शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2017 (06:49 IST)

दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्‍वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्‍वनाथ यांना जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने 2016 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी के. विश्वनाथ यांच्या नावाच्या केलेल्या शिफारशीला माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी  संमती दिली. भारतीय चित्रपटाच्या विकासासाठी केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. सुवर्णकमळ, 10 लाख रुपये रोख आणि शाल या स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या 3 मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
 
मानवी आणि सामाजिक विषयांवरचे त्यांचे चित्रपट समाजमनाला मोठ्या प्रमाणात भावले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या विश्‍वनाथ यांनी कला, संगीत आणि नृत्य अशा विविध संकल्पनांवर आधारित चित्रपटांच्या मालिकाही केल्या आहेत. “शंकराभरणम’ या त्यांच्या चित्रपटाला जगभरातून कौतुक झाले आहे. विश्‍वनाथ यांना 1992 मध्ये पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले आहे. 5 राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.