शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (09:36 IST)

फाल्गुनी पाठक: नेहा कक्कडच्या रिमिक्सवर नाराज झालेल्या 'गरबा क्वीन'बद्दल हे माहितीये?

फाल्गुनी पाठकचं नाव घेतलं की अनेकांना 90च्या दशकातील चुडी जो खनके हाथो में , तूने पायल है छनकाई, मेरी चुनर उड उड जाए यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी आठवतील. तिच्या या गाण्यांनी अनेक मुलींच्या मनात प्रेमाची हळूवार भावना निर्माण झाली. फाल्गुनी पाठकने आपल्या मधुर आवाजाने, गाण्यांनी केवळ लोकांच्या मनावर राज्य केलं नाही; तर आपल्या हटके स्टाईल स्टेटमेंटने तिने समाजातील 'जेंडर नॉर्म्स'ही मोठ्या धाडसाने चॅलेंज केले.
 
नवरात्र आले की 'गरबा क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्गुनीची सगळ्यांनाच आठवण येते. पण यावेळी नवरात्रीच्या आधीच फाल्गुनी पाठक चर्चेत आली आहे.
 
खरंतर फाल्गुनी पाठकने नेहमीच स्वतःला वाद-विवादांपासून दूर ठेवलं होतं. पण काही दिवसांपूर्वीच नेहा कक्कड आणि फाल्गुनी यांच्यातील वादाच्या बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
 
1999 साली फाल्गुनी पाठकचं 'मैंने पायल है छनकाई' हे गाणं रिलीज झालं होतं. नेहा कक्कडने 'मैंने पायल है छनकाई' या गाण्याचं 'ओ सजना' हे रिमिक्स केलं.
 
फाल्गुनीला ही रिमिक्सची कल्पना आणि नेहाचं रिमिक्स व्हर्जन दोन्ही आवडलं नाही. याच प्रकरणी फाल्गुनी आणि नेहा आमने-सामने आल्या आहेत. फाल्गुनी पाठक यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला.
 
दुसरीकडे आपलं यश हे अनेकांना खुपतं असं नेहाचं म्हणणं आहे.
 
नेहाने फाल्गुनी पाठकचं गाणं आपल्या आवाजात गायलं असून त्याचं रिमिक्स केलं आणि 'ओ सजना' नावानं रिलीज केलं. हे गाणं आल्यानंतर लोकांनी नेहाला ट्रोल करायला सुरूवात केली.
 
ही सगळी टीका फाल्गुनी पाठकपर्यंतही पोहोचत होती. जे लोक नेहा कक्कडच्या गाण्याला नावं ठेवत होते, त्या सगळ्यांच्या पोस्ट फाल्गुनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत होती. त्यावरूनच फाल्गुनीला 'मैंने पायल है छनकाई' या गाण्याचं रिमिक्स आवडलं नाही, हे कळत होतं.
 
याविषयी तिने संवाद साधला.
फाल्गुनीने म्हटलं की, "इतक्या वर्षांनंतरही त्यांचं गाणं लोकांना आवडत आहे. त्याचा आनंदच आहे. पण या गाण्याचा रिमिक्स करण्याआधी मला विचारलंही गेलं नाही याचं दुःख आहे. विचारणं तर सोडाच, मला याविषयी साधी कल्पनाही देण्यात आली नाही."
 
हा वाद सोडला तर फाल्गुनीनं फारसं कधीही आपल्या संगीतविषयक किंवा खाजगी आयुष्याबद्दल कधीही फारसं भाष्य केलं नाही.
 
पण फाल्गुनीचा आातापर्यंतचा प्रवास होता कसा?
 
चार बहिणींनंतर आई-वडिलांना हवा होता मुलगा, पण...
फाल्गुनी पाठकचा जन्म 12 मार्च 1964 साली मुंबईतल्याच एका कुटुंबात झाला. फाल्गुनीला चार मोठ्या बहिणी. त्यांच्या पाठीवर झालेली ही मुलगी. तिच्या आई-वडिलांना चार मुलींनंतर मुलगा होईल, अशी आशा होती. पण घरात आलेलं पाचवं अपत्य मुलगीच होती.
 
लहानपणापासूनच फाल्गुनीच्या मोठ्या बहिणींनी तिला मुलाप्रमाणेच वागवलं. त्यामुळे ती कधीच मुलींप्रमाणे राहिली नाही. ना कधी मुलींप्रमाणे कपडे घातले, ना कधी नटली-थटली.
 
आज इतकी वर्षं झाली तरी फाल्गुनीने आपली वेशभूषा आणि आपला लूक बदलला नाहीये. छोटे केस, शर्ट किंवा टी-शर्ट आणि पँट हा तिचा लूक आजतागायत कायम आहे.
वयाच्या 9 व्या वर्षी फाल्गुनी पाठकने आपला पहिला स्टेज शो केला. लहानपणीच अनेक गाण्यांसाठी आपला आवाज दिला होता. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1998 साली फाल्गुनी पाठकचा पहिला अल्बम रिलीज झाला होता.
 
भारताची 'मॅडोना' म्हणून ओळख
90 च्या दशकात फाल्गुनीची गाणी प्रत्येकाला तोंडपाठ असायची आणि अनेक कार्यक्रमात तिची गाणीही वाजवली जायची.
 
