Aryan Khan Bail: आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटला मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मॉडेल मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ड्रग्ज प्रकरणी तिघांनाही आज कोर्टातून जामीन मिळाला. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. सुनावणीदरम्यान एनसीबीचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जामिनाला कडाडून विरोध केला. एनसीबीने म्हटले आहे की आर्यन जवळपास दोन वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत असून तो कटाचा एक भाग आहे. त्याला क्रूझवर ड्रग्जची माहिती होती. आर्यनला जामीन देता येणार नाही.
त्यावर कोर्टाने विचारले की, आर्यनवर अंमली पदार्थांच्या व्यापाराच्या आरोपाचा आधार काय? या प्रश्नावर एनसीबीने सांगितले की, आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून हे प्रकरण समोर आले आहे. एनसीबीच्या दाव्यावर आर्यन खानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, एनसीबीने कटाचे पुरावे द्यावेत. आर्यनला माहित नव्हते की त्याच्या मित्राजवळ ड्रग्ज आहे. आर्यन खानने कोणतेही षडयंत्र केले नाही.
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना NCB टीमने 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ येथून ताब्यात घेतले होते. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. या आरोपावरून या लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सर्वांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एनसीबीने 20 जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांना जामीन मिळाला आहे.
विशेष म्हणजे, एनडीपीएस प्रकरणांसाठी विशेष न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.