्षेचा किंवा तत्सम विषय येईल, तेव्हा राष्ट्रवादीसमोर या प्रकरणामुळे गोची होईल, हे नक्की. त्यामुळे हे प्रकरण राष्ट्रवादीला फटका देणारं आहे, हे निश्चित," असं कुलकर्णी यांना वाटतं.
 
"आता धनंजय मुंडेंवरील आरोपांची चौकशी झाली, तरी गृहमंत्री राष्ट्रवादीचेच असल्यानं चौकशीतून बाहेर येणाऱ्या अहवालाला राजकीय किनार राहीलच. त्यामुळे पदावरून बाजूला होत चौकशीला सामोरं जाणं हा पर्याय मुंडेंसमोर आहे. म्हणजे, एकूणच, कसंही झालं तरी राष्ट्रवादीला फटका बसेल हे दिसतंय," असंही सुशील कुलकर्णी म्हणतात.