गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (14:15 IST)

हेमा कमिटीच्या अहवालानं मल्याळम फिल्म इंडस्ट्री अशी सापडली वादाच्या भोवऱ्यात, अनेकांचं करियर दावणीला

एका अहवालानं मल्याळम चित्रपटसृष्टीलाच नव्हे संपूर्ण देशालाच हादरवून टाकलं आहे.एरव्ही उत्तम चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेली मल्याळम चित्रपटसृष्टी सध्या वेगळ्याच मुद्यासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
त्यामागचं कारण देखील तसंच आहे. अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाची प्रकरणं, ढिगभर तक्रारी आणि न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल, यामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत मोठं वादळ निर्माण झालं आहे.
लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी काहींना नाईलाजानं त्यांचं करिअर देखील सोडावं लागलं.

अभिनेत्री, महिला कलाकारांनी प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक यांच्याबद्दल, ज्या तक्रारी केल्या त्या अत्यंत धक्कादायक आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीतील काही ख्यातनाम अभिनेते-दिग्दर्शक आपलं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप या अभिनेत्रींनी केला आहे.
त्यामुळे न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात ज्या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत त्यांना दुजोरा मिळतो.
हा अहवाल जेव्हा प्रसिद्ध करण्यात आला तेव्हा त्यातील काही भाग वगळण्यात आला. यामध्ये लैंगिक शोषण करणाऱ्यांची आणि ज्यांचं लैंगिक शोषण झालं, त्यांची नावं होती.
या सगळ्या घडामोडींनंतर मल्याळम सिनेमाचे मोठे स्टार मोहनलाल यांनी 'असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट' या संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 
संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिल्यावर ही संघटनाही बरखास्त करण्यात आली आहे.
 
'आणखी काही गंभीर मुद्दे समोर येऊ शकतात'
मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या महिलांनी, 2009 नंतर त्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांची नावं गेल्या 48 तासांत उघड केली आहेत.
विशेष म्हणजे ज्या लोकांवर हे आरोप झाले आहेत त्यातील फक्त एकानंच अधिकृतपणे पोलिसांना सांगितलं आहे की, त्याच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत.
अलीकडेच केरळ सरकारनं एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT)तयार केली आहे. या टीममध्ये चार महिला पोलिस आयपीएस अधिकारी आहेत.
मल्याळम चित्रपटसृष्टीत लैंगिक शोषण झालेल्या महिलांच्या तक्रारींची दखल घेणं हे या एसआयटीचं काम आहे. अर्थात ही टीम एफआयआर मात्र नोंदवणार नाही.
बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा यांनी, रंजीत या प्रसिद्ध अभिनेत्यावर आरोप केले आहेत. मात्र रंजीत यांनी हे फेटाळले आहेत.
 
दरम्यान त्यांनी 'केरल चलचित्र अकॅडमी'च्या चेअरमनपदावरून राजीनामा दिला आहे.
 
अभिनेत्री श्रीलेखा यांनी, 26 ऑगस्टला कोचीच्या पोलीस आयुक्तांकडे अधिकृतपणे तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार अजामीनपात्र गुन्ह्यांतर्गत नोंदवण्यात आली आहे.
 
माला पार्वती या अभिनेत्रीनं बीबीसीला सांगितलं की, "मोजकेच लोक समोर आले आहेत. आणखी काही गंभीर मुद्दे समोर येऊ शकतात. ज्या लोकांनी उघडपणे आरोप केले आहेत ते हेमा समितीसमोर हजर होणाऱ्यांपैकी नव्हते."
केरळ सरकारच्या आदेशावरून 2017 मध्ये हेमा समिती स्थापन करण्यात आली होती. 'वुमेन इन सिनेमा कलेक्टिव्ह' म्हणजे डब्ल्यूसीसी (WCC)नं केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना यासंदर्भात आवाहन केलं होतं.
एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं चारजणांनी लैंगिक शोषण केल्यानंतर या मुद्दा समोर आला होता आणि समितीची स्थापना झाली होती.
 
अभिनेते दिलीप या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. सध्या त्यांना जामीन मिळालेला आहे.
 
केरळ सरकारनं हा अहवाल साडेचार वर्षांनी जाहीर केला आहे. पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या सर्व तक्रारींचा तपास करणार असल्याचंही केरळ सरकारनं म्हटलं आहे.
 
केरळ सरकारनं या प्रकरणांचा तपास स्वत:हून करणार असल्याची बाब नाकारली आहे. मात्र दोन तक्रारी नोंदवण्यात आल्यानंतर जेव्हा दबाव वाढला तेव्हा राज्य सरकारनं एसआयटी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तक्रारींमध्ये काय म्हटलं आहे?
ताज्या तक्रारींमध्ये ज्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्यांचा उल्लेख हेमा समितीच्या अहवालात देखील होता.
 
