Mussoorie The Queen of Hills : हिमालयाच्या कुशीतले मसुरी  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  उत्तर प्रदेशातून वेगळे करण्यात आलेल्या उत्तरांचलला नैसर्गिक सौंदर्याची जणू भेटच मिळाली आहे. हे राज्य दोन भागात आहे. एक गढवाल मंडल व कुमाऊ मंडल. गढवाल मंडलमध्ये दहा पर्यटन स्थळे येतात. त्यातले प्रमुख आहे मसूरी. मसूरी म्हणजे निसर्गाचा अप्रतिम अविष्कार. म्हणूनच या भागात मसूरीला 'पहाडों की रानी' असे म्हणतात. 
				  													
						
																							
									  
	 
	हिमालयाच्या कुशीत २००५ मीटर उंचीवर हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर बसले त्याचा आकारही 'सी' अक्षरासारखा आहे. याच्या उत्तर भागातून पाहिल्यास हिमाच्छादीत हिमालय दिसतो, तर दक्षिणेत द्रोणस्थली दिसते. पूर्वेला टिहरी-गढवाल व पश्चिमेला चकराता दिसते. 
				  				  
	 
	कॅप्टन यंगने १८२७ मध्ये हे पर्यटन स्थळ शोधून काढले असे म्हणतात. मसूराची रोपे इथे बर्याच प्रमाणात होती, म्हणूनच त्याला मसूरी हे नाव पडले. डेहराडूनचे छत ही सुद्धा मसूरीची ओळख आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	इतर हिल स्टेशनपेक्षा मसूरी वेगळे आहे. मसुरीत पहिल्यांदा लंढोर बाजार वसविला गेला. त्यानंतर त्याचा इतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात तिकडे मैदानी प्रदेशात उन्हाच्या चटक्यांनी लोग भाजून निघालेले असताना इथले वातावरण मात्र थंड असते.
				  																								
											
									  
	 
	मसूरी परिसरातील पर्यटनस्थळे
				   
				  
	गनहिल - या डोंगरावर म्हणे इंग्रजांनी एक तोफ ठेवली होती. ती रोज बारा वाजता डागली जायची. म्हणून या टेकडीचे नाव गनहिल पडले. खरे तर तिची उंची पाहिल्यानंतर तिला टेकडी म्हणण्याचे धाडस होणार नाही. तिची उंची आहे ७२०० फूट. येथे मालरोडवर असलेल्या रोपे वेनेही जाता येते. पायीसुद्धा येथे जाता येते. गनहिलवरून दुनघाटी, जौनपूर घाटी, ऋषिकेशसह चकराता डोंगररांगा व हिमाच्छादीत शिखरांचे दर्शन घेता येते. 
				   
				  
	कॅंप टी फॉल- मसूरी-यमनोत्री मार्गावर मसूरीपासून पंधरा किलोमीटरवर असलेला हा धबधबा पाच धारांमधून कोसळतो. त्यामुळे हा धबधबा पहाण्यासारखा आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची चार हजार पाचशे फूट आहे. त्याच्या चहू बाजूंनी डोंगररांगा दिसतात. इंग्रजांची 'चहा पार्टी' म्हणे इथेच व्हायची. म्हणूनच या धबधब्याला कॅप टी असे म्हणतात. 
				  																	
									  
	 
	लेकमिस्ट- कॅप टी धबधब्याहून परतताना लेकमिस्टला येता येते. 
				   
				  
	म्युन्सिपल गार्डन- पूर्वी या उद्यानाला बोटॅनिकल गार्डन म्हणून संबोधले जात असे. प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. एच. फाकनार लोगी यांनी त्याची निर्मिती केली होती. १८४२ च्या सुमारास या भागाल एका सुंदर उद्यानात परावर्तित केले. त्यानंतर याची देखभाल कंपनी प्रशासनाकडून व्हायला लागली. म्हणून आता त्याला कंपनी गार्डन किंवा म्युन्सिपल गार्डन असे म्हटले जाते. 
				   
				  
	तिबेटी मंदिर- बौद्ध संस्कृतीचे प्रतीक असणारे हे मंदिर पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहे. या मंदिराच्या मागे ड्रम लावले आहेत. ते वाजविले असता आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे.