गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (21:07 IST)

प्राण ते गुलशन ग्रोवर : जेव्हा लोक चित्रपटांतील खलनायकांजवळ जायला घाबरायचे

शाहरुखच्या पठाण चित्रपटात जॉन अब्राहमसारख्या नायकानं खलनायकाची भूमिका साकारली हे आताच्या काळात सर्वसामान्य आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा खलनायकाची भूमिका साकारणे वाईट किंवा कमी दर्जाचं काम समजलं जात होतं.
 
गोष्ट आहे 1971 ची जेव्हा 'शर्मिली' चित्रपट प्रदर्शित झाला होता. शशी कपूर तर आधीपासून सुपरहीट होते, पण याच चित्रपटात खलनायकाची भूमिका केलेल्या रंजीतसाठी ही मोठी संधी होती. हा तोच रंजीत आहे ज्याला सध्याची नवी पीढी हाऊसफूल-4 चित्रपटामुळे ओळखते.
 
रंजीतचं कुटुंब देखील 'शर्मिली' चित्रपट बघायला गेले होते. यावेळी खलनायकाच्या भूमिकेत असलेला रंजीत अभिनेत्रीसोबत छेडखानी करताना पाहून रंजीत यांचं कुटुंब चित्रपट अर्धवट सोडून निघून गेले होते.
 
त्यांची आई घरी गेल्यानंतर खूप रडली. आमच्या मुलानं कुटुंबाची बदनामी केली असून रंजीतमुळे वडील कोणाला तोंड दाखवू शकणार नाही, असं त्यांच्या आईचं म्हणणं होतं.
शेवटी रंजीतने अभिनेत्री राखीला घरी आणलं, कुटुंबासोबत भेट घालून दिली आणि रंजीतबद्दल कुठलीही तक्रार नसून ती फक्त अॅक्टींग होती हे कुटुंबाला राखीनं समजावून सांगितलं. तरीही रंजीतच्या आईनं राखी यांची माफी मागितली.
 
हा किस्सा स्वतः रंजीत यांनी ‘बॅड मॅन : बॉलीवूड्स आइकॉनिक व्हिलेन्ज’ या पुस्तकात सांगितला आहे. पत्रकार रोशमिला भट्टाचार्य यांनी हिंदी चित्रपटातील 13 खलनायकांवर हे पुस्तक लिहिलं आहे.
शेजारी म्हणायचे सुसंस्कृत मुलगा बिघडला : गुलशन ग्रोवर
गेल्या 12 जुलैला प्राण यांची पुण्यतिथी होती आणि 27 जुलैला अमजद खान यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त आपण हिंदी चित्रपटातील खलनायकांबद्दल जाणून घेऊयात.
 
प्राण, जीवन, अजीत, प्रेम चोपडा, के. एन. सिंह, रंजीत, अमरीश पुरी, डॅनी, अनुपम खेर, अमजद खान, शक्ती कपूर पासून तर गुलशन ग्रोवर पर्यंत अशा अनेकांचे नाव खलनायकांच्या यादीत घेता येतील.
 
पडद्यावरील खलनायकांच्या भूमिकेचा लोकांवर इतका प्रभाव असायचा की खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना घाबरायचे. त्यांच्याविरोधात कुटुंबात नाराजी असायची. असेच अनेक किस्से रोशमिला भट्टाचार्य यांच्या बॅडमॅन पुस्तकात आहेत.
या पुस्तकातून गुलशन ग्रोवर सांगतात, "1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या अवतार चित्रपटात मी स्वतःच्या आई-वडिलांना घराबाहेर काढतो. माझ्या शेजारांनी देखील हा चित्रपट बघितला. त्यानंतर माझ्या आईला तुमचा सुसंस्कारी मुलगा बिघडल्याची तक्रार ते करत होते.
 
"इतकंच नाहीतर आपल्या स्वतःच्या आई-वडिलांना एक दिवस घराबाहेर काढणार असंही म्हणायचे. सुरुवातीला माझ्या आईला देखील चित्रपटांबद्दल समजत नव्हतं. त्यामुळे हे सगळं ऐकून ती रडायची.’’
 
कवीमनाचे प्रेम चोप्रा
हे खलनायक पडद्यावर क्रूर आणि निर्दयी दिसत असले तरी खरं आयुष्य एकदम वेगळं आहे. प्रत्येकजण संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले आहेत.
 
2023 मध्ये अॅनिमल चित्रपटात दिसलेले प्रेम चोप्रा एक चांगले कवी आहेत. बॉलिवूडमध्ये करिअर करताना संघर्ष सुरू होता तेव्हा ते टाईम्स ऑफ इंडियाच्या सर्क्युलेशन विभागात काम करत होते.
तिथून मिळालेल्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यानंतर 1964 मध्ये ‘वो कौन थी’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे ते सुपरहीट झाले होते.
 
