गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (09:30 IST)

'शोले'च्या गब्बर सिंगची भूमिका डॅनी डेन्झोपाला जवळपास मिळालीच होती, पण

तर हा किस्सा आहे सत्तरच्या दशकातला.सुपरस्टार अमिताभ बच्चन त्या काळात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. तर दुसरीकडे सिक्कीम राज्यातून आलेला डॅनी नावाचा तरुण चित्रपटात काम मिळावं म्हणून मुंबईत दाखल झाला होता. त्यावेळी बी आर चोप्रा धुंद चित्रपटाची निर्मिती करत होते. त्यांनी या चित्रपटात त्याला पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका देऊ केली.
 
डॅनीने जेव्हा चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा त्याला इन्स्पेक्टरऐवजी दुसरीच भूमिका आवडली. आणि ही भूमिका थोडी निगेटिव्ह होती. पण त्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना फायनल करण्यात आलं असल्यामुळे तो इन्स्पेक्टरचीच भूमिका कर असं डॅनीला सांगण्यात आलं.
 
20-21 वर्षांच्या डॅनीने बीआर चोप्रासारख्या दिग्गज दिग्दर्शकाला इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी नकार दिला.
 
पण ज्यांनी कोणी 1973 मध्ये रिलीज झालेला धुंद हा चित्रपट पाहिलाय त्यांना समजलं असेल की छोटीशीच पण निगेटिव्ह भूमिका डॅनीने चांगल्याप्रकारे वठवली आहे.
 
धुंद चित्रपटामुळे डॅनीला प्रसिद्धी तर मिळालीच शिवाय त्याच्या करिअरने देखील पिकअप घेतला.
 
त्यानंतर डॅनीने अग्निपथ, हम, खुदा गवाह, रोबोट आणि ऊंचाई अशा 200 हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं.
 
13 फेब्रुवारी 1973 ला प्रदर्शित झालेल्या धुंद या चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर 25 फेब्रुवारीला डॅनीने वयाची पंच्याहत्तरी गाठलीय.
आणि असा मिळाला पहिला रोल...
'वाइल्ड फिल्म्स इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत डॅनीने याविषयी विस्ताराने सांगितलं होतं.
 
डॅनीने सांगितलं होतं की, "मी त्यावेळी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होतो. बी.आर. चोप्रा यांनी मला माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईला येऊन भेट असं सांगितलं होतं. मी मुंबईत जाऊन त्यांना भेटलो पण त्यावेळी जो चित्रपट सुरू होता त्यात मला काही भूमिका मिळाली नाही. पुढे जेव्हा त्यांनी धुंद बनवायला सुरुवात केली तेव्हा मला बोलवून घेतलं. एखाद्या मोठ्या निर्मात्याने एका स्ट्रगलरला बोलावणं मोठी गोष्ट होती."
 
"त्यांनी मला इन्स्पेक्टरची भूमिका देऊ केली. ही भूमिका मोठी होती पण माझं मन मला सांगत होतं की, यापेक्षा दूसरी भूमिका चांगली आहे. ती थोड्या वेळासाठी पडद्यावर येते आणि मरते, पण त्यातून छाप पडण्यासारखी ती भूमिका होती. मी इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी नकार दिला. माझ्या नकारामुळे चोप्रा हैराण झाले, कारण मी तेव्हा नवखा होतो. त्यांनी मला थोडे दिवस विचार कर म्हणून सांगितलं."
 
"दरम्यान अमिताभ बच्चन यांचा आनंद हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिट ही झाला होता. त्यामुळे अमिताभ यांना बहुधा नकारात्मक भूमिका करायची नव्हती, म्हणून त्यांनी ही भूमिका नाकारली. हे कळताच मी चोप्रा यांच्याजवळ गेलो आणि मला भूमिका मिळावी म्हणून गळ घातली. त्यावर ही भूमिका शत्रुघ्न सिन्हा यांना दिल्याचं त्यांनी मला सांगितलं. पण तीन-चार दिवसांनी कळलं की शत्रुघ्न सिन्हा वेळेवर न पोहोचल्याने त्यांना या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय."
 
"शत्रुघ्न सिन्हांचा विषय कळताच मी पुन्हा चोप्रांकडे गेलो. तेव्हा ते म्हणाले की, हे बघ ही भूमिका नवऱ्याची आहे, तू अजून लहान मुलांसारखा दिसतोय. आणि ही भूमिका अपंग व्यक्तीची आहे. त्यावेळी मी फक्त 20-21 वर्षांचा होतो. आता चोप्रा मला वैतागले होते. शेवटी कसंबसं मी दाढी मिश्या लावून स्क्रीन टेस्ट दिली आणि चोप्रा खुश झाले. मी चांगलं काम करेन असं त्यांना वाटलं. तो चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आणि अशाप्रकारे माझी सिनेसृष्टीत एन्ट्री झाली."
डॅनीच्या कारकिर्दीवर एक नजर..
डॅनीचं खरं नाव शेरिंग फिन्सो डेन्झोंगपा आहे.
 
