प्रभाकर
रजनीकांत यांच्या आगामी 'जेलर' नावाच्या सिनेमात लेखक सुपर सुब्बू यांनी लिहिलेलं आणि सुप्रसिद्ध गायक अनिरुद्धने गायलेलं 'हुकुम... टायगरका हुकुम...' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय.
यूट्युबवर करोडो लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. या गाण्यामध्ये वापरलेल्या तामिळ भाषेतल्या काही ओळी नेमक्या कुणाला उद्देशून वापरण्यात आल्या आहेत याची चर्चा सध्या सुरूय.
यातच जेलर चित्रपटाच्या म्युजिक लाँच वेळी रजनीकांतने सांगितलेली 'काक-कलुगू'ची गोष्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रजनीकांतने नेमकी कोणती गोष्ट सांगितली होती?
या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना रजनीकांत यांनी सांगितलं की, "जंगलात नेहमी लहान पशू मोठ्या पशूंना त्रास देत असतात. आता कावळा आणि गरुडाचंच उदाहरण घेऊया. कावळा नेहमी गरुडावर चिडलेला असतो. गरुड मात्र नेहमी शांत असतो. गरुडाला आकाशात उंच भरारी घेताना पाहून कावळ्यालाही वाटतं की, त्याला देखील असं उंच उडता आलं पाहिजे.
आकाशात उंच भरारी घेण्यासाठी गरुडाला मात्र त्याचे पंख फडफडवण्याचीसुद्धा गरज नसते. गरुड नेहमी उंचावर उडण्याचे नवनवीन उच्चांक गाठत असतात.
मौन किंवा शांतता ही जगातली सर्वोत्कृष्ट भाषा आहे. सुपरस्टार या बिरुदाची अडचण ही काही आत्ताच निर्माण झालेली आहे असं नाही. याची सुरुवात 1977 मध्ये झाली. मला त्याकाळी एका चित्रपटामध्ये या शीर्षकाबद्दल विचारण्यात आलं होतं तेंव्हा मी ते स्वीकारण्यास नाही म्हणालो होतो.
कारण त्यावेळी कमल हसन खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि शिवाजीने नुकताच अभिनय सुरु केला होता. त्यामुळेच मी म्हणालो होतो की, मला सुपरस्टार हे शीर्षक देऊ नका. अनेकांना त्यावेळी वाटलं की रजनीकांत घाबरला. पण मी केवळ दोनच गोष्टींना घाबरतो. एक म्हणजे सर्वशक्तिमान असणारा देव आणि जगातली चांगली माणसं."
'सुपरस्टार'साठीचा वाद नेमका काय आहे?
याबाबत बोलताना पत्रकार बिस्मी म्हणतात की, "या गाण्यामध्ये किंवा रजनीकांत यांनी सांगितलेल्या छोट्या गोष्टीमध्ये एकाही अभिनेत्याचा थेट उल्लेख करण्यात आलेला नसला तरीही याकडे अभिनेता विजयवर केलेली टीका म्हणूनच बघता येईल."
"रजनीकांत नेहमी अशा छोट्या प्रेरणादायी गोष्ट सांगत असतात, यावेळी मात्र त्यांनी गरुडासोबत उडणाऱ्या एका पक्षाची ही गोष्ट का सांगितली हा प्रश्नच आहे. सध्या विजयने अभिनय केलेल्या सिनेमांची चलती आहे. तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारा कलाकार म्हणून विजय ओळखला जातो. बॉक्स ऑफिसमध्येही विजयचे चित्रपट सुपरडुपर हिट ठरत आहेत. कदाचित हे सहन न झाल्यानेच रजनीकांतने ही गोष्ट सांगितली असेल," असे बिस्मी म्हणाले.
