शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जुलै 2018 (12:58 IST)

करिना पुन्हा शाहरूखसमवेत!

karina
करिना कपूरने शाहरूख खानबरोबर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका केल्या आहेत. त्यामध्ये 'कभी खुशी कभी गम', 'अशोका', 'रा-वन' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता ती पुन्हा एकदा शाहरूखसमवेत झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'सॅल्यूट'! हा चित्रपट भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. रशियाच्या यानातून राकेश शर्मा अंतराळ प्रवासासाठी गेले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यावेळी त्यांना विचारले होते की 'अंतराळातून भारत कसा दिसतो?' त्यावर राकेश शर्मा यांनी 'सारे जहाँ से अच्छा' असे सुंदर उत्तर दिले होते. राकेश शर्मा हे नेहमीच भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो' आणि त्याचबरोबर सर्व जनतेसाठीही प्रेरणादायक व्यक्तित्त्व राहिलेले आहे. त्यांच्या जीवनावरील चित्रपटात आमिर खान असेल, अशी आधी अटकळ होती. मात्र, काही कारणाने आमिर ऐवजी शाहरूख त्यांच्या भूमिकेत   दिसणार आहे.
 
स्वतः आमिरनेच शाहरूखचे नाव सुचवल्याचे म्हटले जाते. (तसे पाहता राकेश यांच्या चेहरेपट्टीशी आमिरपेक्षा शाहरूखचा चेहराच अधिक जवळचा आहे!) या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठीही शोध सुरू होता. आता करिना कपूरने या चित्रपटाला होकार दिल्याने हा शोध संपला आहे. अलीकडेच करिनाचा 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता व त्याला चांगले यशही मिळाले आहे.