अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आली आहे. अभिनेता सलमान खानला धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर दिसल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सलमानला आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून देण्यात आली होती.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. रविवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून फेसबुकवर धमकीची पोस्ट लिहिण्यात आली होती. ही पोस्ट पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला उद्देशून होती. “तू सलमान खानला भाऊ मानतोस, पण आता वेळ आली आहे की तुझ्या भावाने समोर येऊन तुला वाचवावं”, अशी धमकी या पोस्टद्वारे देण्यात आली होती.
दरम्यान धमकीची पोस्ट कोणी आणि कुठून केली आहे, याबद्दलचा आम्ही माहिती मिळवत आहोत. सोशल मीडिया अकाऊंट खरंच बिश्नोईचं आहे का, याचा तपास आम्ही करीत आहेत. इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस शोधण्याचाही आम्ही प्रयत्न करतोय”, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. याआधीही सलमानला बिश्नोई गँगच्या एका सदस्याने धमकीचा मेल पाठवला होता. त्याला मिळालेल्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील आणि त्याच्या सुरक्षेतही वाढ केली.
धमकीची पोस्ट
“हा संदेश सलमान खानसाठीही आहे. तुला दाऊद वाचवेल या भ्रमात राहू नकोस. तुला कोणीच वाचवू शकत नाही. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर तू दिलेल्या नाट्यमयी प्रतिक्रियेकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. आम्हा सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की तू व्यक्ती म्हणून कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध कसे होते? तू आमच्या रडारवर आहेस. याला ट्रेलर असं समज, संपूर्ण चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. तुला ज्या देशात पळायचं असेल तिथे पळ पण एक गोष्ट लक्षात ठेव की मृत्यूला व्हिसाची गरज नसते. मृत्यू कोणत्याही आमंत्रणाशिवाय येऊ शकतो”, अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे.
गिप्पी ग्रेवालचं स्पष्टीकरण
कॅनडामधील वॅनकॉवर इथल्या गिप्पी ग्रेवालच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. याची जबाबदारीसुद्धा बिश्नोईने घेतली आहे. या घटनेनंतर ग्रेवालने स्पष्ट केलं की सलमान त्याचा मित्र नाही. “माझी सलमानसोबत कुठलीही मैत्री नाही. त्याची आणि माझी भेट मौजा ही मौजाच्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी आणि बिग बॉसच्या सेटवर भेट झाली होती. मला रविवारी पहाटे १२:३० ते १ वाजेच्या दरम्यान, धमकी मिळाली. या घटनेमागील नेमकं कारण काय मला माहित नाही. मला ती धमकी पाहून खूप मोठा धक्का बसला आहे. मी यापूर्वी कधी अशा घटनेचा सामना केलेला नाही. माझे कोणासोबतही वैर नाही. या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे, मला माहित नाही. या घटनेची मी कल्पना करु शकत नाही.”