शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

नारायण राणे म्हणतात त्याप्रमाणे भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार का?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या सरकारला बहुमत सिद्ध करण्याइतके पाठबळ मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. आता हे पाठबळ भाजप कसे मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
भाजपचे केवळ 105 आमदार आहेत. म्हणजेच भाजपला बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील आमदार तसेच अपक्ष आमदारांची गरज लागणार हे निश्चित. अजित पवार यांच्याबरोबर नक्की किती आमदार आहेत तसेच किंवा ते जितके सांगितले जातात तितके आमदार त्यांच्याबरोबर आहेत की नाही याबद्दल काहीच स्पष्ट झालेले नाही.
 
आमदार फोडणं ही आमची संस्कृती नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वारंवार म्हणत आहेत. फोडाफोडी आम्ही करत नाही, असं भाजप नेत्यांनी अनेकदा सांगितलं असलं तरी सध्या मुंबईत सुरु असलेल्या हालचाली पाहाता सरकारला विश्वासदर्शक ठरावासाठी प्रयत्न करावे लागत असल्याचं स्पष्ट होत आहे.
 
भाजप नेते नारायण राणे यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही वेगळेच संकेत दिले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. ते त्यांना किती दिवस असं ठेवू शकतील. काही लोक शिवसेनेत राहाणारच नाही असं सांगून त्यांनी शिवसेनेतील आमदार भाजपाला मदत करतील, असं सूतोवाच केलं.
 
शपथविधीसाठी अजित पवार यांच्यासोबत असणारे काही आमदार पुन्हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच शरद पवार यांच्या गोटात परतले. आपल्याला अजित पवार यांनी फसवून राजभवनावर नेलं, असं म्हणत या आमदारांनी आपली बाजू मांडली होती. त्याबद्दल विचारलं असता नारायण राणे यांनी धक्कादायक खुलासा केला.
 
त्यांनी म्हटलं, "राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांनी फसवून आपल्याला राजभवनात नेलं असं म्हणत आहेत. ते काय लहान आहेत का 10-12 वर्षांचे की फसतील? मी त्या सर्व आमदारांना ओळखतो, आम्ही सोबत कामही केलंय. एक-दोन आमदार गेले म्हणून फरक पडत नाही, बाजारात आणखी बरेच आमदार आहे. काही येणारे आहेत, काही सीमेवर आहेत, त्यामुळे काही फरक पडत नाही."
 
भाजपच्या नेतृत्वाकडून प्रत्येक हॉटेलमध्ये काही लोक पाठवले जात आहेत. त्यांच्यासाठी वेगळ्या रूम बुक करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केला.
 
"भाजप सुप्रीम कोर्टाकडून अधिक वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामागचा हेतू स्पष्ट आहे. इतर पक्षातील आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे," असंही चव्हाण यांनी म्हटलं.
 
'भाजपचा फोडाफोडीवर विश्वास नाही'
"भारतीय जनता पक्षाचा फोडाफोडीच्या राजकारणावर विश्वास नाही. भाजपने सत्ता स्थापन केली आहे. भाजपकडे किती बहुमत आहे, हे विधिमंडळाच्या पटलावर लवकरच कळेल. सध्याची स्थिती शिवसेनेमुळे तसंच त्यांनी महाजनादेश धुडकावल्यामुळे येईल. भाजपने सत्ता स्थापन केली असून फ्लोअर टेस्टच्या वेळी भाजपकडे बहुमत आहे, हे स्पष्ट होईल, " असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
 
'सत्तास्पर्धेत ही स्वाभाविक गोष्ट'
आमदारांची पळवापळवी ही राजकारणातील स्वाभाविक गोष्ट असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान यांनी व्यक्त केलं.
 
प्रधान यांच्या मते, "राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत सत्ताधारी पक्ष इतर पक्षातील आमदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. राजकारणात ही गोष्ट यापूर्वीही घडलेली आहे. त्यामुळे ते आमदार फुटतात की नाही, त्यांना काय आमिष दाखवलं जातं हा दुसरा मुद्दा आहे. यामध्ये नवीन असं काही नाही. यापूर्वीही महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करण्यासाठी इतर पक्षाच्या आमदारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत. राणे यांनी 2001 साली असे प्रयत्न केले होते. पण त्यांना त्यावेळी यश आले नव्हते. पण ही त्यांची खासियत मानली जाते. यात काही नावीन्य नाही."
 
विश्वासदर्शक ठरावाचा दिवस महत्त्वाचा
सध्या कुणीही किती दावे करत असले तरी विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीच नेमकं चित्र स्पष्ट होईल, असं पत्रकार आणि लेखक धवल कुलकर्णी यांनी सांगितलं.
 
कुलकर्णी सांगतात, "प्रत्येक जण काही ना काही वक्तव्य करत आहेत. नेमकं काय चाललं आहे, याची कल्पना नेत्यांनाही आहे किंवा नाही, असा प्रश्न आहे. केंद्रीय नेतृत्व कशा प्रकारे हालचाली करतील, यावर सगळं अवलंबून आहे. राजकारणात सहज वाटणाऱ्या घटनांमागे खूप काही घडत असतं. त्यामुळे सध्याच्या घडीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजून किती आमदार आहेत हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तर प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल."
 
ते पुढे सांगतात, "शरद पवार यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. 2001-02 मध्ये नारायण राणेंनी विलासराव देशमुखांचं सरकार पाडण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरल्याचंही उदाहरण आपल्यासमोर आहे."