गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 18 जून 2023 (11:13 IST)

आदिपुरुष मधले संवाद' लिहिणाऱ्या मनोज मुंतशीर यांची 'कथा'

Manoj Muntshir
बहुचर्चित आदिपुरुष चित्रपट अखेर काल (16 जून) सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने विक्रमी कमाई केल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. पण प्रदर्शनापूर्वीपासूनच वादात सापडलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही लोकांच्या निशाण्यावर आहे.
 
या चित्रपटातील दृश्ये, चित्रण आणि संवाद यांच्यावरून लोक जोरदार टीका करत आहेत. यामध्ये छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्यासह इतर अनेक राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.
 
प्रेक्षकांचा सर्वाधिक आक्षेप लंका दहनपूर्वी हनुमानाच्या पात्राच्या तोंडी घातलेल्या एका वाक्यावर आहे.
 
यामध्ये हनुमानाचं पात्र म्हणतं, "कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की."
 
याशिवाय चित्रपटातील इतर काही संवादसुद्धा प्रेक्षकांच्या नाराजीचं कारण ठरले आहेत.
 
एका दृश्यात रावणाचा एक राक्षस हनुमानाला म्हणतो, “तेरी बुआ का बगीचा है की हवा खाने चला आया...”
 
तर, जेव्हा अंगद रावणाविरोधात त्वेषाने बोलतो, "रघुपति राघव राजा राम बोल और अपनी आज जान बचा ले वरना आज खड़ा है, कल लेटा हुआ मिलेगा.."
 
चित्रपटात वापरण्यात आलेली अशा प्रकारची भाषा ही अभद्र आणि अपमानजनक असल्याचं सांगत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
 
मनोज मुंतशीर काय म्हणाले?
एका बाजूला प्रेक्षकांकडून चित्रपटावर टीका करण्यात येत असताना मनोज मुंतशीर यांनी आपली भूमिका मांडण्यास सुरू केलं आहे.
 
लेखक मनोज मुंतशीर यांनीच या चित्रपटातील संवादांचं लेखन केलेलं आहे. ते वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांशी बोलून आपली बाजू स्पष्ट करत आहेत.
मनोज मुंतशीर म्हणतात, “काही लोक या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच लक्ष्य करत आहेत. आम्ही कधीच चित्रपटाला शुद्धतेच्या मुद्द्यावरून विकण्याचा प्रयत्न केला नाही. वाल्मिकींसारख्या भाषेचा प्रयोग करून चित्रपट बनवत आहोत, असं आम्ही कधीच म्हटलं नाही. शुद्धतेबाबतच विचार करायचा असेल, तर मी माझी चूक मान्य करतो कारण तसं करायचं असतं तर हे संवाद संस्कृतमध्येच लिहायला हवे होते. पण तसं असतं तर मी ते लिहिलेच नसते, कारण मला संस्कृत येत नाही.”
 
आदिपुरुष चित्रपटाने पहिल्या दिवशी 140 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याबाबत मनोज मुंतशीर यांनी ट्विट करून म्हटलं, “देशाचे आभार, जय श्री राम!”
 
PTI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आदिपुरुष हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे, अशी माहिती टी-सिरीज निर्माता कंपनीने दिली आहे.
 
मनोज मुंतशीर आणि वाद
2021 मध्ये मनोज मुंतशीर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘तुम्ही कुणाचे वंशज आहात’ नामक एक व्हीडिओ पोस्ट केला होता.
 
यामध्ये त्यांनी देशातील अकबर, हुमायूँ आणि जहाँगीर यांच्या नावावरून ठेवण्यात येणाऱ्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच देश ब्रेनवॉशला बळी पडल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
 
त्यांच्या या व्हीडिओवर अनेक कठोर प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये ऋचा चड्ढा सारख्या कलाकारांनी त्यांच्यावर द्वेष पसरवत असल्याचा आरोपही केला.
मनोज मुंतशीर यांच्यावर साहित्यिक चौर्यकर्माचाही आरोप लावण्यात आलेला आहे.
 
अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटातील तेरी मिट्टी हे गाणं मुंतशीर यांनी लिहिलं आहे. पण हे मूळ गाणं लोकगायिका गीता राबरी यांचं असल्याचा आरोप झाल्यानंतर त्याची सोशल मीडियावर चर्चा झाली.
 
मनोज मुंतशीर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकावरही साहित्यि चौर्यकर्माचे आरोप झाले.
 
पण ते फेटाळून लावताना मनोज मुंतशीर यांनी एक व्हीडिओ शेअर केला. त्यामध्ये त्यांनी त्यांचं प्रत्येक काम हे 100 टक्के ओरिजिनल नसल्याचं मान्य केलं. आपलं गाणं कुठे ना कुठे प्रेरित जरूर आहे, असं त्यांनी म्हटलं.
 
