कन्नड चित्रपटांतील सुपरस्टार दर्शन थुगुदीपा यांना एका हत्येच्या प्रकरणात जवळपास 12 दिवसांपूर्वी (11 जून) अटक करण्यात आली आहे. ज्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे, ते एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं आहे. रेणुकास्वामी नावाच्या एका फॅनच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकूण 17 जणांमध्ये दर्शन यांचा समावेश आहे. रेणुकास्वामी यांचा मृतदेह एका नाल्यामध्ये सापडला होता.
बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी रेणुकास्वामी यांची हत्या 'अत्यंत क्रूर आणि निर्घृणपणे' करण्यात आली होती असं सांगितलं. मृत रेणुकास्वामी एका फार्मा कंपनीत काम करत होते. त्यांनी सोशल मीडियावर अभिनेत्री पवित्रा गौडा हिला कथितरित्या काही आक्षेपार्ह संदेश पाठवले होते. त्यामुळंच अभिनेते दर्शन प्रचंड रागात होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये अभिनेत्री पवित्रा गौडा ही दर्शन यांची गर्लफ्रेंड असल्याचंही म्हटलं आहे. अटक झालेल्यांमध्ये पवित्राचाही समावेश आहे. पोलिसांनी दर्शन आणि पवित्रा यांच्या विरोधात हत्या, अपहरण, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे आरोप निश्चित केले आहेत. दर्शन सध्या तुरुंगात असून त्यांनी या आरोपांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र, त्यांचे वकील रंगनाथ रेड्डी यांनी बीबीसीशी बोलताना अभिनेते दर्शन यांना त्यांच्यावरील सर्व आरोप अमान्य असल्याचं म्हटलं आहे. "सध्या हे सर्व आरोप आहेत. पोलिसांकडेही दर्शन यांच्या विरोधात ठोस पुरावा नाही. दर्शन आणि पवित्रा यांचं लग्न झालेलं असल्याचं वृत्तही पूर्णपणे खोटं आहे," असं दर्शन यांचे वकील म्हणाले.
बॉक्स ऑफिसवर यशाची गॅरंटी
कन्नड चित्रपट सृष्टीतील 'सर्वांत विश्वासार्ह स्टार' अशी ओळख असलेल्या दर्शन यांनी जवळपास 60 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी अनेक चित्रपट मोठे हिट ठरलेआहेत. चित्रपट समीक्षक एस शिव कुमार यांच्या मते, "दर्शन कन्नड सिनेसृष्टीतील सर्वात मोठे स्टार आहेत. कर्नाटकात त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. इथं रिक्षांच्या मागे नेहमी त्यांचे पोस्टर पाहायला मिळतात. त्यांचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चाहते त्यांच्या होर्डिंग्जला दुग्धाभिषेकही करतात." कन्नड चित्रपट निर्माते योगीश द्वारकेश यांच्यामते, दर्शन असे अभिनेते आहेत ज्यांच्या चित्रपटाला चांगलं ओपनिंग मिळेल याची खात्री असते. त्याचे चित्रपट जवळपास 400 चित्रपटगृहांत 600-700 स्क्रीनवर एकाच वेळी प्रदर्शित होतात. चाहते त्यांची पुजा करतात आणि त्यांचे चित्रपटही जवळपास प्रत्येकवेळी चांगलीच कमाई करतात.
दर्शन यांच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'काटेरा' चित्रपटानंही 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तो एक मोठा हिट चित्रपट ठरला होता. दर्शन एका चित्रपटासाठी जवळपास 20 ते 25 कोटी रुपये इतकं मानधन घेतात, असं रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. प्रादेशिक चित्रपटसृष्टीचा विचार करता हा मोठा आकडा आहे. कारण प्रादेशिक चित्रपटांचं बजेट हे अत्यंत कमी असतं. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत बहुतांश चित्रपट हे शक्यतो एकाच राज्यात प्रदर्शित होतात. 11 जूनला पोलीस म्हैसूरच्या हॉटेलमध्ये दर्शन यांचा अटक करण्यासाठी पोहोचले त्यावेळीही ते त्यांचा आगामी चित्रपट 'डेव्हिल'चं शूटिंग करत होते.