रंजीत हा खूप चांगला चित्रकार असून कॉलेज फुटबॉल संघाचे गोलकीपर देखील होता. एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने चित्रपटात करिअर केलं आणि खलनायक म्हणून त्यांची भूमिका गाजली.
 
गायक डॅनी आणि फोटोग्राफर प्राण
डॅनी एक चांगले गायक असून त्यांनी किशोर कुमार, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांसारख्या प्रसिद्ध गायकांसोबत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
 
अमरीश पुरी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जवळपास 20 वर्ष रोजगार मंत्रालयात काम केलं.
यासोबतच ते थिएटरमध्येही काम करायचे. 1979 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता.
 
दुसरीकडे फोटोग्राफीची आवड असलेले प्राण फोटोग्राफरचे सहाय्यक म्हणून काम करायचे. यानंतर पंजाबी चित्रपटातून ते हीट झाले आणि त्यानंतर खलनायक म्हणून गाजले.
 
पण, खलनायकापेक्षा त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व या पुस्तकातून समोर आलं आहे.
 
प्राण साहेब-राज कपूर यांचे भांडण
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी मला एक किस्सा सांगितला होता.
 
‘‘एक दिवस प्राण साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि राज कपूरच्या तिन्ही मुलांना घरी आणायला सांगितलं. कारण, प्राण साहेबांना त्यांच्यासोबत एक सांयकाळ घालवायची होती.
 
"त्यांनी सांगितल्यानुसार मी तसं केलं. त्यानंतर प्राण साहेबांनी सांगितलं की बॉबी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्यांचं राज कपूरसोबत भांडण झालं होतं. त्याचा त्यांना खूप पश्चाताप झाला. त्यामुळे प्राण साहेबांनी राज कपूरच्या मुलांना बोलावून त्यांच्यासोबत वेळ घालवला होता.’’
 
नैतिकतेची बदलत गेलेली व्याख्या
आधीच्या काळात खलनायकांच्या भूमिकेकडे गांभीर्यतेनं पाहिलं जायचं.
 
लेखिका शर्मिला भट्टाचार्य असाच एक किस्सा सांगतात. त्या म्हणाल्या, ‘’1950 मध्ये सुपरस्टार अशोक कुमारने संग्राम चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. तो खून मारामारी करून अवैध धंदा करायचा. शेवटी ते पोलिसांकडून मारले जातात."
"हा चित्रपट 16 आठवडे चालला. पण, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी तेव्हाचं बॉम्बे (मुंबई)चे पोलिस आयुक्तांना अशोक कुमार यांच्या घरी पाठवलं होतं. तरुणांचे आदर्श असणाऱ्या व्यक्तींनी अशा भूमिका करू नये असं अशोक कुमार यांना सांगण्यात आलं होतं,’’ त्या पुढे सांगतात.
 
पण आता तर अनेकदा चित्रपटातील हिरोही व्हिलेन बनतो. म्हणजे 1993 मध्ये बाजिगर चित्रपटात शाहरूख हिरो होता. पण व्हिलेनही तोच होता. एका क्षणात तो प्रेयसीची हत्या करतो.
 
'दरोडेखोर ते स्टायलिश बिझनेसमॅन'
खलनायक प्रभावी असतो तेव्हाच अभिनेता खरा हिरो ठरतो असं म्हणतात. त्यानुसार खलनायकाच्या भूमिकेत बदलही होत आले.
 
50 च्या दशात सावकार खलनायक होते. 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात सुखीलाला सावकार दाखवण्यात आला होता. त्याची भूमिका अभिनेता कन्हैयालालने केली होती. त्यानंतर सिगारेटचा धूर उडवणारे खलनायक दाखवण्यात आले.
 
त्या काळातले प्रसिद्ध खलनायक अजित यांच्यावरील ‘अजीत द लायन’ पुस्तक लिहिणारे इकलबाल रिजवी यांच्यासोबत बीबीसीने काही दिवसांपूर्वी संवाद साधला होता.
यावेळी ते म्हणाले होते की, ‘’एकेकाळी खलनायक डाकू असायचा. त्याआधी जमीनदार किंवा गावातले सावकार खलनायक असायचे. पण, 70 च्या दशकात यात बदल होऊन अजितसारखे कलाकार खलनायक बनले.
 
"जो अतिशय शांत, गोळीबार न करणारा, सूट घालणारा खलनायक असतो. त्याला पाहून ही व्यक्ती खलनायक आहे असं वाटत नव्हतं.’’
 
लोकांच्या नजरेत खरंच खलनायक बनले पुनीत इस्सर
लेखिका रोशमिला भट्टाचार्य काही खलनायकांच्या लोकप्रियतेची दुसरीही बाजूही सांगतात.
 
