1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 9 मार्च 2023 (14:20 IST)

Satish Kaushik कॉमेडियन होण्यासाठी आले अन् दिग्दर्शकही बनले..

सतीश कौशिक
बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल्याची माहिती अभिनेता अनुपेम खेर यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
 
कौशिक 67 वर्षांचे होते.
सतीश कौशिक यांचे पुतणे निशाण कौशिक यांनी बीबीसी हिंदीला सांगितले की त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले. कौशिक हे होळी खेळण्यासाठी गुरुग्राम येथे आले होते. मित्राच्या घरी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांचा जीव वाचू शकला नाही अशी माहिती निशाण कौशिक यांनी दिली.
 
सतीश कौशिक यांचे मित्र आणि सहकलाकार अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
 
अनुपेम खेर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "ही गोष्ट मी मान्य करतो की मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण ही गोष्ट कधी आपल्या जीवलग मित्राबाबत कधी जिवंतपणी लिहावी लागेल अशी कल्पनाच मी केली नव्हती. 45 वर्षांच्या मैत्रीला अचानक पण पूर्णविराम लागला आहे. हे आयुष्य कधीच आता पूर्ववत होणार नाही, सतीश."
 
असा शोकसंदेश अनुपम खेर यांनी लिहिला आहे.
 
ऑल इंडिया रेडियो न्यूजने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
तेरे नाम, हम आपके दिल में रहते है, क्योंकी, इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं,
 
सतीश कौशिक यांनी अनेक चित्रपटातून अभिनय देखील केला. जाने भी दो यारो या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनतर मासूम, मंडी या चित्रपटात त्यांनी काम केले.
 
अनिल कपूर यांच्या मि. इंडिया चित्रपटात त्यांनी साकारलेली 'कॅलेंडर'ची भूमिका विशेष गाजली. अनेक वर्षं अभिनय केल्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला.
 
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना सोबत घेऊन सतीश कौशिक यांनी रूप की रानी, चोरों का राजा हा चित्रपट काढला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता.
 
काही वर्षांनंतर आलेले हम आपके दिल में रहते है, हमारा दिल आपके पास है हे चित्रपट गाजले होते. तुषार कपूर आणि करीना कपूर यांना सोबत घेऊन त्यांनी मुझे कुछ कहना है चित्रपट काढला.
 
त्यांचा दिग्दर्शक म्हणून सर्वाधिक गाजलेला चित्रपट हा तेरे नाम ठरला. सलमान खानने अभिनय केलेल्या या चित्रपटाची इतकी क्रेझ निर्माण झाली होती की अनेक तरुण सलमान खानप्रमाणे केशभूषा करू लागले होते.
 
पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचा कागज हा त्यांचा शेवटचा प्रदर्शित चित्रपट ठरला.
 
काही दिवसांपूर्वीच सतिश कौशिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. मुंबईत पहिल्यांदा आल्यावरचा हा फोटो होता.
 
9 ऑगस्ट 2022 ला त्यांनी हा फोटो ट्वीट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, '43 वर्षांपूर्वी मी या शहरात आलो आणि या शहराने प्रेमाने मला कुशीत घेतलं आणि कधीच दूर होऊ दिलं नाही. असंच प्रेम करत राहा आणि शक्ती देत राहा. अजून अनेक स्वप्नं बाकी आहेत.'
बीबीसी हिंदी प्रतिनिधी, नितीन श्रीवास्तव यांनी सांगितलेल्या आठवणी
सतीश कौशिक यांच्याशी बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी 18 वर्षांपूर्वी मुलाखत घेतली होती. त्यावेळच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
 
नितीन श्रीवास्तव यांनी सांगितल्या आठवणी
 
2005 मध्ये वादा हा चित्रपट रिलीज होणार होता. त्याआधी दोनच वर्षांपूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेला तेरे नाम हा चित्रपट आला होता.
 
त्यावेळी मी स्टार न्यूजसाठी ज्युनिअर रिपोर्टरचे काम करत होतो आणि माझं पोस्टिंग मुंबईत होतं. त्या दिवशी मला सतीश कौशिक यांची मुलाखत घेण्याचे सांगण्यात आले.
 
मुंबईच्या जुहू भागात त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी जायचं होतं. मिस्टर इंडियाच्या कॅलेंडरला आपण भेटणार यामुळे मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
 
दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात पोहोचलो, रिसेप्शनवर उभा असताना माझ्यासमोरच एक जण मुंबईतील प्रसिद्ध तिवारी स्वीट्सचे पार्सल घेऊन कौशिक यांच्या कॅबिनमध्ये जाताना दिसला.
 
जेव्हा मी आत गेलो तेव्हा त्यांनी सर्वांत आधी म्हटलं की बेटा, आधी काहीतरी खाऊन घे तू. गप्पा गोष्टी तर आरामात होतच राहतील.
 
