शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (20:35 IST)

ललित मोदींच्या गौप्यस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलली सुष्मिता सेन..

sushmita nirav modi
उद्योगपती ललित मोदींनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत डेटिंग करत असल्याचं सांगत सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर पहिल्यांदाच सुष्मिता सेननं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय.
 
सुष्मिता सेननं इन्स्टाग्रामवर म्हटलंय की, "मी सध्या खूप आनंदी आहे. ना लग्न झालंय, ना कुठला साखरपुडा... माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारे माझ्यासोबत आहेत. पुरे आता हे स्पष्टीकरण. आता कामं करूया. आपलं-आपलं आयुष्य जगू या. माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि जे नाही झालेत, हे तुमच्या कामाचंही नाही. खूप खूप प्रेम!"
 
काल उद्योगपती ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे फोटो शेअर करत, सुष्मिताला 'माय बेटरहाफ' असं संबोधलं होतं.ललित मोदींनी सुष्मिता सेनसबोतचे चार फोटो ट्वीट केले आहेत. मालदीव आणि सार्डिनियामधून लंडनमध्ये परतल्यानंतर सुष्मिता सेनसोबतचे फोटो ललित मोदींनी ट्वीट केले.

या ट्वीटमध्ये 'नवीन आयुष्याची नवी सुरुवात' असं म्हणत सुष्मिता सेनला 'बेटरहाफ' म्हटलंय.
या ट्वीटनंतर ललित मोदींनी स्पष्टीकरणासाठी पुन्हा एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी म्हटलं की, "स्पष्ट करतो की, आम्ही लग्न केलं नाहीय. सध्या एकमेकांना डेटिंग करत आहोत. पण तेही (लग्न) लवकरच होईलय."
 
ललित मोदींच्या ट्वीटनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
 
ललित मोदी कोणत्या वादात अडकले होते?
सर्वांत पहिल्यांदा ललित मोदी राष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकले जेव्हा ते 2005 मध्ये अचानकपणे राजस्थान क्रिकेट संघाचे अध्यक्ष बनले. त्यावेळी भाजपची राजस्थानमध्ये सत्ता आली आणि त्यानंतर लगेचच ते क्रिकेट संघाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनले.
 
2008 मध्ये त्यांनी आयपीएलची सुरुवात केली होती. ते आयपीएलचे पहिले कमिश्नर बनले. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीग असा आयपीएलचा नावलौकिक बनला.
 
2010 मध्ये नव्याने तयार करण्यात आलेली कोची टस्कर्स या टीमच्या मालकांचे प्रारूप ट्वीट द्वारे उघड केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. कोची टस्कर्सच्या मालकांची नाराजी त्यांनी यामुळे ओढावून घेतली होती. या टीम मालकांपैकी एक नाव सुनंदा पुष्कर यांचे देखील होते. सुनंदा या तत्काली परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी होत्या. यानंतर शशी थरूर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
 
त्यानंतर आयपीएलमध्ये एकामागून एक भ्रष्टाचाराबाबत आरोपांच्या फैरी झडल्या. तसेच आयपीएलच्या प्रसरण हक्कांवरून देखील वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा देखील ठपका होता, त्यांनी हे आरोप फेटाळले होते.
 
2013 मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर नेहमीसाठी बंदी घातली.