त्यांना नाट्यमय पद्धतीनं झालेली अटक आणि त्यानंतरचा घटनाक्रम अजूनही कर्नाटकच्या माध्यमांतील चर्चेचा विषय आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे दर्शन किंवा इतर आरोपींच्या विरोधात नेमके काय पुरावे आहेत, याबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण स्थानिक माध्यमं पोलिसांतीलत्रांच्या हवाल्यानं दर्शन यांचा आरोपी असा उल्लेख करत आहेत.
वृत्त वाहिन्यांवर एक अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज दाखवलं जात आहे. त्याआधारे तो रेणुकास्वामी यांच्या अपहरणाचा व्हीडिओ असू शकतो, असा दावा पत्रकार करत आहेत. रेणुकास्वामी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचीही चांगलीच चर्चा सुरू आहे. हत्येच्या रात्री दर्शननं जे शूज वापरले होते ते त्यांची पत्नी विजयलक्ष्मीच्या घरातून जप्त करण्यात आले असल्याचा दावाही माध्यमांनी केला आहे.
दर्शन यांचं खासगी जीवन
या संपूर्ण प्रकरणामध्ये आता दर्शन यांचं खासगी जीवनही संशयाच्या फेऱ्यात अडकलं आहे. त्यांचे पत्नी आणि प्रेयसीबरोबर असलेले संबंध याबाबतही चर्चा होत आहेत. जानेवारी 2024 मधील पवित्रा यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनुसार त्या आणि दर्शन जवळपास गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अभिनेत्याला अटक झाल्यामुळं आता ही पोस्ट व्हायरल होत आहे. दर्शन यांचे वडील कन्नड चित्रपटांचे अभिनेते श्रीनिवास थुगुदीपा हे होते. श्रीनिवास 70 च्या दशकांतील कन्नड चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. निर्माते योगीश दर्शन त्यांना 30 वर्षांच्या आधीपासून ओळखतात. "दर्शननं सुरुवातीपासूनच जीवनात खूप संघर्ष पाहिला आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यानंतर दर्शननं एका सिनेमॅटोग्राफरबरोबर पहिली नोकरी केली. त्याठिकाणी ते सेटवर लायटिंग क्रू म्हणून 150 रुपये मजुरीवर काम करत होते," असं योगीश सांगतात.
पण, दर्शन यांचं व्यक्तिमत्त्वं खास असल्यानं त्यांना सगळे अभिनय करण्याचा आग्रह करत होते. त्यानंतर दर्शन यांनी चित्रपटांत आणि टीव्हीवर लहान-सहान भूमिका करायला सुरुवात केली. 2002 मध्ये त्यांना एक मोठा ब्रेक मिळाला 'मॅजेस्टिक' चित्रपटात त्यांनी एका ठगाची भूमिका केली होती. त्या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि स्टार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. चित्रपट समीक्षक आणि कन्नड चित्रपटसृष्टीवर पुस्तक लिहिणारे लेखक मुरलीधर खजाने यांच्या मते, या चित्रपटानं दर्शनच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यांना समाजातील तळागाळातील लोकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आणि या वर्गाचे हिरो म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
2005-06 मध्ये दर्शनबरोबर एका चित्रपटात काम करणाऱ्या निर्माते योगीश यांच्या मते, सुरुवातीच्या काळात दर्शन अत्यंत विनम्र, मेहनती आणि शिस्तबद्ध होते. "मी त्याचवेळी म्हटलं होतं की, हा एक दिवस चाहत्यांच्या गळ्यातील ताईत होईल, आणि ते खरं ठरलं,"असं योगीश म्हणाले. कन्नड चित्रपटांशी संबंधित शिवकुमार यांच्या मते, "दर्शन यांचे चित्रपट अगदी सामान्य होते, ते भूमिकाही सारख्याच करायचे. पण तरीही अॅक्शन हिरो म्हणून त्यांना करिअरमध्ये यश आणि उंची मिळाली. बहुतांश चित्रपटांत त्यांनी मागास आणि दलित समुदायातील व्यक्तीच्या भूमिका केल्या."