तक्रारदार महिलांनी त्यांच्या लैंगिक शोषणाबद्दल यात सांगितलं आहे. त्यांना कसं वारंवार 'तडजोड करायला' किंवा 'जुळवून घ्यायला' सांगितलं जात होतं, त्याबद्दल सांगितलं आहे.
 
त्याबदल्यात त्यांना असोसिएशन ऑफ मल्याळम मूवी आर्टिस्ट म्हणजे एएमएमए (AMMA)चं सदस्य देण्यात येईल असं सांगण्यात आलं.
 
मीनू मुनीर यांनी बीबीसीला सांगितलं की, "जेव्हा मी चित्रीकरण होत असलेल्या स्टेट सेक्रेटेरियटच्या प्रसाधनगृहातून बाहेर पडले तेव्हा हे सर्व प्रकरण घडलं होतं. एका ख्यातनाम अभिनेत्यानं मला मागून पकडलं आणि माझ्या इच्छेविरुद्ध माझं चुंबन घेतलं."
 
त्या पुढे म्हणाल्या, "मी त्याला धक्का दिला आणि तिथून पळून गेले. तेव्हा त्रिवेंद्रमध्ये माझं एक अपार्टमेंट आहे आणि तू तिथे मला भेट, असं तो म्हणतच राहिला. आणखी एक प्रसिद्ध अभिनेता होता. तो मला म्हणायचा की हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडा ठेव, मी येईन."
मीनू मुनीर सांगतात, "मी स्पष्टच सांगितलं की हे शक्य नाही. तो म्हणाला की तुला हे करावंच लागेल कारण मी एका पंचतारांकित हॉटेलमधून खास तुझ्यासाठी या हॉटेलमध्ये आलो आहे. पुढच्याच दिवशी सेटवर तो विनाकारण ओरडत होता."
 
"एका आमदारानं आणि अभिनेत्यानं देखील माझ्याकडे अशीच मागणी केली. मी त्यांच्या जाळ्यात अडकली नाही. कारण मला या कलेविषयी प्रेम आहे म्हणून मी या क्षेत्रात आले आहे."
 
मुनीर यांना वाटलं की त्या जर एएमएमएच्या सदस्य झाल्या तर त्यांचं लैंगिक शोषण होणार नाही. मात्र जर त्यांनी 'तडजोड केली' आणि 'जुळवून घेतलं' तर त्यांना हे सदस्यत्व मोफत मिळेल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांना धक्काच बसला.
 
त्या म्हणाल्या, "एक प्रोडक्शन कंट्रोलर होता. तो कारमध्ये माझ्याशी फारच वाईट प्रकारे वागला. मी 2013 मध्ये एका मासिकाला मुलाखत दिली होती. त्यामध्ये मी या सर्व गोष्टींबद्दल बोलले होते, मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही."
 
ज्यांच्यावर आरोप झाले, ते काय म्हणत आहेत?
या अहवालात ज्या अभिनेते आणि दिग्दर्शकांचं नाव आहे, त्यांच्यापैकी कोणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाल्यावर या अहवालात त्याचा समावेश केला जाईल.
 
ही सर्व प्रकरणं 2008 ते 2012 या काळातील आहेत. गीता विजयन आणि श्रीदेविका या आणखी दोन अभिनेत्रींनी एका ख्यातनाम दिग्दर्शकावर याप्रकारचे आरोप केले आहेत. त्यांनी आरोप केले आहेत की हा दिग्दर्शक अर्ध्या रात्री त्यांचा दरवाजा वाजवायचा. श्रीदेविका यांच्या बाबतीत असं चार दिवस घडलं. गीता विजयन या प्रकरणात तक्रार करण्यासाठी तयार आहेत. ज्या दिग्दर्शकावर हे आरोप करण्यात आले आहेत त्यांनी या आरोपांबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर हा अहवाल अपडेट केला जाईल.
 
आणखी एका प्रकरणात एका पटकथा लेखिकेनं पोलिस महासंचालकांकडे (डीजीपी) तक्रार केली आहे.
या तक्रारीत म्हटलं आहे की 2022 मध्ये त्या कोल्लममध्ये एका चित्रपटासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळेस एका अभिनेत्यानं आणि दिग्दर्शकानं त्यांचं लैंगिक शोषण केलं.

चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या अभिनेत्यानं आणि दिग्दर्शकानं त्या पटकथा लेखिकेची माफी मागितली. त्याशिवाय त्या पटकथा लेखिकेनं या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये यासाठी एका सहाय्यकाद्वारे 10 हजार रुपयांची रक्कम देण्याचा प्रयत्न केला. मुनीर यांच्याप्रमाणेच या पटकथा लेखिकेनं देखील त्यानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.
 