सुपरस्टार या शीर्षकाबद्दल बोलताना बिस्मी म्हणाले की, "रजनीकांत यांना जर सुपरस्टार ही बिरुदावली नको असेल तर त्यांनी तसं सांगितलं पाहिजे. चित्रपट निर्माते देखील रजनीकांत यांनी विनंती केली तर सुपरस्टार हे शीर्षक त्यांच्या नावापुढे लावणार नाहीत. आम्ही अभिनेता अजितला देखील 'अल्टिमेट स्टार' म्हणायचो पण त्यांनी नकार दिल्यावर आम्ही तसं करणं थांबवलं."
"रजनीकांत यांनाही त्यांना सुपरस्टार म्हणलेलं आवडतं, पण लोकांसमोर मात्र ते हे मान्य करत नाहीत," असं बिस्मी यांनी सांगितलं.
'विजय'च्या चाहत्यांचा राग नेमका काय आहे?
रजनीकांत विरुद्ध विजय या अभिनेत्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सुरु केलेल्या युद्धाबाबत बोलताना विजय यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की, “रजनीकांत यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये त्यांना काहीही चुकीचं वाटलेलं नाही.”
हो, पण रजनीकांत यांच्या चाहत्यांनी मात्र त्या गोष्टींचे अनेक अर्थ लावले आणि या युद्धाला सुरुवात झाली.
याबाबत बोलताना विजय चॅरिटी फोरमचे प्रवक्ते राम म्हणाले की, "म्युजिक लाँच आणि इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये रजनीकांत आणि विजय नेहमी अशा छोट्या गोष्टी सांगत आले आहेत. आम्ही तरी त्याकडे याच दृष्टिकोनातून बघतो. पण रजनीकांत यांच्या चाहत्यांनी या गोष्टीचे अनेक अर्थ लावले आणि रजनीकांत विजय यांनाच उद्देशून बोलल्याची चर्चा सुरु झाली. मात्र आम्हाला आमची बाजू स्पष्ट करून सांगावीच लागते."
राम म्हणाले की विजय यांच्या लोकप्रियतेने रजनीकांत यांच्या लोकप्रियतेला केंव्हाच मागे टाकले आहे आणि म्हणूनच कदाचित रजनीकांत यांचे चाहते असे वागत आहेत.
राम म्हणाले की, "आम्ही नेहमी रजनीकांतचा आदर करत आलो आहोत. विजय स्वतः रजनीकांत यांचे चाहते असल्याचं त्यांनी वेळोवेळी सांगितलंय. पण सध्याच्या काळात थलपथी विजय यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि त्यांनी एकापाठोपाठ एक असे हिट चित्रपट केले आहेत हेही वास्तव आहे. पण हे वास्तव रजनीकांत यांच्या चाहत्यांना समजत नाहीये."
राम हेही म्हणाले की, विजय यांच्या नावापुढे लावलं जाणारं थलपथी हे शीर्षक त्यांना पुरेसं आहे आणि चित्रपटाच्या पडद्यावर विजय यांच्या नावापुढे 'सुपरस्टार' लिहिलेलं पाहण्याची त्यांचीही इच्छा नाहीये.
या वादाची सुरुवात नेमकी कधी झाली?
पत्रकार आणि चित्रपट समीक्षक आशा मीरा अय्यपन म्हणतात की "हा संघर्ष सुपरस्टारच्या शीर्षकावरून सुरू झाला नाही,तर विजय यांनी अभिनय केलेला 'बीस्ट' नावाचा चित्रपट रिलीज झाल्यापासून हे सगळं सुरु झालं."
बीबीसी तामिळसोबत बोलताना त्या म्हणाल्या की, "बीस्टने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. मात्र चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे तो चित्रपट बनवला गेला नव्हता. त्यामुळे विजयच्या चाहत्यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यामुळे विजयचे चाहते नेल्सन यांच्यावर नाराज होते. आता रजनीकांत अभिनय करत असलेला जेलर हा चित्रपट देखील नेल्सन दिलीपकुमार हेच दिग्दर्शित करत आहेत त्यामुळे मग विजयचे चाहत्यांनी नेल्सन आणि रजनीकांत या दोघांना लक्ष्य केले आहे."