मनोज मुंतशीर कोण आहेत?
मनोज मुंतशीर शुक्ला यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये गौरीगंज येथे 27 फेब्रुवारी 1976 ला झाला.
 
त्यांचे वडील शेतकरी तर आई शिक्षिका होती. मनोज यांची पत्नी नीलम मुंतशीर यासुद्धा लेखिका आहेत. मनोज-नीलम दांपत्याला एक मुलगाही आहे.
 
मनोज मुंतशीर यांचं खरं नाव मनोज शुक्ला आहे. तर त्यांनी आपलं टोपण नाव मनोज मुंतशीर असं ठेवलेलं आहे.
 
लहान वयापासूनच मनोज मुंतशीर यांना कविता लिहिण्याचा छंद होता.
 
मनोज यांनी एका माध्यमसंस्थेशी बोलताना म्हटलं, “शाळकरी वयातच मी माझ्यासाठी टोपण नाव शोधत होतो. अमेठीत एकेदिवशी फिरत असताना रेडिओवर मी एक गाणं ऐकलं, ‘मुंतशिर हम है तो रुक्सार पर शबनम क्यों है, आईने टूटते रहते है तुम्हे गम क्यों है.’
 
तेव्हापासूनच मुंतशीर या शब्दाच्या प्रेमात मनोज पडले. त्यानंतर त्यांनी स्वतःचं टोपण नाव मनोज मुंतशीर असं ठेवलं.
 
लहानपणापासून कविता लिहिणाऱ्या मनोज यांना त्यांचे मित्र एका मैफलीत घेऊन गेले. तिथे त्यांनी कविता वाचून दाखवल्या.
 
मनोज मुंतशीर सांगतात, “शाळेत असताना त्यांनी मिर्झा गालिब यांचं दीवाण-ए-गालिब हे पुस्तक पाहिलं. पण उर्दू येत नसल्याने त्यांना ते वाचायला अडचण येत होती. कविता लिहिण्यासाठी त्यांना उर्दू शिकायची होती. त्यामुळे घराजवळच्या मस्जिदीतून त्यांनी उर्दू शिकण्यासाठीचं पुस्तक दोन रुपयांना विकत आणलं होतं.
 
मनोज मुंतशिर अलाहाबाद विद्यापिठातून पदवी मिळवून 1999मध्ये मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त 700 रुपये होते असं ते सांगतात. मुंबईला जाण्यासाठी त्यांनी वडिलांकडे 300 रुपय़े मागितले तेव्हा त्यांच्या वडिलांनी परतीच्या भाड्यासह 700 रुपये दिले.
 
भजन, टीव्ही मग चित्रपट क्षेत्रात संधी
मुंबईत येण्य़ाआधी मनोज अलाहाबादमध्ये 1997 साली ऑल इंडिया रेडिओमध्ये 135 रुपये पगारावर काम करत होते.
 
मुंबईत आल्यावर त्यांनी अनुप जलोटा यांच्यासाठी भजनं लिहिली आणि त्यांना 3000 रुपये मिळाले,
 
2005मध्ये त्यांचं काम पाहून स्टार वाहिनीने त्यांना कौन बनेगा करोडपतीसाठी गाणं लिहून मागितलं. अशाप्रकारे ते टेलिव्हिजनच्या जगात आले.
 
2005 साली त्यांनी एका सिनेमासाठी 4 गाणी लिहिली.
 
2014 साली त्यांनी श्रेया घोषालच्या हमनशीन या गझल अल्बमसाठी लिहिल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळाली.
2014मध्ये आलेल्या व्हिलन सिनेमातलं ‘गलिया’ या गाण्यानं त्यांना यश मिळवून दिलं. या गाण्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
 
गीतकार म्हणून त्यांनी बाहुबली (हिंदी, पीके, बेबी, कपूर अँड सन्स, रुस्तम, एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी, काबिल, हफ्त गर्लफ्रेंड, ऐयारी, कबीर सिंह, रामसेतू, मिशन मजनू आणि विक्रम वेधा या सिनेमांसाठी काम केलं आहे.
 
मनोज मुंतशीर यांच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये कबीर सिंह सिनेमातलं कैसे हुआ, केसरी सिनेमातलं तेरी मिट्टी. हाफ गर्लफ्रेंडमधलं फिर मी तुमको चाहुंगा, रुस्तममधलं तेरे संग यारा यांचा समावेश आहे.
 
त्यांनी लेखक म्हणून बाहुबली भाग-1 ची हिंदी पटकथा आणि संवाद लिहून सुरुवात केली.
 
2019मध्ये त्यांचे पहिले पुस्तक ‘मेरी फितरत है मस्तान’ प्रसिद्ध झाले.
 
2022 साली त्यांना सायना सिनेमातील गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
 


Published By- Priya Dixit