1973 मध्ये आलेल्या बी आर चोप्रा यांच्या धुंद मधून मिळाली ओळख.
 
लता, रफी, किशोर यांच्यासोबत गायक म्हणूनही केलंय काम.
 
अग्निपथ, हम, खुदा गवाह मधील अभिनयाचं कौतुक.
 
शेरिंग फिन्सो डेन्झोंगपा ते डॅनी डेन्झोंगपा पर्यंतचा प्रवास...
मूळचा सिक्कीमचा असलेल्या डॅनीला खरं तर सैन्यात भरती व्हायचं होतं. तो एनसीसी कॅडेट देखील होता. पण त्याच काळात चीन आणि भारत दरम्यान युद्ध झालं. या युद्धात अनेक भारतीय जवान शहीद झाले. या भीतीपोटी डॅनीच्या आईने त्याला सैन्यात भरती होऊ दिलं नाही.
 
डॅनीला गाण्याचीही आवड होती, त्यामुळे हाच ऑप्शन ठेऊन त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अँडमिशन घेतलं.
 
बॉलिवूडमध्ये हिरोची इमेज सर्वसाधारण अशी होती. पण सिक्कीमहून आलेला डॅनी त्यावेळी पुण्यात आणि चित्रपटविश्वात अपवाद ठरला होता.
 
2018 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत डॅनीने सांगितलं होतं की, "त्या काळात मसालापट चित्रपट बनायचे, ज्यात सासू सूनांची भांडणं, हीरो - व्हीलन अशा स्टोरी होत्या. माझ्या बऱ्याचश्या हितचिंतकांनी मला सल्ला देताना सांगितलं होतं की, ज्या पद्धतीचे चित्रपट तयार होतात ते बघता तुझ्यासारखा तोंडावळा असलेले हीरो त्यात चालणार नाहीत, त्यामुळे तू कुठेतरी नोकरी मिळव."
 
डॅनीला या सगळ्याची जाणीव पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्येही झाली होती.
 
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत डॅनी सांगतो की, "जेव्हा मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासाठी आलो तेव्हा पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची त्यांची नावं सांगितली. मी पण माझं नाव शेरिंग फिन्सो डेन्झोंगपा असल्याचं सांगितलं. मी सिक्कीमचा होतो आणि तिथे कोणालाच माझं नाव उच्चारता येत नव्हतं. मला बघताच माझे क्लासमेट श्श्श करून मला हाक मारायचे...त्यांच्यासाठी मी एखादा न बघितलेल्या प्राण्यासारखा होतो. तेव्हा जया बच्चनही तिथे शिकत होत्या. त्यांनी मला डॅनी नाव वापरण्याचा सल्ला दिला."
 
अशा प्रकारे पुण्यात आल्यावर शेरिंग फिन्सू डेन्झोंगपाचा डॅनी झाला. गुलजार यांनी 1971 मध्ये 'मेरे अपने' चित्रपटात आणि बीआर इशारा यांनी 1972 मध्ये 'जरूरत' चित्रपटात डॅनीला छोटी भूमिका दिली.
 
डॅनीने पुढच्याच काही वर्षात खलनायक म्हणून आपला दबदबा निर्माण केला. पण त्याने बाईस्कोप वाला, इत्तेफाक, फ्रोझन असे वेगळ्या धाटणीचे चित्रपटही केले.
 
'अपना उसूल कहता है दाएं हाथ से जुर्म करो तो बाएं हाथ को पता भी न चले', 'कमज़ोर की दोस्ती ताकतवर के वार को कम कर देती है. इसलिए हम हमेशा ताक़तवर के साथ हाथ मिलाता है' असे डॅनीचे डायलॉग तुफान गाजले.
शोलेमध्ये गब्बरच्या भूमिकेसाठी डॅनी होता पहिली पसंती..
जर वेळ जुळून आली असती तर शोलेचा गब्बर डॅनीच असता. शोलेमध्ये गब्बरच्या भूमिकेसाठी अमजद खानच्या आधी डॅनीची निवड झाली होती. शोलेविषयी जितके किस्से प्रसिद्ध आहेत त्यातला हा किस्सा खूपच प्रसिद्ध आहे.
 
