संगीतकार आणि गायक विशाल ददलानीच्या वडिलांचे निधन
संगीतकार आणि गायक विशाल ददलानी यांचे वडील मोती ददलानी यांचे निधन झाले. विशाल ददलानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून वडिलांच्या निधनाची माहिती दिली. विशाल ददलानी यांचे वडील मोती ददलानी यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. विशालचे वडील मोती ददलानी यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विशाल ददलानीच्या वडिलांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतरच चाहते आणि स्टार्सकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
आपल्या वडिलांच्या मृत्यूची माहितीविशाल यांनी इंस्टाग्राम वर दिली आणि सांगितले की, विशाल यांना शुक्रवारी कोविड-19 चाचणीत संसर्ग झाल्याचे आढळल्याने अखेरच्या क्षणी ते वडिलांसोबत नव्हते. गॉल ब्लेडरच्या शस्त्रक्रियेनंतर त्याचे वडील गेल्या तीन-चार दिवसांपासून अतिदक्षता विभागात (आयसीयू) असल्याचे विशालने सांगितले.
विशालने त्यांच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'मी काल रात्री माझा सर्वात चांगला मित्र, पृथ्वीवरील सर्वोत्तम व्यक्ती गमावला. मला माझ्या आयुष्यात यापेक्षा चांगला पिता, व्यक्ती किंवा शिक्षक सापडला नसता. माझ्यात जे काही चांगले आहे ते त्याच्यामुळेच आहे. विशाल सध्या त्याच्या राहत्या घरी क्वारंटाईनमध्ये असून त्याच्यात कोरोनाच्या आजाराची सौम्य लक्षणे आहेत.
विशालने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'माझी बहीण सर्व काही पाहत आहे आणि खूप ताकदीने, जे कदाचित माझ्यामध्ये नसेल. मला माहित नाही मी त्यांच्याशिवाय कसे जगेन. मी पूर्णपणे खचलो आहे.' मोती ददलानी यांचा जन्म 12 मे 1943 रोजी झाला आणि 8 जानेवारी 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशालच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.