1994 मध्ये फाल्गुनी पाठकनं ' ता-थाईया' नावानं स्टेज बँड सुरू केला. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही हा बँड खूप चांगला परफॉर्म करायच्या. 1998 साली फाल्गुनी पाठकने युनिव्हर्सल म्युझिकसोबत 'याद पिया की आने लगी' हा आपला पहिला अल्बम प्रसिद्ध केला. हे गाणं प्रचंड गाजलं आणि फाल्गुनीला रातोरातं प्रसिद्धी मिळाली. हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं की, जवळपास सगळ्या लग्नसमारंभात गाजू लागलं.
फाल्गुनीच्या गाण्यात प्रेम हेच केंद्रस्थानी असायचं. 'याद पिया की आने लगी'नंतर फाल्गुनीच्या यशस्वी गाण्यांची मालिकाच सुरू झाली.
 
मैंने पायल है छनकाई - 1999, दे ताली - 1999, मेरी चुनर उड़ उड़ जाए - 2000, ओ पिया - 2001, ये कैसा जादू किया - 2002, दिल झूम झूम नाचे - 2004, श्री कृष्ण गोविंद - 2003, अर्पण - 2008, डांडिया क्वीन हिट्स - 2014, द गोल्डन मेलोडी - 2014, बेस्ट ऑफ धुन्स एंड भजन - 2013 फाल्गुनीची गाणी इतकी गाजायला लागली की तिला 'भारतीय मॅडोना' असंच म्हटलं गेलं.
 
किती फी घेते फाल्गुनी?
फाल्गुनीनं केवळ रोमँटिक गाणीच नाही, तर नवरात्रीमध्ये गायली जाणारी भक्तिगीतंही गायली आहेत.
गरबा-दांडिया तर फाल्गुनीशिवाय अपूर्ण वाटतात. नवरात्रीमध्ये फाल्गुनीच्या सुपरहिट गाण्यांची मागणी असते. मुंबईपासून परदेशापर्यंत नवरात्रीच्या वेळी त्यांचे अनेक स्टेज शो होतात. नवरात्रीमध्ये फाल्गुनी एका स्टेजसाठी लाखोंचं मानधन घेते, असं सांगितलं जातं.
 
नवरात्रीतल्या 11 दिवसांसाठी फाल्गुनी पाठकने 1.40 कोटी रूपये चार्ज केले असल्याच्याही बातम्या होत्या.
याबद्दल एका न्यूज चॅनेलशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं, "हो, मी 1.40 कोटी रुपये घेतले होते. पण या सगळ्या रकमेवर फक्त माझा एकटीचाच अधिकार नसतो ना...माझी 40 लोकांची टीम आहे. लाइट मेन, साउंड इंजिनिअर, कॉश्च्यूम डिझायनर आहेत. त्यामुळे मला ही रक्कम सर्वांमध्ये वाटावी लागते. आम्ही सर्वच जण खूप मेहनत करतो."
 
गाण्यांमधून गुजराती संस्कृती
फाल्गुनीची लोकप्रियता परदेशातही आहे. आज फाल्गुनी ज्या स्थानी आहे, ते तिनं आपलं संगीत आणि कठोर मेहनतीनं मिळवलं आहे. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या फाल्गुनीने आपल्या गाण्यांमधून गुजराती संस्कृतीची झलक दाखवली आहे. तिने जेव्हा आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा अलका याज्ञिक, उदित नारायण, कुमार शानू, कविता कृष्णमूर्ती असे अनेक मोठे गायक-गायिका गाजत होते.
 
अशावेळी चित्रपटातली गाणी न गाणं आणि आपल्या स्वतःच्या खास शैलीत गाणं हे खूप कठीण होतं. गाण्यांमध्ये स्वतःही झळकत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करणं हे अतिशय कठीण होतं. पण तिनं स्वतःचा मार्ग स्वतः बनवला.
 
खासगी आयुष्यावर चर्चा नाही
फाल्गुनीने नेहमीच आपलं करिअर आपल्या अटीशर्तींवर घडवलं आहे. चित्रपट क्षेत्रात जिथे पार्श्वगायनासाठी दमछाक करणारी स्पर्धा होती, तिथे फाल्गुनी कोणत्याही स्पर्धेचा भाग बनायला तयार नव्हती.
जे मिळत होतं, त्यामध्ये ती खूश होती. फाल्गुनीचा एकाच गोष्टीवर आक्षेप होता...आपल्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा करणं. कामाशिवाय कोणीही आपल्या खासगी आयुष्यावर चर्चा करावी ही गोष्ट तिला कधीच मान्य नव्हतं.फाल्गुनीने लग्न केलं नाही. केवळ संगीतावरच प्रेम केलं.
 
गाण्यांच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त फाल्गुनी टेलिव्हिजनवरील काही प्रसिद्ध कार्यक्रमांमध्येही झळकली आहे. तारक मेहता का उलटा चष्मा, कौन बनेगा करोडपती, स्टार दांडिया धूम, कॉमेडी नाइट्स विथ कपिल तसंच बा, बहू और बेटीमध्ये फाल्गुनी दिसली होती.