"या चित्रपटांच्या कथेतही नायकानं कायदा मोडणं योग्यच असल्याचं दाखवलं जात होतं. एका दशकापेक्षा जास्त काळ दर्शन, किच्चा सुदीप आणि पुनीत राजकुमार यांचं कन्नड चित्रपट सृष्टीवर अधिराज्य होतं." दर्शन यांच्या लोकप्रियतेमुळं चाहत्यांनी त्यांना डी-बॉस म्हणायला सुरुवात केली. दर्शनला चाहते 'चॅलेंजिंग स्टार' असंही म्हणतात. पण मुरलीधर खजाने यांच्या मते, दर्शन त्यांना मिळालेलं स्टारडम सांभाळू शकले नाहीत. त्यामुळं त्यांना जेव्हा यश मिळालं तेव्हा त्यांना आपण कसं वागायला हवं हे लक्षातच आलं नाही.
आधीही झाली होती अटक
दर्शन यांच्यावर पत्नी विजयलक्ष्मीनं कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळीही ते चार आठवडे तुरुंगामध्ये होते. त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांच्या तक्रारीत दर्शननं पत्नीला मारहाण केल्याचा तसंच रिव्हॉल्वर दाखवून धमकावल्याचा आणि सिगारेटनं चटके दिल्याचाही उल्लेख होता. पण या वादानंतरही दर्शनच्या प्रसिद्धीवर काही परिणाम झाला नाही. तुरुंगात असताना त्यांचा 'सारथी' चित्रपट रिलीज झाला आणि मोठा हिट ठरला होता. पण त्यांच्या पत्नीनं नंतर तक्रार मागे घेतली आणि दर्शन यांची सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी चाहत्यांची माफी मागितली आणि 'धन्यवाद यात्रा' काढून ते संपूर्ण राज्यात फिरलेही होते.
यादरम्यान दर्शन यांनी चाहत्यांना, "मला माफ करा. मी तुमच्यासमोर एक चुकीचं उदाहरण ठेवलं आहे," असं म्हणत माफी मागितली होती. इस घटनेनंतरच कन्नड चित्रपट सृष्टीतील बहुतांश लोकांनी दर्शन यांच्याशी दुरावा केला होता. पण त्यामुळं त्यांच्या बॉक्स ऑफिसवरील यशावर काहीही परिणाम झाला नाही. दर्शन यांच्यावर जे आरोप झाले आहेत, त्यानंतरही कन्नड चित्रपट सृष्टीतील बहुतांश लोक त्यांच्याबाबत काहीही स्पष्ट बोलण्यास टाळत आहे. काही मोजक्या अभिनेत्यांनी याबाबत स्पष्टपणे त्यांचं मत याबाबत मांडलं आहे. खजाने यांच्या मते, इंडस्ट्रीतील लोकांनी अशाप्रकारे मौन बाळगण्यामागे व्यावसायिक हिताची कारणं असू शकतात.
दर्शन यांच्या चित्रपटांवर कन्नड चित्रपटसृष्टीचे सुमारे 150 कोटी रुपये अडकले आहेत, हेही त्यामागचं एक कारण असू शकतं. दर्शन यांना शिक्षा झाली तर त्यांचे आगामी तिन्ही चित्रपट एकतर डब्ब्यात जातील किंवा त्यांना शुटिंग थांबवावं लागेल.योगीश यांच्या मते, "तसं झाल्यास दर्शन तुरुंगात गेल्यानं कन्नड चित्रपटसृष्टीला फटका बसणार हे जवळपास स्पष्ट आहे. पण लगेचच दर्शन यांना बॅन करण्याची मागणी योग्य नाही. कारण सध्या फक्त तपास सुरू आहे. तसंच दोषी सिद्ध होण्यापूर्वी सगळे निर्दोष असतात."
"या प्रकरणाची मीडिया ट्रायल होऊ नये अशी माझी विनंती आहे. ते निर्दोष आहेत असं माझं म्हणणं नाही. पण त्यांची खलनायकासारखी प्रतिमा तयार केली जात आहे. सुनावणीआधीच त्यांना दोषी ठरवलं जात आहे," असं योगीश म्हणाले.
Published By- Dhanashri Naik