बीस्ट या चित्रपटाच्या समीक्षणांमुळे विजयचे चाहते सुरुवातीला चिडले होते आणि नंतर त्यांचा हा राग हळूहळू नेल्सन यांच्याकडे वळला. विजय यांच्या चाहत्यांचं असं म्हणणं होतं की, नेल्सन यांच्या मनात विजय यांच्याबद्दल आदर नव्हता.
रजनीकांत कधीच त्यांची भूमिका सोडत नाहीत
रजनीकांत आणि विजय यांच्या चाहत्यांमध्ये सुरु असलेल्या या युद्धाबाबत बीबीसीसोबत बोलताना लेखिका आतिशा म्हणाल्या की तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये रजनीकांत यांच्या विरोधात नेहमीच कुणीतरी बोलत आलेलं आहे आणि रजनीकांत यांना त्याची कधीच काळजी वाटली नाही.
आतिशा म्हणतात की, "सध्या सुरु असलेला वाद निरर्थक आहे. जर रजनीकांत किंवा विजय यांच्यापैकी याबद्दल कुणी काही बोललं असतं तर या वादाला काही अर्थ मिळाला असता. जेव्हापासून रजनीने अभिनय करायला सुरुवात केली, तेव्हापासून ते कोणालातरी त्याच्या विरोधात उभे करत आहेत. प्रत्येक युगासोबत ते बदलत गेले आणि आता विजयला त्या जागी उभे केले गेले आहेत इतकंच."
"रजनीकांत नेहमी त्यांच्या भूमिकेत असतात. आपण हेही बघितलंय की एखादा छोटा अभिनेता असेल आणि त्याने एखाद्या चित्रपटात चांगला अभिनय केला असेल तरी रजनीकांत यांनी पुढे येऊन त्याचं कौतुक केलेलं आहे. विजय यांच्याकडेही रजनीकांत तसेच बघतात. जर विजय रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त यशस्वी झाले तर रजनीकांत त्यांचंही कौतुकच करतील."
बॉक्स ऑफिसचा राजा कोण आहे?
रजनीकांत विरुद्ध विजय यांचा वाद शेवटी एकाच मुद्द्यावर येऊन थांबतो आणि तो म्हणजे कोणत्या अभिनेत्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. आम्ही तमिळनाडू थिएटर आणि मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुब्रमण्यम यांच्याशी कलेक्शन आणि चित्रपट यशस्विनी होण्याच्या शक्यतेबाबत बोललो.
त्यावर ते म्हणाले की, “येथे कोणत्याही अभिनेत्याला कायमस्वरूपी यश मिळत नाही. चित्रपट आणि कथा चांगली असेल, लोकांना आवडली असेल तर चित्रपट चालतो. एखादा अभिनेता लोकप्रिय आहे म्हणून त्याचे चित्रपट कसेही असले तरी यशस्वी होतील हे केवळ मिथक आहे.
उदाहरणार्थ-एमजीआर लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेंव्हा त्यांचे बरेच चित्रपट चालले नाहीत. विजय प्रचंड लोकप्रिय होता तेंव्हा प्रदर्शित झालेला 'सुरा' हा चित्रपट चालला नाही आणि रजनीकांत प्रचंड जोमात असताना त्यांचा 'बाबा' नावाचा चित्रपट चालला नाही. दुसरीकडे कसलीही अपेक्षा नसताना कमल हसनच्या 'विक्रम' या चित्रपटाने प्रचंड कमाई केली. त्यामुळे चित्रपटाच्या कथेवर बरच काही अवलंबून आहे."
याबाबत ट्विटरवर निर्माते एस. आर प्रभू म्हणतात, “चित्रपट व्यवसायातील सुपरस्टार होण्याचं युग संपलं आहे. प्रत्येक अभिनेत्याचा स्वतःचा मार्केट शेअर असतो. तसेच, प्रत्येक चित्रपटासाठी, प्रदर्शनाची तारीख, कथा, आशय, स्पर्धा इत्यादींवर बरच काही अवलंबून असतं."