भारतातील या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पुरुषांना करावा लागतो सोळा श्रुंगार
India Tourism : भारतात प्रत्येक सणाची स्वतःची वेगळी श्रद्धा आणि परंपरा आहे. आजही भारतात अशी काही मंदिरे आहे जिथे मंदिरांमध्ये महिलांना जाण्याची परवानगी नाही आणि काही मंदिरांमध्ये पुरुष श्रुंगार घालून पूजा करतात. भारतात प्रत्येकाच्या धर्म आणि संस्कृतीबाबत वेगवेगळ्या श्रद्धा, वेगवेगळ्या चालीरीती आणि परंपरा आहे. अशीच एक अनोखी परंपरा केरळमधील कोट्टनकुलंगरा श्रीदेवी मंदिरात आहे, जिथे पुरुषांना देवीची पूजा करण्यासाठी सोळा शृंगार करावा लागतो. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे आणि तिचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. शेकडो पुरुष महिलांची वेशभूषा करून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला प्रार्थना करतात.
कोल्लम जिल्ह्यातील चावरा येथील कोट्टनकुलंगारा श्रीदेवी मंदिरात साजरा केला जाणारा चामाविलक्कू उत्सव केरळमधील एक अनोखा आणि प्रसिद्ध उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, पुरुष पूर्ण भक्ती आणि समर्पणाने महिलांचे कपडे घालतात. व सोळा शृंगार करतात तसेच मंदिराभोवती ५ किलोमीटरच्या परिघात राहणारे पुरुष विशेषतः ही परंपरा पाळतात. या मंदिरात भक्त खूप दूरवरूनही येतात.
पौराणिक आख्यायिका
असे म्हटले जाते की पूर्वी काही गुराखी दगडाला देवी मानून त्याची पूजा करायचे आणि मुलींसारखे कपडे घालून त्याच्याभोवती खेळायचे. एके दिवशी अचानक त्या दगडातून देवी प्रकट झाली. ही चमत्कारिक घटना संपूर्ण गावात पसरली आणि नंतर तिथे एक मंदिर स्थापन झाले. तेव्हापासून, देवीला प्रसन्न करण्यासाठी पुरुषांनी महिलांसारखे कपडे घालण्याची परंपरा सुरू आहे.
याशिवाय अनेक पौराणिक कथा देखील या परंपरेशी जोडल्या गेल्या आहे. एका आख्यायिकेनुसार, भद्रकालीने एकदा एका राक्षसाचा वध केला. या युद्धात, देवीचे भद्रकालीचे रूप इतके भयानक झाले होते की देवताही तिला ओळखू शकले नाहीत, तेव्हा देवीने तिचे रूप बदलण्यासाठी सोळाअलंकार केले. ही परंपरा केरळच्या संस्कृतीचा एक खास भाग आहे.