खरं तर, त्या दिवसांत डॅनीने फिरोज खानचा धर्मात्मा साईन केला होता. या चित्रपटासाठी तारखाही दिल्या होत्या आणि या चित्रपटाचं शूटिंग अफगाणिस्तानमध्ये होणार होतं.
 
अफगाणिस्तानातील शूटिंगच्या तारखा बदलणं शक्य नव्हतं.
 
फिरोज खान आणि रमेश सिप्पी यांच्यात याविषयी चर्चा झाली, पण डॅनीने फिरोज खानला दिलेला शब्द पाळला आणि गब्बरसिंगची भूमिका अमजद खान यांच्याकडे गेली.
 
अमजद खानप्रमाणे डॅनी देखील मुरलेला खलनायक होता. 1992 च्या द्रोही चित्रपटात, डॅनीने राघव नावाच्या एका गुन्हेगाराच्या मेंटोरची भूमिका साकारली होती. त्याचा हा चित्रपट पाहून 1973 मध्ये आलेल्या 'खून खून' चित्रपटाची आठवण होते.
 
'खून खून' या चित्रपटात डॅनीने एका सायकॉटिक सीरियल किलरची भूमिका केली होती.
किशोर, रफी, लता दीदी यांच्यासोबत गाणी गायली...
डॅनी एक मुरब्बी अभिनेता तर होताच शिवाय तो पारंगत गायक देखील होता. डॅनीने हिंदी आणि नेपाळी चित्रपटांसाठी मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांसारख्या गायकांसोबत गाणी गायली आहेत.
 
डॅनीला देव आनंद यांच्या 'ये गुलिस्तान हमारा' या चित्रपटात भूमिका मिळाली होती. नंतर ही भूमिका जॉनी वॉकरला दिली गेली. पण जॉनी वॉकरसाठी गाणं मात्र डॅनीने गायलं. आणि यासाठी एसडी बर्मन यांनी पुढाकार घेतला होता. गाण्याचे बोल होते- मेरा नामे आवो, मेरे पाश आओ...
 
याशिवाय डॅनीने ऋषी कपूर यांच्या नया दौर या चित्रपटासाठीही गाणं गायलं होतं... पहिलं गाणं किशोर कुमारसोबत (पानी के बदले पीकर शराब…) आणि दुसरं गाणं रफी ​​आणि आशा भोसले (मुझे दोस्त तुम गले से लगा लो...) यांच्यासोबत.
 
नेपाळी चित्रपटातही केलं होतं काम..
डॅनीने साइनो या नेपाळी चित्रपटाची स्टोरी तर लिहिलीच, शिवाय यात ॲक्टिंग देखील केली होती. पुढे या चित्रपटाची दूरदर्शनवर अजनबी नावाने टेलिसिरीज सुरू करण्यात आली. आशा भोसले यांच्या सोबत त्याने 'आगे आगे टोपाई को गोला...' हे नेपाळी गाणं गायलं होतं. हे गाणं जबरदस्त हिट ठरलं. आजही याचा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे.
अग्निपथमध्ये अमिताभ-डॅनीची जोडी...
70 आणि 80 च्या दशकात डॅनीने प्रत्येक मोठ्या हिरोसोबत काम केलंय. यात मिथुन, राजेश खन्ना, धर्मेंद्र, राज कुमार सारखे बरेच ॲक्टर्स होते. डॅनी बऱ्याचदा खलनायक किंवा साइड रोल म्हणून काम करायचा. त्याने धर्मात्मा, कमांडो, प्यार नहीं होता हो, द बर्निंग ट्रेन असे हिट चित्रपट दिले.
 
पण डॅनीला नाव मिळवून दिलं ते कांचा चीनाच्या भूमिकेने. 1990 मध्ये अमिताभ आणि डॅनी स्टारर अग्निपथ हा चित्रपट आला होता. बच्चन त्यावेळी मोठे स्टार होते.
 
यानंतर 1991 मध्ये आलेल्या हम या चित्रपटात त्याने बख्तावरची भूमिका केली होती. यात देखील तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. पुढे 1992 मध्ये खुदा गवाहमध्ये खुदा बक्शच्या भूमिकेत. खुदा बक्शची भूमिका त्याच्या खलनायकी भूमिकेपेक्षा वेगळी होती. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
 
हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्यांपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या डॅनीने सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. पडद्यावर कधी त्याने शशी कपूरचा भाऊ साकारला तर कधी खलनायक बनला. पण त्याला नेहमीच अशा भूमिका मिळत गेल्या. दिग्दर्शकांच्या या अशा वागण्याबद्दल त्याला नेहमीच आश्चर्य वाटायचं.
 