सतीश कौशिक आरामात खस्ता आणि कचौरीचा आनंद लुटत होते. काही बोलणं सुरू करण्याच्या आतच ते म्हणाले, आम्ही तर पंजाब-दिल्लीवाले आहोत. इथे मुंबईत सुद्धा तसंच जेवण शोधत हिंडतो.
 
जेव्हा मी दिल्लीतल्या किरोडीमल कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा दर आठवड्याला करोलबागेतील रौशन दी कुल्फी खाण्यासाठी बसने जात होतो. तिथेच चना-भटुरा खायचो. काय चव होती यार ती. असं म्हणत ते आपल्या जुन्या आठवणीत रमले.
 
कॉमेडियन बनण्यासाठी आले आणि दिग्दर्शकही बनले
सतीश कौशिक यांना जाने भी दो यारो या चित्रपटातील संवाद लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या कार्यालयात वैष्णोदेवीची प्रतिमा होती, त्याच्या पाठीमागे तेरे नामचे पोस्टर आणि जाने भी दो यारोंसाठी जिंकलेली ट्रॉफी होती.
 
त्याबद्दल सतीश कौशिक सांगू लागले, जेव्हा मी जाने भी दो यारोंचे संवाद लिहिले तेव्हा वाटलं देखील नव्हतं की पुढे जाऊन हा चित्रपट कल्ट क्लासिक होईल. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो जे आम्ही एनएसडी आणि FTII मध्ये शिकलो होतो.
मला आठवतं मी त्यांना म्हटलो की सर मी मिस्टर इंडिया सहा-सात वेळा पाहिला आहे. त्यातली तुमची आणि मोगॅम्बोची व्यक्तिरेखा अतिशय जबरदस्त वाटले.
 
त्यावर तो हसत हसत म्हणाले, यार मी तर फक्त तेच करत होतो जे सलीम-जावेद साहेबांनी लिहून दिलं आहे. तसं पाहायला गेलो तर मी इंडस्ट्रीत कॉमेडियन होण्यासाठीच आलो होतो. माझ्यावर जॉनी वॉकर आणि मेहमूद यांचा प्रभाव होता. मला ते फार आवडायचे. आणि मनात एक विश्वास होता की यांच्याप्रमाणेच मी देखील लोकांना हसवू शकतो. दिग्दर्शक तर मी नंतर बनलो पण माझं पहिलं प्रेम हे कॉमेडीच आहे मित्रा.
 
मिस्टर इंडियाचं लेखन हा सलीम-जावेद यांचा शेवटचा एकत्रित प्रकल्प होता. त्यांनंतर ते एकमेकांपासून दुरावले. हे जरी खरं असलं तरी त्यांनी तयार केलेली पात्रं ही अजरामर ठरली आणि त्यातलं एक पात्र कौशिक यांनी साकारलेलं 'कॅलेंडर' हे देखील होतं.
 
खाण्या-पिण्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं
सतीश कौशिक थोड्या-थोड्या वेळानंतर दिल्लीतल्या दिवसांबद्दल बोलत असत. त्यांना जेव्हा कळलं की माझं शिक्षण देखील दिल्लीतच झालं आहे तेव्हा ते म्हणाले 'खाण्या-पिण्याची आवड आहे का'?.
 
मी म्हटलं, 'हो आहे ना'.
 
त्यावर ते म्हणाले, 'तर मग सांग मला तुझी आवडती खाण्या-पिण्याची पाच ठिकाणं कोणती?'
 
मी काही सांगणार त्याआधीच ते बोलू लागले.
 
'अरे राहू दे, मी काय सांगतो ते ऐक. मी जेव्हा NSD मध्ये शिकत होतो तेव्हा आम्ही पुरानी दिल्ली किंवा पहाडगंज येथून जेवण मागवत असू. काय जेवण होतं यार ते. त्यात वरतून ते साजूक तूप टाकत असत. अहाहा! आज ही कधी संधी मिळते तर दिल्लीतून जेवण मागवून खातो मी. आता हे नको म्हणू की माझं वजन त्यामुळेच वाढलं,' आणि असं म्हणत ते दिलखुलास हसू लागले.
 
त्यानंतर त्यांना मी तीन वेळ भेटलो आणि तिन्ही वेळी ही भेट दिल्लीच्या विमानतळावरच झाली.
 
गेल्या वर्षीच त्यांना मी भेटलो तेव्हा मी त्यांना वादा चित्रपटावेळी झालेल्या भेटीची आठवण करुन दिली. त्यावर ते म्हणाले, 'जाऊ दे रे ते आता. विचार करतोय की तेरे नाम-2 बनवावा. दिल्लीतही शूट करता येईल. मजा येईल.'
 
त्यांचं दिल्लीवर जीवापाड प्रेम होतं आणि नियती अशी की अखेरचा श्वासही त्यांनी दिल्लीतच घेतला.