गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (08:35 IST)

जवान : शाहरूख म्हणतोय, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’

jawan
अभिनेता शाहरुख खानच्या बहुचर्चित जवान चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर  31 ऑगस्टला रिलीज झाला आहे.
या ट्रेलरमध्ये शाहरुख खानच्या तोंडून एकापेक्षा एक जबरदस्त संवाद ऐकायला मिळत असून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतं.
 
आज दुपारी 12 च्या सुमारास ट्रेलर युट्यूबवर रिलीज झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. अडीच तासांतच 40 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा ट्रेलर युट्यूबवर पाहिला.
 
सोशल मीडियावर ट्रेलरवर अनेक प्रतिक्रिया येत असून वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पठाण चित्रपटानंतर आता जवानच्या निमित्ताने शाहरुख बॉक्स ऑफिसवर साम्राज्य करणार असं बोललं जात आहे.
 
विशेषतः शाहरुखच्या पात्राच्या तोंडून असलेल्या ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ चा संवादाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
 
हा संवाद म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असल्याचा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. वरील डायलॉग्जव्यतिरिक्त अनेक दणकेबाज संवाद चित्रपटामध्ये पाहयाला मिळतात.
 
जवान चित्रपट हा येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा प्रीव्ह्यू (टिझर) 10 जुलै रोजी रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. विशेषतः टिझरमध्ये शाहरुख चार ते पाच वेगवेगळ्या रुपात दिसत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये यामुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
 
त्यानंतर, जवान चित्रपटाचा ट्रेलरही येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या प्रतिक्षेत होते.
 
अखेर, चित्रपट प्रदर्शित होण्यास केवळ 8 दिवस बाकी असताना जवानचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला दाखल झाला. अपेक्षेप्रमाणेच त्याला प्रेक्षकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 
ट्रेलरमध्ये शाहरुखव्यतिरिक्त दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपति यालाही बऱ्यापैकी स्थान देण्यात आलं आहे. आपल्या अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या विजयचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे.
 
खरं तर, काही दिवसांपूर्वी विजय सेतूपति हा शाहीद कपूरच्या फर्जी नामक वेब सिरीजमध्ये दिसला होता. पण व्यावसायिक सिनेमाचा विचार करता विजयचा पहिला चित्रपट म्हणून सर्वांची त्याच्याकडे नजर असेल.
 
मोठ्या स्टार्सची मांदियाळी
या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकांमध्ये आहेत.
 
याखेरीज दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोगरा, सुनिल ग्रोव्हर आणि मुकेश छाब्रा या चित्रपटात दिसतील.
 
या चित्रपटात शाहरुखचे अनेक लुक्स दिसत आहेत.
 
कधी तो टकला आहे, कधी पोलिसाच्या वेशात, कधी सैन्य अधिकाऱ्याच्या वेशात. एक लूक 'रईस' चित्रपटात होता तसा मोठ्या केसांचाही आहे. एकूण शाहरुख यात 6 लूकमध्ये दिसला आहे.
 
एका ठिकाणी शाहरुखने सैन्याचा गणवेश घातला आहे आणि निळा गणवेश घातलेले सैनिक त्याला सलामी देत आहेत असं दिसतंय.
 
शाहरुखचा मागचा चित्रपट 'पठाण' ब्लॉकब्लस्टर ठरला होता. जेव्हापासून 'जवान' चा ट्रेलर आलाय, सोशल मीडियावर त्याने धुमाकूळ घातला आहे.
 
असं म्हटलं जातंय की 'जवान' पठाणपेक्षा पण जास्त हिट ठरेल आणि जास्त कमाई करेल. या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 150 कोटींपेक्षा जास्त असेल असंही म्हटलं जातंय.
 





Published By- Priya Dixit