मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (11:19 IST)

Father's Day: वडील-मुलांच्या नात्यांवर आधारित हे 7 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

हर्षल आकुडे
चित्रपट हे समाजाचा आरसा असतात असं म्हटलं जातं. समाजातील विविध विषयांचं दर्शन चित्रपटांमधून आपल्याला घडतं. पण एक विषय मात्र चित्रपटांमध्ये फारच कमी पाहायला मिळतो. तो म्हणजे वडील आणि मुलांच्या नात्याचा.भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आई आणि मुलांच्या नात्यावरचे अनेक चित्रपट आले. पण वडील आणि मुलाच्या नात्याच्या विषयाचा चित्रपटसृष्टीने फारच कमी वेळा स्पर्श केला.
 
बहुतांश चित्रपटांमध्ये वडिलांचं आणि मुलांचं नातं हे अत्यंत संवेदनशील आणि तणावपूर्ण असल्याचंच चित्रण करण्यात येत होतं. पण गेल्या काही दिवसांपासून या नात्याची एक वेगळी ओळख आपल्याला करून देण्यात येत आहे.वडील आणि मुलांच्या नात्याचं अत्यंत सुरेखपणे चित्रण करण्यात आलेले चित्रपटही आता बनू लागले आहेत.
आज फादर्स डे. त्या निमित्ताने वडील आणि मुलांच्या नात्याची अत्यंत सुंदररित्या मांडणी करणाऱ्या 7 लोकप्रिय चित्रपटांची आपण आज माहिती घेऊ.
 
1. लक्ष्य
लक्ष्य हा चित्रपट अभिनेता हृतिक रोशनच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटातून हृतिकच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांच्या समोर आली.
एक बिनधास्त, मौजमस्ती करणारा कॉलेज तरूण पुढे जाऊन लष्करी अधिकारी कसा बनतो आणि कारगिलमध्ये भारतासाठी लढतो, अशी या चित्रपटाची कहाणी आहे.
यामध्ये हृतिकच्या वडिलांची भूमिका बोमन इराणी यांनी केली आहे. चित्रपटात हृतिक आणि बोमन यांच्या नात्यातील घालमेल, हृतिकच्या मनातील अस्वस्थता, अखेर वडिलांना काहीतरी करून दाखवण्याची त्याची इच्छा आदी गोष्टी अतिशय भावनिक पद्धतीने पडद्यावर मांडण्यात आल्या आहेत.
2004 साली प्रदर्शित झालेला फरहान अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट अजूनही फ्रेश वाटतो. चित्रपट अनेकवेळा टीव्हीवर लागतो. त्यामुळे तुम्ही चित्रपट पाहिलेला असण्याची शक्यता आहे. पण पाहिला नसल्यास एकदा नक्की पाहा..
 
2. दंगल
अभिनेता आमीर खानच्या चित्रपट कारकिर्तीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक म्हणून दंगल चित्रपटाची ओळख आहे. दंगल चित्रपट हरयाणातील फोगाट या पैलवान कुटुंबाच्या आयुष्यावर आधारित आहे.आमीर खानने या चित्रपटात बलबीर फोगट यांची भूमिका केली आहे. ते आपल्या तिन्ही मुलींना पैलवान बनण्याचं प्रशिक्षण कसं देतात, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे बनवतात, हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे.
या चित्रपटात वडील आणि त्यांची मुलं यांचं नातं अतिशय संवेदनशीलपणे उलगडून दाखवण्यात आलेलं आहे. हा चित्रपटही एकदा पाहायलाच हवा.
 
3. पा
पा चित्रपट 2008 साली प्रदर्शित झाला होता. एक दुर्मिळ आजार असलेल्या मुलाची आगळीवेगळी कहाणी या चित्रपटात पाहायला मिळते.अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांसारखे कसलेल्या अभिनेत्यांनी या चित्रपटाला आणखीनच दर्जेदार बनवलं.
विशेष म्हणजे यात वडिलांची भूमिका अभिषेक बच्चनने तर त्यांच्या मुलाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
4. वेक अप सिड
रणबीर कपूर अभिनीत वेक अप सिड या चित्रपटाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
रणबीर (सिड मेहरा) या चित्रपटात एक मस्तीखोर, आळशी कॉलेजवयीन तरूण असतो. कॉलेजला जाणं त्याला आवडत नसतं.पुढे काय करायचं हेसुद्धा त्याने ठरवलेलं नसतं. त्यातून तो आणि त्याचे वडील अनुपम खेर (राम मेहरा) यांच्यासोबत त्याचा वाद होतो.त्यानंतर ते त्याला घरातून बाहेर काढतात. त्यानंतर पुढे काय होतं, त्याचं आयुष्य कसं नवं वळण घेऊन त्याला एक जबाबदार व्यक्ती बनवतं, याबद्दल हा चित्रपट आहे.
 
5. उडान
वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारीत चित्रपटांमध्ये उडानचा उल्लेख केल्याशिवाय ही यादी पूर्ण होणार नाही. वडिलांना 'सर' म्हणावं लागणाऱ्या एका मुलाची ही कथा.
हॉस्टेलचं जीवन पूर्ण करून आठ वर्षांनी घरी परलेला मुलगा रागीट वडिलांच्या तावडीत सापडतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कशा प्रकारच्या नाट्यमय गोष्टी घडतात, हे अतिशय चतुरपणे चित्रित करण्यात आलं आहे.रोनित रॉय यांनी वडिलांची भूमिका अतिशय चोखपणे बजावली आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळी सुरुवातीला चालला नाही. पण नंतर माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.
 
6. रिंगण
मकरंद माने दिग्दर्शित रिंगण चित्रपटही वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
दुष्काळ आणि कर्जाच्या रिंगणात अडकलेल्या एका शेतकऱ्याची व त्याच्या मुलाची ही कथा. मृत आईचा शोध घेण्यासाठी तो निघालेला असतो. आई देवाघरी गेल्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी तो पंढरपूरला जातो.
पण त्यादरम्यान पितापुत्रांचं नातं कसं वृद्धिंगत होत जातं, याचं नाट्यमय चित्रण चित्रपटात करण्यात आलं आहे. शशांक शेंडे आणि साहील जोशी यांच्या अभिनयाने चित्रपटाला अतुल्य उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
 
7. फॅंड्री
फँड्री अर्थात डुक्कर. नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री हा चित्रपट एकूणच डुक्कर पकडणाऱ्या वंचित समाजातील एका मुलाबद्दल आहे. पण चित्रपटाच्या कथेला एक किनार वडील-मुलगा या नात्याचीही आहे.
किशोर कदम यांनी यामध्ये वडिलांची तर सोमनाथ अवघडेने त्यांच्या मुलाची (जब्या) भूमिका आहे. फँड्री हा चित्रपट समाजातील विषम स्थितीवर जळजळीत भाष्य करतो. पण तितक्याच हळुवारपणे तो वडील आणि मुलाच्या नात्यातील चढ-उतारही दर्शवतो.
मुलाने आपलं पारंपारिक काम करावं, त्याच्या कोणत्याही वागण्याचा त्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये, यासाठी चिंताग्रस्त असलेल्या वडिलांची भूमिका किशोर कदम यांनी त्यांच्या शैलीत रंगवली.
फँड्री चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. हाच चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला होता.