बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

सांस्कृतिक भारत: झारखंड

झारखंडची राजधानी रांची असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 79,714 चौरस किमी इतके आहे. जमशेदपूर हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार झारखंडची लोकसंख्या 3,29,66,238 इतकी असून राज्याची साक्षरता 67.63 टक्के आहे. राज्याची अधिकृत भाषा हिंदी ही आहेत. झारखंड राज्यात 24 जिल्हे समाविष्ट आहेत.
 
झारखंड हे भारताचे 28 वे राज्य आहे. 15 नोव्हेंबर 2000 या दिवशी दक्षिण बिहार प्रां‍ताचे झारखंड हे नवीन राज्य उदयास आले. या राज्यामुळे आदिवासी व मागासलेल्यांचे शतकांचे स्वप्न साकारले. 13 व्या शतकात ओरिसाचा राजा जयसिंगदेव या प्रदेशचा सत्ताधीश घोषित झाला. भरपूर वनसंपदा आणि सांस्कृतिक विविधता ही या राज्यातील छोटा नागपूर व संथाल परगणा भागातील विशेषत: आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झारखंड मुक्‍ती मोर्चा दलाचे सतत आंदोलन होत होते. केंद्र सरकारद्वारा झारखंड वेगळे राज्य स्थापन करण्यात आले. 1995 ला स्वायत्त मंडळाची स्थापना झाली. झारखंडला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला. झारखंडच्या पूर्वेला पश्चिम बंगाल आणि पश्चिमेला उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड, उत्तरेला बिहार आणि दक्षिणेला ओरिसा राज्य आहे.
 
झारखंड राज्यात धान, गहू, मका आणि डाळी प्रमुख शेतकी उत्पन्न होते आणि राज्यात अनेक उद्योगही आहेत. झारखंड राज्यात देशातले दोन पोलादाचे कारखाने आहेत. एक, बोकारोमधील पब्लीक सेक्टरमधील औद्योगिक युनिट आणि दुसरे म्हणजे टाटा आयर्न अँड स्टील कंपन (टीस्को). जमशेदपूर खाजगी क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या कंपन्या म्हणजे टाटा इंजीनियरिंग आणि लोकोमोटीव्ह कंपनी, श्रीराम बेअरिंग्ज, उषा मार्टीन, इंडियन ट्युब कंपनी इत्यादी. झारखंड हे तांबे, कोळसा, लोखंड, मॅगनिज, अभ्रक, क्रोमाइट, बॉक्साइट इत्यादी खनिजांमुळे देशातील सर्वाधिक समृध्द राज्य म्हणून गणले जाते.
 
राज्याची प्रमुख भाषा हिंदी असली तरी उर्दु ही सुध्दा दुसरी अधिकृत भाषा आहे. या व्यतिरिक्‍त झारखंड राज्यात बंगाली, उरिया, संथाली (मुंडा), हो, कुरूक, मुंडारी, खारिया, नागपूरी, पंचपरगणिया, खोराटा, कुरमाली, अंगिका आदी घटकबोली बोलल्या जातात.
 
झारखंडमध्ये अनेक आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत व त्यांच्या स्वतंत्र बोलीभाषाही बोलल्या जातात. असूर, बैगा, बंजारा, बाथुडी, बेडीया, विंजिंह्या, बिरहोर, बिरजिया, चेरो, चिक बराइक, गोंड, गोराइत, हो, करमाली, खारिया, खरवार, खोंड, किसान, कोरा, कोरवा, लोहरा, माहली, माल पहारिया, मुंडा, ओरान, परहारिया, संथाल, सावरिया पहारिया, सवर, भूमिज आदी आदिवासी राज्यात वास्तव्य करतात. झारखंड हे पूर्वभारतातील राज्य आहे. धबधब्यांचे राज्य म्हणूनही या राज्याला ओळखले जाते. झारखंडला "The Land of Forests" म्हणून सुध्दा ओळखतात.
 
