गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (08:32 IST)

आक्रमणे पाहिलेला मांडवगड

ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेले पण नागरी वस्तीपासून एका बाजूस पडलेले मध्य हिंदुस्थानातील मांडवगड हे प्रेक्षणीय स्थळ आहे. राजा भोजपासून अनेक परकीय आक्रमणे पाहिलेला आणि त्यांच्या राजकीय काळाचा साथीदार असलेला दगडी आणि कलात्मक बांधणी असलेला हा भारदस्त किल्ला पर्यटकांचे आकर्षण बनलेला आहे.
 
सातपुडा पर्वत हा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यांच्या सीमा आहेत. तच उत्तर पश्चिमेस हा मांडवगड किल्ला आहे. येथे येताना खांडवा (मध्य प्रदेश), शिरपूर (महाराष्ट्र), इंदूर (मध्य प्रदेश) असून मांडव गडकडे येताना हिरवागार घाटरस्ता लागतो. पावसाळत तर हे दृश्य फारच बहारदार दिसते. मधूनच इंदूर खांडवा दरम्यान जाणार्‍या रेल्वेगाडीचे दर्शनदेखील घडते. मांडवगड या भव्य वास्तूचे ढोबळमनाने तीन भाग पडतात. दिल्ली द्वाराकडून उत्तरेकडील ‘रॉयल एनक्लेव्ह’ आहे आणि पुढे मांडू गाव आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे रेवाकुंड आहे. रॉयल एनक्लेव्ह भागात बर्‍याच इमारती आहेत, हे सारे पाहण्यासाठी गाईड असणे आवश्यक असते. लाल-काळ्या दगडाची पार्श्वभूमी समजण्यासाठी गाईड फारच उपयोगी पडतो.
हिंदोळा महाल : रॉयल एनक्लेव्हमध्ये असलेल्या इमारतींना महाल म्हणतात. या वास्तूजवळ दोन जलाशय आहेत. महमद शाहच्या मुलाने ही वास्तू बांधली. या महालाच्या उत्तरेस एक घुमट आणि चर्चसदृश भाग दिसतो. त्यास हिंदोळा महल म्हणतात.
अशरफी महाल : अशरफी महाल ही मूळची मदारसा (धर्मपीठ) होती. नंतर महंमद शहाने त्याची कबर बनविली.
जामा मशीद : अफगाणी स्थापत्य शास्त्राचे उत्तम उदाहरण म्हणजे त्याच्या परिसरातील जामा मशीद होय. एकूण 80 चौ. मीटर्सचा परिसर व्यापलेली ही भव्य वास्तू.
रेवाकुंड म्हणजे बाज बहादूरचा महाल होय. हा महाल रेवाकुंडाजवळ आहे. यामधून पाणी वर काढण्यासाठी तत्कालीन व्यवस्था होती. राजपूत आणि मोगल यांच्या मिश्र बांधकाम धर्तीवरील आधारित असलेला हा तलाव आहे.
रूपमती महाल हा रूपमती राणीसाठी होता. तिच्यासाठी अकबर बादशहा मांडवगडावर चालून आला. तेथे दर्याखान कबर, हाथी महाल अशा दोन वास्तू आहेत. इंदूरपासून 115 कि.मी. अंतरावर मांडवगड आहे. इंदूर मध्यवर्ती ठेवून हे ठिकाण पाहणे सोयीचे पडते.