गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (14:57 IST)

अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटाला पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा विरोध, अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो बंद करण्यात आले

पंजाबमधील शेतकरी संघटनांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या नव्या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. शनिवारी देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निषेधार्थ पंजाबमधील शेतकरी संघटनांनी ठिकठिकाणी निदर्शने केली आणि अनेक ठिकाणी चित्रपटगृहातील शो बंद पाडले. पंजाबमधील बर्नाला, जलालाबाद, मोगा आणि झीरकपूर येथे शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन रोखले. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीनही कृषी कायद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे, त्यामुळे हा चित्रपट चालू दिला जाणार नाही.
 
भारतीय किसान युनियन (कादिया) नेते सिकंदर सिंग, जसमेल सिंग, बिट्टू सिंग आणि गुरविंदर सिंग इत्यादींनी सांगितले की, पंजाबमध्ये कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा चित्रपट किंवा शो दाखवण्याची परवानगी दिली जाणार नाही. कृषी कायद्यामुळे पंजाब पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या नष्ट होईल.शेतकऱ्यांच्या विरोधानंतर चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे.
 
कृषी सुधारणा कायदा रद्द व्हावा यासाठी देशातील शेतकरी गेल्या एक वर्षापासून दिल्ली सीमेवर बसून आहेत. त्याचबरोबर काही कलाकार वैयक्तिक स्वार्थासाठी पंतप्रधानांचे कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी हा चित्रपट बनवण्यात आल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. अंबानींसारख्या उद्योगपतींनी चित्रपट निर्मितीत पैसा गुंतवला आहे. पंजाबमधील गुरुदासपूरचे खासदार अभिनेता सनी देओल यांच्यावर शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज न उठवल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
 
जलालाबादमध्येही शेतकऱ्यांनी अक्षय कुमारच्या चित्रपटाला विरोध दर्शवला. शेतकरी नेते मनप्रीत सिंग संधू म्हणाले की, अक्षय कुमार वैयक्तिक स्वार्थासाठी पंतप्रधानांची स्तुती करत आहे. अक्षय कुमारचा कोणताही चित्रपट पंजाबमध्ये चालू देणार नाही. तसेच मोगा येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर चित्रपटगृह मालकांनीही सूर्यवंशी चित्रपटाचे पोस्टर उतरवून चित्रपट बंद पाडला.