शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (08:21 IST)

राज कुंद्रा आणखी गोत्यात; आता ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

raj kundra
गेल्या वर्षी उघड झालेल्या पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी राज कुंद्रा यांना २० जुलै २०२१ रोजी अटक केली होती.
 
जुलैमध्ये राज कुंद्रा यांना अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये पाच संशयितांना अटक केली होती. संशयित आरोपी कथितरित्या अश्लील चित्रपट बनवून वेब सीरिज किंवा बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी देण्याची बतावणी करून फसवणूक करत होते. संशयितांनी महत्त्वाकांक्षी मॉडेल आणि अभिनेत्यांना अश्लील चित्रपटात काम करण्यास सांगून बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे आश्वासन दिले होते.
 
मालाड येथील मड बेटाजवळ किंवा अक्सा बिचजवळ बंगला किंवा अपार्टमेंट भाड्याने घेऊन चित्रीकरण करण्यात आले होते. चित्रीकरणादरम्यान अभिनेत्रींना एका वेगळ्या कथेवर चित्रीकरण करण्याची बतावणी करून हे संशयित आरोपी न्यूड सीन चित्रीत करण्यास सांगत होते. अभिनेत्रींनी नकार दिला तर त्यांना कथितरित्या धमकी देण्यात आली आणि चित्रीकरणाचा खर्च वसूल करण्याचा इशारा देण्यात आला.
 
सब्सक्रिप्शनवर आधारित अॅपवर चित्रीत केलेल्या लघुचित्रफित अपलोड केल्या जात होत्या. ते पाहण्यासाठी ग्राहकाला पैसे भरून अॅप सब्सक्राईब करावे लागत होते. हा कंटेट पाहण्यासाठी सब्सक्राईबरला एक निश्चित रक्कम द्यावी लागत होती. मुंबई पोलिसांना सुगावा लागल्यानंतर या रॅकेटवर कारवाई केली. हॉटशॉट्स अॅपद्वारे हा गोरखधंदा सुरू असल्याचे उघड झाले होते.
 
त्यानंतर राज कुंद्रा यांच्या वियान कंपनीने यूकेमधील केनरिन या कंपनीशी करार केला होता. त्या कंपनीकडे हॉटशॉट्स अॅप होते. या कंपनीचा मालक राज कुंद्रा यांचा मेहुणा आहे. हॉट्शॉट्स अॅपचा वापर अश्लील क्लिप डाउनलोड करण्यासाठी केला जात होता. या प्रकरणी राज कुंद्रा यांच्यासह त्यांच्या कंपनीचे आयटी प्रमुख रेयान थोर्प यांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राज कुंद्रा यांना जामीन मिळाला होता.