शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (23:31 IST)

वेड्या बाभळींमुळे एकेकाळी गजबजलेलं हे गाव आता 'भूताचं' बनलं?

RUPESH SONAWANE
सकाळचे जेमतेम आठ वाजले असतील, पण कच्छच्या वाळवंटात सूर्य अगदी आग ओकत होता. 'भुतांचं गाव' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रय्याडा मध्ये धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. तिथे फक्त वाऱ्याचा घोंगावणारा आवाज येत होता. चोमर वादळी वाऱ्यामुळे वाळवंटाची धूळ उडत होती.
 
एकेकाळी कच्छच्या बन्नी मैदानात रय्याडा नावाचं गाव नांदत होतं. गावाची साक्ष देणारी मशीद आजही त्या वाळवंटात उभी आहे. मशिदीच्या भिंतीवरील काही घुमट कोसळले आहेत, जणू काही वर्षानुवर्षे उभे राहिल्याने त्यांना थकवा आला असावा. या मशिदीच्या आजूबाजूला काही तलाव आहेत जिथे आता पाण्याचा थेंबही नाही.
 
एक काळ असा होता या मशिदीतून नमाज पढल्याचे आवाज संबंध गावात घुमायचे. गाव माणसांनी गजबजलेलं असायचं. पण आता या गावात माणसं राहत नाहीत. या मशिदीत आता कोळ्याच्या जाळ्यांची जळमट दिसतील. मशिदीसमोर उभं असलेलं एकमेव झाड सुकून गेलंय. पण पूर्वी हे गाव असं नव्हतं.
 
गावकरी सांगतात की, एक काळ असा होता की हे गजबजलेलं आणि श्रीमंत गाव होतं. इथले लोक आनंदाने आपलं जीवन जगत होते. गवताळ प्रदेश असल्याने अनेक मालधारी कुटुंब गुरंढोरं घेऊन इथे यायची. पण आज हे गाव ओसाड पडलंय. असं काय घडलं की लोक गाव सोडून गेले? गजबजलेलं रय्याडा गाव अचानक भुतांचं गाव कसं बनलं?
 
'..आणि आम्ही रय्याडा गाव सोडलं'
"आम्ही 1963 मध्ये रय्याडा गाव सोडलं, मग इथे लखारा मध्ये येऊन स्थायिक झालो. आमच्या आजोबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रय्याडात घालवलं होतं. तेव्हा परिस्थिती चांगली होती. पाणी होतं, गुरांना खायला गवत होतं."
 
रय्याडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नोड मुसाभाई उमर यांनी त्यांच्या गावाबद्दल ही माहिती दिली. त्यांच्याशी बोलण्यासाठी कच्छमधील दुधई मार्गे लखारावंदला पोहोचलो तेव्हा नुकतीच पहाट होत होती. सूर्य उगवला नव्हता आणि चंद्र अजून मावळायचा बाकीच होता. या गावातील लोकांचा दिवस उजडण्यापूर्वीच सुरू होतो. गावातील महिला पाणी आणण्यासाठी भटकंती करू लागल्या होत्या.
 
मुसाभाईंना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांचा पेहराव आणि बोली यातून सिंधी संस्कृतीचं दर्शन घडत होतं.
 
त्यांनी रय्याडा गावाबद्दल बोलायला सुरुवात केली, "आमचे आजोबा म्हणायचे की रय्याडा ते हाजीपीरपर्यंतची जमीन सुपीक होती पण हळूहळू जमीन खारवट होत गेली."
गावकरी आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वाढत्या वाळवंटामुळे लोकांना हे गाव सोडावं लागलं. गाव ओस पडल्याने कालांतराने या गावात भुताटकी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. येथील जमीन आणि पाणी खारवट झालं आणि काही वर्षांतच गावाचं वाळवंटात रुपांतर झालं.
 
मुसाभाईंच्या मते रय्याडा हे मोठं गाव होतं. ते सांगतात की "रय्याडा सोडल्यानंतर आम्ही अंजार तालुक्यातील खिरसरा येथे जाऊन स्थायिक झालो. काही जण भचाऊ तालुक्यातील बनियारी येथे गेले, तर काही जण चक्कमोरा येथे जाऊन स्थायिक झाले. आम्ही मात्र लखारावंदला येऊन स्थायिक झालो."
 
