शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (09:05 IST)

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरफ्लॉप

मुंबई अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील ‘लाल सिंग चड्ढा’ने निराशाजनक कामगिरी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला.प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती.आमिरचा चित्रपट म्हटलं की प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर गर्दी करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच पाहायला मिळत आहे.या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२ कोटी रुपये कमाई केली.तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पूर्णच घसरला. दुसऱ्या दिवशी फक्त ७ कोटी ५० लाख रुपये या चित्रपटाने कमावले.

‘लाल सिंग चड्ढा’ने शनिवारी फक्त ९ ते १० कोटी रुपयांची कमाई केली.अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी फक्त १० कोटी रुपयांची कमाई केली आहे.‘लाल सिंग चड्ढा’ चार दिवसांमध्ये फक्त ३७ कोटी ९६ लाख रुपयांपर्यंतच कमाई केली आहे.

अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटापेक्षाही कमी कमाई ‘लाल सिंग चड्ढा’ने केली आहे.‘सम्राट पृथ्वीराज’ने पहिल्या चार दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर ३९ कोटी ४० लाख रुपयांचा गल्ला जमावला होता.