डॅनीने सांगतो की, "न्यूयॉर्कहून मेथड अॅक्टिंग शिकवायला एक शिक्षक यायचे. पण हीच वास्तववादी ॲक्टिंग आम्ही चित्रपटांमध्ये करायचो, तेव्हा दिग्दर्शक शॉट ओके करायचेच नाहीत. जे कलाकार आर्ट फिल्म्समध्ये रिअॅलिस्टिक अॅक्टिंग करायचे त्यांना काम मिळायचं नाही, पण जे लोक बाजाराची मागणी लक्षात घेऊन काम करायचे त्याला कामच काम मिळायचं."
 
आजवर हिंदी चित्रपटांमध्ये बरेच नायक खलनायक होऊन गेले पण डॅनीने मिळवलेलं यश सर्वांपेक्षा खूप वेगळं आणि महत्त्वाचं आहे. कारण त्याकाळात ईशान्येकडील राज्यांतून आलेल्या कोणत्याही कलाकारासाठी हे यश मिळवणं तितकसं सोपं नव्हतं.
 
आजही हाताच्या बोटावर मोजण्याइतके कलाकार ईशान्येतून येऊन हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं स्थान निर्माण करतात. यात सीमा बिस्वास, आदिल हुसेन यांसारखी नावं सांगता येतील.
 
सिक्कीमच्या जंगलात राहायला आवडतं...
डॅनी आपला बराचसा वेळ मुंबईच्या गजबजाटापासून दूर सिक्कीममध्ये घालवतो.
 
डॅनी सांगतो, "आम्ही शिकारी होतो, आणि हे गुण आजही आमच्या रक्तात आहेत. आम्ही प्राण्यांच्या मागे धावायचो. पण आता गाड्या आल्या, एसी आले, लोक टीव्हीसमोर बसून किंवा एसी कारमधून प्रवास करतात. पण मी मात्र आजही पायी चालतो."
 
"मी आजही सिक्कीमच्या जंगलात सरपण आणायला जातो. झाडांवर चढतो, पायी चालतो आणि हेच माझ्या आरोग्याचं रहस्य आहे."
 
ज्येष्ठ पत्रकार रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात की, "डॅनीचा जोगरिला नावाचा बंगला खूप प्रसिद्ध आहे. त्याची पत्नी सिक्कीमची राजकुमारी आहे. सिक्कीममध्ये राहून तो खूप आनंदी जीवन व्यतीत करतोय. डॅनीचे वडील एका मठात साधू होते, त्यामुळे तो अतिशय शांत वातावरणात वाढलाय. डॅनी ज्या प्रकारच्या भूमिका साकारतो अगदी त्याच्या विरुध्द वातावरण त्याच्या घरी बघायला मिळेल."
 
"त्याचा स्वभावही खूप शांत आहे. चित्रपट मिळाले नाहीत तरी तो आनंदी असतो. आपली कला आणखीन चांगल्या पद्धतीने सादर करता येईल असा रोल मिळाला नाही असं त्याला वाटू शकतं. त्याने हल्लीच ऊंचाई नावाच्या चित्रपटात काम केलं, पण काम करण्यासाठी त्याला खूप मनवावं लागलं. अनुपम खेर यांनी त्याला हा चित्रपट करण्यासाठी गळ घातली, सरतेशेवटी त्याने होकार दिला."
 
"डॅनीने ब्रॅड पिट सोबत सेव्हन इयर्स इन तिबेट हा हॉलिवूड चित्रपट केला होता पण त्याचा त्याने कधीच गवगवा केला नाही. त्याने सुभाष घईंचा हिरो हा चित्रपटही साइन केला होता, पण सुभाष घई यांच्यासोबत क्रिएटिव लेव्हलवर मतभेद झाल्यानंतर तो यातून बाहेर पडला."
 
आणि ऊंचाई चित्रपटात त्याने पुन्हा एकदा अमिताभ बच्चनसोबत काम केलंय. योगायोग असा की, बच्चन यांनी 1973 मध्ये बी आर चोप्रा यांच्या धुंद चित्रपटातील भूमिका नाकारली आणि डॅनीने ही भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवली.
 
विशेष म्हणजे, डॅनी जेव्हा पुण्यात शिकत होता तेव्हा बीआर चोप्रा त्याचे परीक्षक म्हणून आले होते. त्याला बघून चोप्रा म्हणाले की तुम्ही खूप वेगळ्या धाटणीचा ॲक्टर आहेस.
 
डॅनीने त्याच्या लहानपणी पाहिलेला पहिला चित्रपट होता 'नया दौर'. आणि या चित्रपटाची निर्मिती बी आर चोप्रा यांचीच होती. आणि त्यांच्याच चित्रपटात डॅनीला त्याचा पहिला रोल मिळाला होता.
 
Published By- Priya Dixit