शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 28 एप्रिल 2022 (21:39 IST)

अजय देवगणशी ट्विटरवर वाद घालणाऱ्या किच्चा सुदीपला काजोल आवडायची?

पराग छापेकर
अचानक इंटरनेटच्या सर्च इंजिनवर कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपबद्दल वाढलेली खळबळजनक चर्चा दाक्षिणात्य डबिंग सिनेमाच्या फॅन मंडळींचं लक्ष वेधून घेत आहे. 48 वर्षांचा सुदीप संजीव अर्थात कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप सध्या एका वादामुळे चर्चेत आलाय.
 
ही गोष्ट खरं तर एका ट्वीटने सुरू झाली होती. मात्र अजय देवगणने किच्चा सुदीपच्या त्या ट्विटवर सडेतोड प्रत्युत्तर दिल्यामुळे या गोष्टीचं रूपांतर वादात झालं. 'फ्लॉवर टू फायर' झालेल्या या प्रकरणाचा केंद्रबिंदू होती 'हिंदी भाषा'.
 
सुदीपने 'हिंदी आता राष्ट्रभाषा नाही' अशा आशयाचं एक ट्वीट केलं होतं. यावर अजय देवगणकडून ट्वीटरवर प्रत्युत्तर आलं की, जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून रिलीज कशासाठी करता? आणि इथूनच वादाला सुरुवात झाली. या ट्विट्स नंतर ट्विटरचा ट्रेल लांबतचं गेला. दोघांनी ही एकमेकांना उत्तरं प्रत्युत्तर, स्पष्टीकरणं दिली.
 
असो, किच्चाबद्दल आता बरीच किचकीच झाली असली तरी तो कोण आहे याबद्दल ही लोकांमध्ये उत्सुकता वाढीला लागली आहे. आता जे लोक साऊथच्या डब केलेल्या चित्रपटांचे शौकीन आहेत त्यांना किच्चा हे नाव तसं काही नवं नाही.
 
किच्चाला काजोल आवडायची
आता किच्चा सुदीप कोण या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. ती म्हणजे किच्चा सुदीपला अजय देवगण फार पूर्वीपासूनचं आवडत नाही. काही वर्षांपूर्वी सुदीपने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याला सुरुवातीपासूनच अजय आवडत नव्हता कारण त्याचं पहिलं क्रश काजोल होती. सुदीप पुढे सांगतो की, तो काजोलचे पोस्टर्स आणि मॅगझिनमधले फोटो गोळा करून आपल्या घराच्या भिंतींवर लावायचा.
 
कर्नाटकातील शिमोगा इथं 2 सप्टेंबर 1973 रोजी जन्मलेल्या सुदीपबद्दल सांगायचं झालंच तर सुदीप बंगळुरूच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीधर आहे. शालेय जीवनापासून उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या सुदीपला चित्रपटांच्या झगमगत्या दुनियेची भुरळ पडली. आणि यातूनच रोशन तनेजा यांच्याकडून अभिनय शिकून तो फिल्मी दुनियेत आला.
 
आता सुदीपला चित्रपटांची भुरळ पडली त्याला अजून एक कारण होतं. ते म्हणजे त्याचे हॉटेलियर वडील चित्रपटांचे निर्माते होते. सुदीपने कन्नड चित्रपट जास्त केले असले तरी त्याने तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय.
 
प्रेमा कादंबरी या टीव्ही मालिकेतून मोठ्या पडद्यावर आलेल्या सुदीपने 1997 मध्ये थायवा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे एसएस राजामौली यांच्या एगा (हिंदीमध्ये मक्खी) या चित्रपटातून त्याला देशात आणि जगात ओळख मिळाली. तसं तर त्याने कन्नडमध्ये स्पर्शा, हुच्चा, वीरा मदाकरी, रन, हेब्बुली, द व्हिलन, पैलवान असे चित्रपट केले आहेत. हुच्चा, नंदिनी आणि स्वाती मुथूसाठी त्याला सलग तीन वर्षे कन्नड फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालायं.
 
सुदीप आपल्या नावाआधी 'किच्चा' का लावतो, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात येत असेल. तर 2001 मध्ये आलेल्या 'हुच्चा' या चित्रपटातील किच्चा या व्यक्तिरेखेमुळे त्याला हे नाव मिळालं. त्या पात्राची लोकप्रियता इतकी वाढली की सुदीपची कारकीर्दच बदलून गेली. अभिनयासोबतच सुदीपने दिग्दर्शन, गायन आणि पटकथा लेखनातही आपलं नशीब आजमावलय. त्याने 20 हून अधिक चित्रपटांमध्ये गाणीही गायली आहेत.
 
'मक्खी' या चित्रपटाने त्याला हिंदी इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवून दिली.
 
2008 मध्ये राम गोपाल वर्माच्या फुंक मधून हिंदीमध्ये पदार्पण करणाऱ्या सुदीपने रन, फुंक 2, रक्तचरित्र पार्ट वन, पार्ट टू, सलमान खानचा दबंग 3 आदि चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. जेव्हा दबंग 3 च्या प्रमोशनसाठी किच्चा त्याच्या टीमसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता तेव्हा त्याच्या मिश्किल स्वभावाचं अनेकांनी कौतुक केलं होतं.
 
किच्चा सुदीपशी संबंधित वाद
किच्चाने कन्नड बिग बॉस हा शो सुद्धा होस्ट केलाय. 2001 मध्ये त्याने एका एअरलाइन कंपनीत काम करणाऱ्या प्रिया राधाकृष्णन हिच्याशी लग्न केलं. दोघांना सानवी नावाची मुलगीही आहे. वंचित मुलांना मदत करण्यासाठी 'किच्चा सुदीप चॅरिटेबल ट्रस्ट' नावे त्याची एक ट्रस्ट आहे.
 
सुदीपशी संबंधित अनेक वादही आहेत. 2009 मध्ये जस्ट मथमताली या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याचा अभिनेत्री राम्यासोबत वाद रंगला होता. राम्याच्या कथित वाईट वागणुकीमुळे तो चिडला होता.
 
त्यानंतर कंवरलाल चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक सागरला थोबाडीत मारल्याचा आरोप किच्चावर करण्यात आला होता. ते आरोप फेटाळताना तो याला मूर्खपणा म्हणाला होता. 2011 मध्ये हुबळी येथे एका क्रिकेट सामन्यात शिवराज कुमार यांच्यासोबतचं त्याच भांडण गाजलं होत. त्याच वर्षी, केम्पेगौडाच्या निर्मात्याने त्याला एका चित्रपटासाठी दिलेले 15 लाख रुपये व्याजासह परत करण्यास सांगितले होते. आणि यावरून मोठा वाद रंगला होता.
 
किच्चावर नेहमीच तो प्रचंड रागीट आणि अहंकारी असल्याचा आरोप होतो. आपल्या सहकलाकारांसोबत त्याचे नेहमीच मतभेद असल्याचा चर्चा कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये होत असतात.