बन्नीतील मालधाऱ्यांमध्ये काम करणाऱ्या सहजीवन संस्थेचे प्रकल्प संचालक रमेश भाटी सांगतात, "रय्याडा गावात एकेकाळी गोड्या पाण्याचे मोठे तलाव होते. मालधारी लोक मोठ्या प्रमाणात म्हशी आणि गायी पाळत असत. हळूहळू वाळवंटातील खारवटपणा वाढू लागला आणि त्यांच्या गावापर्यंत पोहोचला, पाणीही खारट झाले. त्यामुळे हे गाव हळूहळू ओस पडू लागलं."
ओस पडलेली इतरही गावं
पावसाळ्यात गावकरी अधूनमधून रय्याडा येथे येतात आणि काही दिवस तंबू ठोकून लखारावंदला परततात.
 
गावाचे माजी सरपंच रमजान हुसेन म्हणतात, "पावसाळ्यात आम्ही रय्याडा येथे येऊन राहतो. पावसाच्या पाण्याने तलाव भरतो आणि पावसानंतर गवतही उगवल्याने काही दिवस राहता येतं. मात्र, दोन-तीन महिन्यांत ही जागा पुन्हा ओसाड वाळवंटात बदलते."
 
ते म्हणतात, "सरकारने आम्हाला शुद्ध पाणी, वीज आणि रस्ते पुरवले तरी आम्ही या वाळवंटासारख्या जमिनीवर राहण्यास तयार आहोत."
 
रमेश भाटी सांगतात की "बन्नीला जवळपास 55 गावं होती. आता इथली चार पाच गाव ओस पडली आहेत. त्या ठिकाणी गावातील जुन्या मशिदी, घरांचे काही अवशेष आहेत पण आता गावकरी राहत नाहीत."
 
"गोदियाळा, नोघनियाला, रय्याडा, लेवारा ही गावं ओस पडली आहेत, इथे आता कोणीही राहत नाही. लखाबो आणि खारोड गावांतील लोकही स्थलांतरित होत आहेत."
 
ते सांगतात, "गेल्या 50-60 वर्षात बन्नीच्या जमिनींची क्षारता एवढी वाढली आहे की इथल्या गावांमध्ये पाणी नाही, गवताचे प्रमाण कमी झाले आहे आणि त्यामुळे लोक इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. "
 
हसमभाई नोड यांनी लेवारा या अशाच एका ओस पडलेल्या गावाची गोष्ट सांगितली. ते इथल्या पशुपालकांसोबत वर्षानुवर्षे काम करत आहेत.
 
आम्ही त्यांना त्यांच्या गावाविषयी विचारलं असता ते म्हणाले, "मी मूळ बन्नीचाच आहे. 1979 मध्ये जेव्हा मोरबीमध्ये पूर आला तेव्हा बन्नीलाही पूर आला होता. लेवारा गावात तेव्हा 200-250 कुटुंब राहत होती. पण आज एकच मशीद उरली आहे, संपूर्ण गाव नाहीसं झालं."
 
बन्नीच्या कसदार जमिनी नापीक कशा बनल्या?
कच्छ जिल्ह्यातील बन्नीची ही मैदानं वाळवंटासारखी ओसाड नव्हती.
 
बन्नीची मैदानं आणि आसपासची गावं हिरवीगार होती आणि लोककथांमध्ये त्याचा उल्लेख होता.
 
एम. एस. विद्यापीठाचे प्रा. भरत पंड्या यांच्या 'फोककल्चर ऑफ कच्छ बन्नी' पुस्तकात बन्नीच्या लोककथा, लोकजीवन आणि सांस्कृतिक संदर्भाचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. यातल्या लोकगीतांपैकी एक म्हणजे,
 
"कच्छजी रान कंदी मेथे निली बन्नी न्यार
 
निला नेस नवं ने घ मिठा गुलजार”
 
रमेश भाटी या लोकगीताचा अर्थ समजावून सांगतात की, "बन्नी हा प्रदेश जिथे सकाळी गायी चरायला यायच्या, दुधाचा शिडकावा व्हायचा, चहूबाजूंनी गवतच गवत पसरलं असायचं."
 
ते सांगतात, "एकेकाळी हा प्रदेश हिरवागार होता आणि मालधारी लोक सुखी जीवन जगत होते."
 
रमेशभाई पुढे सांगतात, "बन्नीची एकेकाळची हिरवीगार कुरणं आता पूर्णपणे सुकली आहेत."
 
बन्नीच्या या गवताळ प्रदेशांचं वाळवंट झालं कारण, जमिनी कोरड्या होऊ लागल्या आणि वाळवंट पसरू लागलं असं तज्ञ सांगतात.
 
गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेझर्ट इकोलॉजीचे संचालक डॉ. विजयकुमार सांगतात की, कच्छची सुमारे 96 टक्के जमीन वाळवंट वाढत असल्यामुळे नापीक होत आहे. मात्र, यासाठी तज्ञ इतरही काही घटकांवर भर देतात.
रमेशभाई पुढे सांगतात, "बन्नीची एकेकाळची हिरवीगार कुरणं आता पूर्णपणे सुकली आहेत."
 
बन्नीच्या या गवताळ प्रदेशांचं वाळवंट झालं कारण, जमिनी कोरड्या होऊ लागल्या आणि वाळवंट पसरू लागलं असं तज्ञ सांगतात.
 
गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेझर्ट इकोलॉजीचे संचालक डॉ. विजयकुमार सांगतात की, कच्छची सुमारे 96 टक्के जमीन वाळवंट वाढत असल्यामुळे नापीक होत आहे. मात्र, यासाठी तज्ञ इतरही काही घटकांवर भर देतात.
 
वेड्या बाभळीमुळे बन्नीतील जमिनींचा ऱ्हास?
गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेझर्ट इकोलॉजीचे संचालक प्राध्यापक डॉ. विजयकुमार आणि जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातील उरीएल सफ्रीएल यांनी एका शोधनिबंधात वाळवंटातील इतर घटकांचा शोध लावला आहे.
 
त्यांच्या शोधनिबंधानुसार, "गवताळ प्रदेशातील वेडी बाभळ देखील एक महत्त्वाचा घटक आहे."
 
हसमभाई नोडला सांगतात की, 60 च्या दशकात हेलिकॉप्टरने बन्नीवर बाभळीच्या बियांचा वर्षाव केला होता.
 
शोधनिबंधात लिहिलेल्या संदर्भानुसार, 1857 मध्ये पहिल्यांदा वेडी बाभळ मेक्सिकोहून सिंधमध्ये आली. त्यानंतर 1877 मध्ये जमैकाहून हीच वेडी बाभळ आंध्रप्रदेशात आणण्यात आली. 1930 मध्ये राजस्थान मधील थारच्या वाळवंटात वेड्या बाभळीची लागवड करण्यात आली आणि तिला 'रॉयल प्लांट'चा दर्जा देण्यात आला. 1960 च्या दशकात बन्नीमध्येही वेडी बाभळ लागवड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.
 
वाढती क्षारता आणि कमी होत चाललेला गवताळ प्रदेश रोखण्यासाठी 1960 ते 65 च्या पंचवार्षिक योजनेत बन्नीमध्ये बाभूळ लागवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही दशकांतच इथे बाभूळ वाढून इतर वनस्पती नष्ट झाल्या.
 
1960 च्या दशकात बन्नीतील नद्यांवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे बन्नीच्या वाळवंटातील क्षारांचं प्रमाणही वाढलं असल्याचा उल्लेख या शोधनिबंधात करण्यात आला आहे.
 
रमेश भाटी सांगतात की, "बन्नीमध्ये सात नद्या होत्या. या नद्यांच्या पाण्यामुळे इथली जमीन कसदार होती. मात्र या नद्यांवर बंधारे बांधल्यामुळे बन्नीचा पाणीपुरवठा बंद झाला आणि क्षारता वाढू लागली."
 
गायी कमी का झाल्या?
या गावांतील बहुसंख्य लोक मालधारी असून हे लोक पशुपालन करतात. हसमभाई यांच्या म्हणण्यानुसार, बन्नीमध्ये 600-700 वर्षांपासून मालधारी राहतात. हसमभाई नोड हे देखील बन्नी पशु उल्काका मालधारी संघटनेशी संबंधित आहेत.
 
हसमभाई सांगतात, "पूर्वी कांकरेज गाई जास्त होत्या आणि म्हशी कमी होत्या, शेळ्या-मेंढ्या कमी होत्या. पण आता इथे फार कमी गायी दिसतात. गाईंची संख्या कमी होण्याचं कारण म्हणजे बन्नीच्या वनस्पतींमध्ये होणारे बदल, माती आणि पाण्यात वाढलेली क्षारता हे आहे."
 
रमेश भाटीही हसमभाई यांच्या मताशी सहमत आहेत. रमेशभाई सांगतात, "1958 च्या एका अहवालानुसार बन्नीमध्ये 48,000 गायी आणि 7,000 म्हशी होत्या. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ताज्या अहवालानुसार बन्नीमध्ये अंदाजे 80,000 म्हशी आणि 20,000 गायी आहेत."
 