रेवती संपथ यांनी अभिनेते सिद्दीकी यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. यानंतर सिद्दीकी यांनी एएमएमए च्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यात त्यांनी रेवती त्यांच्यावर खोटा आरोप करत असल्याची तक्रार केली आहे. रेवती आपल्या विरुद्धच्या गुन्हेगारी कटात सहभागी असल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
 
2016 मध्ये चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच्या स्क्रिनिंग नंतर बलात्कार केल्याचा आरोप खोटा असल्याचं सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.सिद्दीकी म्हणाले, "त्या दिवशी रेवती त्यांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत मला भेटल्या होत्या. साडे आठ वर्षानंतर त्या माझ्यावर बलात्काराचा आरोप करत आहेत. तसं काहीही घडलं नव्हतं. पाच वर्षांपूर्वी लैंगिक शोषणासारखी कोणतीही घटना घडलेली नाही."सिद्दीकी पुढे म्हणाले, एएमएमए मधील माझी प्रतिष्ठा डागाळावी असा या आरोपांचा उद्देश दिसतो आहे. आता त्या जो आरोप करत आहेत, तो आरोप आधीच्या आरोपांपेक्षा एकदम वेगळा आहे.
 
अभिनेते पृथ्वीराज सुकुमारन यांनी एक वक्तव्यं देत म्हटलं आहे की, "जर एखादा आरोप करण्यात आला असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे. चौकशी केल्यानंतर जर आरोप खरे असल्याचं सिद्ध झालं तर दोषींना कठोर शिक्षा दिली पाहिजे."
 
"मात्र जर चौकशीअंती आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं तर त्यासंदर्भात देखील कठोर शिक्षा दिली पाहिजे."
 
कायदा काय सांगतो?
या प्रकरणात विरोधी पक्षांनी केरळ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्याचबरोबर हेमा समितीची अहवाल उशीरा प्रसिद्ध केल्यावर विविध नागरी समुदायांमधून (सिव्हिल सोसायटी) देखील सरकारवर टीका केली जाते आहे.याबाबतीत केरळ सरकारचं म्हणणं आहे की लैंगिक शोषण झालेल्या अभिनेत्रींनी तक्रार दाखल केल्यास सरकार त्याची चौकशी करेल.दुसऱ्या भाषेत सांगायचं तर केरळ सरकार या प्रकरणात हेमा समितीच्या अहवालावर स्वत:हून कारवाई करणार नाही.केरळ सरकारमधील एका मंत्र्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की तक्रार करण्यासाठी महिला पुढे आल्या नाहीत तर सरकारला कारवाई कशी करता येईल?
 
याबाबतीत आता असा प्रश्न आहे की जर गुन्हा घडला असेल तर राज्य सरकार स्वत:हून कारवाई करू शकतं का. या मुद्द्याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेतलं जातं आहे.मात्र याचसंदर्भात असाही युक्तिवाद केला जातो आहे की समितीच्या समोर ज्यांनी जबाब नोंदवला आहे, त्यासंदर्भात चौकशी केली पाहिजे.माला पार्वती म्हणतात, समितीसमोर या महिलांनी पुरावे देखील दिले होते ही गोष्ट विसरता कामा नये.
 
केरळच्या उच्च न्यायालयातील वकील संध्या राजू यांनी बीबीसीला सांगितलं की "जेव्हा कोणताही गुन्हा घडतो तेव्हा तो सरकारच्या विरोधात घडलेला गुन्हा असतो. तपास यंत्रणांनी यासंदर्भात पावलं उचलायला हवीत. त्यांनी प्रक्रिया सुरू करून तक्रारकर्त्यांची मदत केली पाहिजे.""याचा अर्थ असा नाही की पीडितेनं तक्रार केल्यावरच तपास केला जाऊ शकतो."वकील संध्या राजू म्हणाल्या, "जर एखादा गुन्हा समोर आला तर राज्य सरकारच मुख्य पक्षकार असतं. अशा परिस्थितीत सरकारला कारवाई करावी लागेल."

केरळ उच्च न्यायालय या प्रकरणात निर्णय घेईल अशी आशा कायदेशीरदृष्ट्या व्यक्त करण्यात येते आहे. न्यायालयानं राज्य सरकारला हेमा समितीचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये त्या 54 पानांचाही समावेश आहे, ज्यामध्ये कथितरित्या लैंगिक शोषण करणाऱ्यांबरोबरच पीडितांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला होता. वकील संध्या म्हणतात, "राज्य सरकारनं जर यात पुढाकार घेतला तर त्याचे दूरगामी परिणाम होतील. फक्त चित्रपटसृष्टीतच नाही तर मॅन्युफॅक्चरिंग, कॉर्पोरेट, कायदा यासारख्या इतरही विविध क्षेत्रांमध्ये या प्रकरणाचा प्रभाव दिसून येईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Published By- Priya Dixit