रोहन टिल्लू
सुपरस्टार रजनीकांत यांचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस. त्यानिमित्ताने रजनीकांत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा एक किस्सा पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि चित्रपटसृष्टी यांचं नातं वेगळंच होतं. बाळासाहेबांच्या हयातीत 'मातोश्री'नं चित्रपटसृष्टीतल्या अनेक तारेतारकांचा पाहुणचार केला. यातलाच एक मोठा तारा म्हणजे रजनीकांत!
2010मध्ये रजनीकांत यांचा 'रोबोट' म्हणजेच तामीळ भाषेतला 'एंद्रीयन' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत या भेटीचे साक्षीदार होते.
"या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेबांनी त्यांचं वेळापत्रक थोडंसं बाजूला सारून ही भेट घेतली होती," राऊत यांनी त्या वेळची आठवण सांगितली.
"बाळासाहेब दुपारच्या वेळी विश्रांती घेत. रजनीकांत भेटायला येणार असल्यानं त्यांनी दुपारची विश्रांती बाजूला सारली होती," राऊत यांना ही भेट अजूनही आठवते.
"मी त्या वेळी बाळासाहेबांना भेटलो होतो. मी निघत असताना बाळासाहेबांनी मला थांबायला सांगितलं. 'एक मोठी व्यक्ती येणार आहे, भेटून जा' असं ते सारखं म्हणत होते. पण कोण येणार, हे काही त्यांनी सांगितलं नाही."
"बाळासाहेबांनी बाहेर फोन करून पाहुणे कधी येणार ते विचारलं. बाहेरून त्यांना सांगण्यात आलं की, पाहुणे 'मातोश्री'च्या गेटवर पोहोचले आहेत. मग बाळासाहेब मला म्हणाले की, तीन चार मिनिटांमध्ये पाहुणे येतीलच," राऊत यांनी सांगितलं.
रजनीकांत बाळासाहेब बसलेल्या खोलीत आले, तो क्षण राऊतांना अजूनही आठवतो.
"थोड्या वेळानं दरवाजा उघडला आणि 'जय महाराष्ट्र साहेब' असं खणखणीत आवाजात म्हणत रजनीकांत आले. साधेसेच कपडे, आपण सुपरस्टार असल्याचा कोणताही बडेजाव नाही..." राऊत यांनी तो क्षण जिवंत केला.
रजनीकांत यांना प्रत्यक्ष बघून भांबावून गेल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
"ते दक्षिणेतले महानायक आहेत. पण ते आले ते अगदी साध्या कपड्यांमध्ये. त्यांचं वागणं, बोलणं खूप साधं होतं," राऊत सांगतात.
रजनीकांत आले तोच त्यांनी बाळासाहेबांना वाकून नमस्कार केला. या संपूर्ण भेटीदरम्यान रजनीकांत जास्तीत जास्त वेळ मराठीतूनच बोलत होते, असंही राऊत यांनी सांगितलं.
रजनीकांत यांचं मराठी एवढं चांगलं कसं, असंही राऊत यांनी रजनीकांत यांना विचारलं. त्यावर रजनीकांत यांनी उत्तर दिलं, "मी महाराष्ट्रातलाच आहे. नंतर कर्नाटक आणि तामिळनाडूत गेलो. तिथला झालो असलो, तरी मराठी आवर्जून बोलतो."
त्या भेटीत बाळासाहेब आणि रजनीकांत यांच्यात मुख्यत्त्वे रजनीकांत यांच्या चित्रपटाविषयी चर्चा झाली. 'रोबोट' या चित्रपटात त्यांनी काही साहसी दृश्यं चित्रीत केली होती.
वयाच्या 62व्या वर्षातही रजनीकांत एवढे तंदुरुस्त कसे राहू शकतात, असा प्रश्नही बाळासाहेबांनी विचारल्याचं राऊत सांगतात.
"बाळासाहेबांना त्या चित्रपटातल्या तंत्रज्ञानाविषयी माहिती हवी होती. ते त्याबद्दल रजनीकांत यांना विचारत होते."
"तसंच रजनीकांत यांच्या चित्रपटांना तामीळनाडूत कसा प्रतिसाद असतो, मुंबईत त्यांच्या चित्रपटांना प्रतिसाद मिळतो का, कोणत्या भागांमध्ये मिळतो, असे अनेक प्रश्न बाळासाहेबांनी विचारले," राऊत सांगतात.
या भेटीदरम्यान रजनीकांत खूप मोकळेपणानं अनेक विषयांवर बोलल्याची आठवण राऊत सांगतात.
राऊत यांच्या आठवणीप्रमाणे त्या वेळी तामीळनाडूतल्या राजकारणाबाबतही रजनीकांत यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली होती. ही चर्चा विस्तृत नसली, तरी त्यांच्यात बोलणं झाल्याचं राऊत सांगतात.
"बाळासाहेब आणि रजनीकांत त्या आधीही एकमेकांशी बोलले होते. पण ही भेट ऐतिहासिक होती. दोन महानायक एकमेकांना भेटले होते. एकमेकांबद्दल वाटणारा आदर त्या भेटीतून दिसत होता. रजनीकांत यांनी तर स्पष्टच केलं की, बाळासाहेब हे त्यांच्यासाठी देवासमान आहेत," राऊत या भेटीबद्दल सांगतात.
(ही स्टोरी 31 डिसेंबर 2017 ला पहिल्यांदा प्रसिद्ध झाली होती.)