त्यांच्या मते, 1983 मध्ये कुली चित्रपटात खलनायक पुनीत इस्सर आणि अमिताभ बच्चन यांची शूटींग सुरू असताना अमिताभ बच्चन जखमी झाले. पण आपला आवडता कलाकार अशा शूटींगमध्ये जखमी झाल्याचं लोकांना आवडलं नाही.
पुनीत इस्सर 2013 मध्ये बीबीसीसोबत बोलताना म्हणाले होते, "कुली चित्रपटातील या दुर्घटनेनंतर अनेक वर्ष त्यांना काम मिळालं नाही. तसेच प्रेक्षकांनी सुद्धा त्यांना नाकारला होतं."
 
एका दुर्घटनेनं ते खऱ्या आयुष्यात खलनायक ठरले होते.
 
'प्रेम नाम हैं मेरा, प्रेम चोप्रा'
जसं जसं काळ पुढे जात गेला तशीतशी खलनायकांची भूमिकाही बदलत गेली. पुढच्या खाळात प्रेम चोप्रा हे राजेश खन्ना यांच्या चित्रपटात खलनायक, तर रणजीत अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसले.
 
रंगीबेरंगी शर्ट, शर्टाची उघडी बटणं, गळ्यात सोन्याचे लॉकेट, लूटमार आणि अभिनेत्रीची छेड काढणे अशी खलनायकाची भूमिका दाखवण्यात आली होती.
दरम्यान, डॉ. डैंग (कर्मा) आणि शाकाल (शान) यांच्यासारखे डॉन आणि गुन्हेगार देखील होते ज्यांच्याकडे नवनवीन प्रकारचे गॅजेट्स होते. त्यांची पडद्यावर एंट्री होताच काहीतरी विपरित घडणार हे समजायचं.
 
इथं बॉबी चित्रपटात शेवटी प्रेम चोप्राची एंट्री होते तो सीन आठवतो. ‘प्रेम नाम हैं मेरा, प्रेम चोप्रा’ असं प्रेम चोप्रा डिंपलला म्हणतात तेव्हा भीती वाटते.
 
दुसरीकडे गब्बर सिंह यांच्याशिवाय शोले चित्रपटाची कल्पनाही करू शकत नाही. पण, अमजद खान यांचं 1992 मध्येच 51 वर्षांचे असताना निधन झालं.
 
प्राण आणि शक्ती क्राईम मास्टर गोगो
कालांतराने अनेक खलनायक सकारात्मक भूमिका साकारू लागले. कादर खान आणि शक्ती कपूर (क्राईम मास्टर गोगो) यांच्या आगमनाने कॉमिक खलनायक पुढे आले.
 
खलनायक चांगला अभिनेता असलाच पाहिजे. पण, खरा खलनायक तोच असतो जो मनात भीती आणि द्वेष निर्माण करतो, असं रोशमीला भट्टाचार्य यांना वाटतं.
 
एकेकाळी लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या प्राण यांनी नंतर उपकार चित्रपटातील ‘कस्मे वादे प्यार वफा’ या गाण्यात मलंग चाची भूमिका साकारून सर्वांना रडवलं होतं.
हे खलनायक जेवढे प्रसिद्ध होते तेवढचे त्यांचे संवादही प्रसिद्ध होते. प्रत्येक चित्रपटात खलनायकाची एक ना एक पंचलाईन असायची.
 
उदाहरण द्यायचं झालं तर ‘लेकीन एक बात मत भूलिए डीएसपी साहब की सारा शहर मुझे लायन के नाम से जानता हैं और इस शहर में मेरी हैसियत वही हैं जो जंगल में शेर की’ अजित यांचा हा डायलॉग किंवा ‘मै वो बला हूँ जो पत्थर को शीशे से तोडता हूँ’ हा प्रेम चोप्रा यांचा डायलॉग.
 
अमजद खान यांना विनोदी भूमिकेसाठी पुरस्कार
खलनायकाच्या भूमिकेशिवाय त्यांच्या खऱ्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत. पण, या लेखाच्या शेवटी अमजद यान यांच्याबद्दल बोलूया.
 
खलनायक बनण्याआधी अमजद खान हे बाल कलाकार होते. ते आसिफचे सहाय्यक दिग्शदर्शक होते, ते अक्टर्स गिल्डचे अध्यक्ष देखील होते. ज्याद्वारे त्यांनी चित्रपटाच्या क्षेत्रातील अनेक वाद सोडवले होते.
 
तसेच त्यांनी अनेक चित्रपटांच दिग्दर्शन सुद्धा केलं होतं. उत्कृष्ट सहाय्यक कलाकार आणि बेस्ट कॉमिक रोलसाठी त्यांना तीनवेळा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला आहे.
 
Published By- Priya Dixit