कोडरमा हे अभ्रकाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र. भारतातील 95 टक्के अभ्रक कोडरमा या जिल्ह्यात सापडते. कौनार हे लोकप्रिय पर्यटन केंद्र, जमशेदपूर येथे जमशेदजी टाटा यांनी भारतातील पहिला पोलाद कारखाना येथे सुरू केला, तोपचांची हे निसर्गरम्य सरोबर, धनबाद हे औद्योगिक शहर, धनबादला कोळशाच्या खाणी आहेत. नेतरहाट येथे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते, मैथान येथील भूमिगत विद्युतगृह म्हणजे एक वैज्ञानिक चमत्कार समजला जातो. रांची हे प्रमुख औद्योगिक शहर आणि धबधब्यांचा जिल्हा आहे. सिंद्री येथे आशिया खंडातील सर्वात मोठा खतांचा कारखाना आहे. हजारीबाग हे निसर्गरम्य ठिकाण व हजारीबाग राष्ट्रीय उद्यान. 
 
या राज्यात विविध आकर्षक केंद्रे पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. जलप्रपात, देऊळ, स्वलित डोंगराळ भाग रांचीच्या सभोवताली पसरलेला आहे. हुन्डु, हिरणी, दोसना व दासम हे जलप्रपात आहेत. चायबासा, देवघर, दुमका (यात्रिकांची केंद्रे आहेत.) बेल्टा (पलामु नॅशनल पार्क), हजारीबाग (रानटी जनावरांचे राखीव जंगल), दालमा वाईल्ड लाईफ सॅन्क्च्युरी इत्यादी लोकप्रिय पर्यटन केंद्रे राज्याला लाभले आहेत.
 
मुंडाची कला म्हणून काही चित्रकला ओळखल्या जातात. त्यात साप आणि इंद्रधनुष्याचे पेंटींग, चिखल व खडकांवरची पेंटींग, चटयांवरची पेंटींग यांचा समावेश असतो. तसेच तुरी चित्रकला मध्ये नैसर्गिक मातीच्या रंगात घरातल्या भिंतीवर रंगकाम केले जाते. बिरहोर आणि भुनिया कलेत वर्तुळाकार पेंटीग करताना हातांच्या बोटांचा वापर करतात. घटवाल कलेतली पेंटींग जंगल आणि प्रा‍ण्यांची संबंधीत आहे. अशा काही लोकचित्रकला झारखंडमध्ये प्रचलित आहेत. 
 
लोकनृत्य कलाप्रकारांमध्ये कर्मा, मुंडा, झुमार असे काही लोकनृत्य केले जातात. आदिवासी लोकनृत्य पारंपारिक पद्धतीने साजरी केली जातात. ढोल, नगारा, ओरान, तमक, ढोलकी अशी काही लोकवाद्य झारखंडात आहेत आणि याच लोकवाद्यांच्या चालीवर आपले पारंपरिक फेरा नृत्य साजरे केले जाते. 
 
होळी,‍ दिवाळी, दसरा, वसंत पंचमी़ आदी सण तर बरूरा शरीफ, बेलगाडा मेला सिमारिया, भादली मेला इतखोरी, छात्रा मेला, कोल्हाइया मेला, कुंडा मेला, कुंदारी मेला, रबदा शरीफ आदी उत्सव मोठ्या आणि वेगळ्या वैशिष्ट्यांसह झारखंड राज्यात साजरे केले जातात. 
 
राज्यात रांची येथे विमानतळ आहे. जमशेदपूर, बोकारो, गिरिदिह, देवघर, हजारीबाग, डाल्टनगंज आणि नाउमुंडी या शहरातही हवाई वाहतुकीची सोय आहे. छोटा नागपूरचे पठार, संथाल हे झारखंड राज्यातील पर्वत आहेत तर गंगा, शोण, दामोदर, ब्राम्हणी, सुवर्णरेखा, फाल्गू, कोयल, अजय, अमानत, औरंगा, बैताराणी, बाक्रेश्वर, बनस्लोई, बारकर, बोकारो, बुरहा, देव, व्दारका, गंजेस, हिंगलो, जमुनिया, कांगसाबती, कन्हार, कौन्हारा, खारकाइ, किऊल, कोइना, कोनार, लिलाजान, मयुराक्षी, मोहना, पुनपुन, संख, तेलेन आदी नद्या या राज्यातून वाहतात. 
(या व्यतिरिक्‍त अजून काही महत्त्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)
 
-डॉ. सुधीर राजाराम देवरे