मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By

शरद पवार जीवन परिचय

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत। १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ व १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय 
 
काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
 
जीवन परिचय
शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते. पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले. शारदाबाई या १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. 
 
बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत.
 
२००४ मध्ये पवारांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. आपल्या पुस्तकात, त्यांनी स्वत:ला 'कॅन्सर सर्व्हायव्हर' म्हटलंय.
 
शरद पवार कुटुंब Sharad Pawar Family
वडिल - गोविंदराव पवार
आई - शारदाबाई पवार
भाऊ - प्रताप गोविंदराव पवार आणि 4 इतर
बहीण - सरोज पाटिल व 3 इतर
पत्‍नी - सुलक्षणा सावंती
अपत्य - सुप्रिया सुळे
 
राजकारण
१९५६ साली शरद पवार शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. नंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले. त्याप्रसंगी पवारांनी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले. नंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर चव्हाणांनी पवारांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
 
१९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.
 
१९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वयाच्या २९व्या वर्षी श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. १९७२ आणि १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले.
 
१८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. शरद पवार हे राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. 
 
१९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस (इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.
 
१९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले ज्यात बारामती या जागेचा समावेश होता. मार्च १९८५ची राज्य विधानसभा निवडणूक पवारांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
 
१९८७ साली शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस (इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून १९८८ रोजी पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भाजपशी युती करून काँग्रेस पक्षाला आव्हान देत होता. तेव्हा राज्यात काँग्रेसचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.
 
नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.
 
१९९१ च्या लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री. पी. व्ही. नरसिंह राव यांना नेतेपदी निवडण्यात आले. नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून १९९१ रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड झाली मात्र अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला आणि नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.
 
राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी पदभार सांभाळले.
 
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला. शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
 
१२वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे १९९९ मध्ये पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, '१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. या कारणावरून तिघांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.
 
नंतर १० जून १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 
 
२००५ मध्ये ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. २००९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. २०१० मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५२ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता.