अनिल कपूर लवकरच 'इंडियाज टॉप 1Percent' हा नवीन गेम शो घेऊन येत आहेत
जगप्रसिद्ध गेम शो 'द 1% क्लब'चे हिंदी रूपांतर लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. या शोचे नाव 'इंडियाज टॉप 1%' असे असेल आणि याचे सूत्रसंचालन अभिनेता अनिल कपूर करणार आहे. या नवीन रिॲलिटी शोमध्ये काय खास आहे ते जाणून घ्या?
'इंडियाज टॉप 1%' या गेम शोचे उद्घाटन करताना अनिल कपूर म्हणाले, "मला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की 'इंडियाज टॉप 1%' चा प्रीमियर 5 सप्टेंबर रोजी होईल. विशेष म्हणजे, प्रेक्षक हा शो आपल्या घरात आरामात बसून खेळू शकतील. या गेम शोमुळे लोकांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळेल."
या गेम शोबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले, "हा एक असा शो आहे जो तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. तो तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि सतर्कही करेल. यात केवळ तुमच्या ज्ञानाचीच परीक्षा होणार नाही; तर तुमच्या विचारशक्तीचीही चाचणी घेतली जाईल. येथील प्रत्येक आव्हान तुमच्या तर्कशक्तीची, निर्णयक्षमतेची आणि दबावाखाली शांत राहण्याच्या क्षमतेची कसोटी घेते."
हा शो , मूळ 'द 1% क्लब' या जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या गेमवर आधारित आहे. नेदरलँड्स, जर्मनी, स्पेन, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, तुर्की, युक्रेन, मेक्सिको आणि अमेरिका यांसारख्या देशांमधील प्रेक्षकांनी या गेमचा आनंद घेतला आहे.
आता भारतात, या शोचे 'इंडियाज टॉप 1%' असे नवीन नाव असेल. हा शो ५ सप्टेंबरपासून स्टार प्लसवर प्रसारित होईल आणि जिओ हॉटस्टारवरही स्ट्रीम केला जाईल.
Edited By - Priya Dixit

