शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (09:08 IST)

आर्यन खान : 'एका तरुण मुलाच्या आयुष्याचा आणि भविष्याचा खेळ मांडून ठेवला आहे'

रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे.जामिनावर सुनावणीचा अधिकार किल्ला मॅजिस्ट्रेट कोर्टाला नाही. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय, असं कोर्टानं नमूद केलंय. त्यामुळे आता सेशन्स कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल करावी लागणार आहे.आर्यनसोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन या यांचेही अर्ज कोर्टानं फेटाळले आहेत.
 
दरम्यान, आर्यन खान प्रकरणावर भाष्य करताना अभिनेत्री रवीन टंडननं म्हटलंय,"लाजिरवाणा राजकीय डाव सुरु आहे. या लोकांनी एका तरुण मुलाच्या आयुष्याचा आणि भविष्याचा खेळ मांडून ठेवला आहे. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे."

यापूर्वी नार्केटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आर्यनसह इतर आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टात केली होती. पण ती मागणी फेटाळण्यात आली आहे.
 
आतापर्यंत चौकशीदरम्यान एकूण 11 जणांना अटक केल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली.
सरकारी वकील कोर्टात म्हणाले, "आरोपींकडून अधिक माहिती मिळाली आहे. आर्यन खान आणि अरबाज यांच्याकडून अर्चित कुमार याचे नाव समोर आले. अर्चित सप्लायर असून त्याच्याकडून 6 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अर्चित गांजा नेटवर्कमध्ये सहभागी आहे."
 
मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री छापा टाकला होता. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने ताब्यात घेतलं.
 
NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत आर्यन खानसह इतर 8 आरोपींना अटक करण्यात आली.
3 ऑक्टोबर रोजी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपींकडे 13 ग्राम कोकेन, 5 MD मेथाडोन, 21 ग्राम चरस, 22 एकस्टेसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपयांची रोख सापडली असा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला.
 
आरोपी आणि ड्रग्सच्या रॅकेटमधील संबंध शोधण्यासाठी कस्टडी हवी आहे अशी मागणी यापूर्वी सरकारी वकिलांनी केली होती.
 
आर्यन खानच्या बॅगमध्ये तसेच फोनमध्ये काहीच सापडलं नाही तेव्हा आर्यन खानला जामीन देण्यात यावा अशी मागणी आर्यन खानचे वकील सतिश मानेशिंदेंनी केली होती परंतु त्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
 
आज (7 ऑक्टोबर) कोर्टाकडून आरोपींना जामीन मिळणार की पोलीस कोठडीत वाढ होणार हे स्पष्ट होईल.
बुधवारी (6 ऑक्टोबर) याप्रकरणी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले.आर्यन खानला ज्या रेडमध्ये ताब्यात घेण्यात आलं त्या रेडमध्ये NCB बरोबर भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप त्यांनी केला.त्यानंतर NCB ने पत्रकार परिषद घेऊन मनिष भानुशाली आणि किरण गोसावी हे स्वतंत्र साक्षीदार होते असं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
काय झालं होतं?
मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) त्याची चौकशी सुरू झाली. जे. जे. मेडिकल महाविद्यालयात आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
आर्यन खानसह याप्रकरणात आठ जणांना NCB ने ताब्यात घेतलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा अशी त्यांची नावे आहेत, असं विभागाने सांगितलं.
 
या सर्वांचा संबंध मुंबईतील क्रूझवर होत असलेल्या कथित रेव्ह पार्टीशी आहे. त्याबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असं NCB मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं.
 
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल, असं मत NCB प्रमुख एस. एन. प्रधान यांनी नोंदवलं आहे. "आम्ही या प्रकरणात अतिशय निःपक्षपातीपणे काम करत आहोत. या प्रकरणात बॉलीवूड अथवा धनाढ्य लोकांचाही संबंध असल्याची माहिती मिळतेय, पण तरीही आमचं काम आम्ही निःपक्षपातीपणे करू. कायद्याच्या कक्षेत राहूनच आम्हाला कामाची अंमलबजावणी करावी लागेल," असं प्रधान म्हणाले.
 
मध्यरात्री केली कारवाई
मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. क्रूझ समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर ही पार्टी सुरू झाली होती, अशी माहिती एनसीबीनं दिली.
 
ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकानं या सर्वांना रंगेहाथ अटक केली. त्यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश होता. शनिवारी निघालेली ही क्रूझ सोमवारी मुंबईला परतणार होती, अशी माहिती मिळाली होती.
 
पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. तसंच या पार्टीसाठी क्रूझचं तिकिट 80 हजार रुपये एवढं असल्याचंही काही माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे.दरम्यान, या प्रकरणी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
 
NCB ने मुंबईच्या समुद्रात क्रुझ पार्टीवर केलेल्या कारवाईवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही प्रतिक्रिया दिली.
 
गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्ज कारवाईचे पुढे काय झाले? या छोट्या कारवाया त्या घटनेवर पडदा टाकण्यासाठी तर नाहीत ना, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला आहे.