"बन्नी मधील वाढत्या वाळवंटामुळे अनेक प्रकारची गवतं नामशेष झाली आणि त्याजागी बाभळ वाढली. गवताशिवाय गायी जगल्या नाहीत. बऱ्याच गायी मेल्या त्यामुळे पशुपालकांनी गायी विकायला सुरुवात केली."
 
रमेश भाटी आणि हसमभाई सांगतात की, त्यामुळे लोक इथून स्थलांतर करू लागले आणि इथली गावं ओस पडू लागली. आजही लोक स्थलांतर करत आहेत.
 
सरकारने यावर काय केलं?
रमेश भाटी सांगतात, "बन्नीमध्ये अशी अनेक गावं आहेत जिथे फक्त काहीच मालधारी कुटुंब उरली आहेत आणि बहुतेक मालधारी लोक गाव सोडून गेलेत. यापैकी अनेक कुटुंब भुज, मुंद्रा आणि अंजार तालुक्यातील गावांमध्ये स्थलांतरित झाली आहेत."
 
मात्र, सरकारने सुरू केलेली पाइपलाइन व्यवस्था आणि डेअरी विकासाचा स्थानिकांना फायदा झाल्याचं रमेश भाटी मान्य करतात.
 
ते सांगतात की, या गावांमध्ये पूर्वीसारखं स्थलांतर होत नाही. तलाव कोरडे पडले असले तरी पण काही गावांना पाइपलाइनद्वारे पाणी मिळत आहे. मात्र यात अजूनही अनियमितता आहे. याशिवाय दुग्धव्यवसायाच्या विकासामुळे काही शेतकरी इथे टिकून आहेत. या सुविधा नसत्या तर बन्नी पूर्णपणे ओस पडलं असतं.
 
ते पुढे सांगतात की, गेल्या 20 वर्षांत कच्छमधील पावसाच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. कच्छमधील हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण वाढलं आहे आणि यामुळे उर्वरित मालधारींच इतर गावांमध्ये होणारं स्थलांतर कमी झालं आहे.
 
वाळवंटीकरण रोखण्यासाठी 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं होतं. बन्नी प्रदेशाचा उल्लेख करून ते म्हणाले, "बन्नीमध्ये गवताळ प्रदेश वाढवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे जमीन पुन्हा कसदार बनली आहे."
 
"जमिनी पुन्हा कसदार बनवता येतात, मातीची गुणवत्ता, उत्पादकता, अन्नसुरक्षेवर याचा परिणाम होतो. कच्छचं वाळवंट हे त्याचंच एक उदाहरण आहे."
 
मात्र, अजूनही यावर खूप काम करणं बाकी आहे असं त्यांनी सांगितलं.
 
मार्च 2023 मध्ये, भारत सरकारने 'अरवली ग्रीन वॉल प्रकल्प' जाहीर केला. या प्रकल्पाअंतर्गत वाळवंटीकरण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं लावण्याची सरकारची योजना आहे. यात गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांचा समावेश असेल.
 
या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत आकडेवारी सादर करताना सांगितलं की, वनक्षेत्र वाढवण्यासाठी सरकारच्या विविध प्रयत्नांना यश आलं आहे. आकडेवारीनुसार, 2015 मध्ये गुजरातमध्ये 14,710 चौरस किलोमीटरचं जंगल होतं. 2021 पर्यंत यात वाढ होऊन ते 14,926 चौरस किलोमीटर इतकं झालं आहे.
 
या संदर्भात बीबीसी गुजरातीशी बोलताना गुजरात सरकारचे वन आणि पर्यावरण राज्यमंत्री मुकेश पटेल म्हणाले, "सरकार मोठ्या प्रमाणावर झाडं लावून भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे."
 
"कच्छ, बनासकांठा, पाटण, मेहसाणा, गांधीनगर आणि अरवली येथील भूजल पुनर्भरण करण्यासाठी 2019 मध्ये 'अटल भुजल योजना' सुरू करण्यात आली आहे."
 
वाळवंटातील रुक्षपणा, खारवटपणा हा गावातील माती आणि पाण्यापर्यंत पोहोचलाच होता. पण तो आता इथल्या लोकांच्या जीवनापर्यंत पण पोहोचला आहे. रय्याडा सोडून लखारात स्थायिक झालेल्या लोकांचं म्हणणं आहे की, "आता इथे पण रय्याडाप्रमाणे जमिनी खारवट झाल्या आहेत. हीच परिस्थिती राहिली तर हे गावही सोडावं लागेल."
 


Published By- Priya Dixit