रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified बुधवार, 16 मार्च 2022 (09:20 IST)

'द कश्मीर फाईल्स: विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटावरून वाद का निर्माण झालाय?

काश्मीरमधून 1990 च्या दशकात मोठ्या संख्येने हिंदू पंडितांनी पलायन केलं. काश्मीर सोडून पलायन केलेल्या हिंदू पंडितांवरील अत्याचाराची गोष्ट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटातून लोकांसमोर साकारण्याचा प्रयत्न केलाय.
 
'द कश्मीर फाईल्स' चित्रपट काल्पनिक असून विद्यापीठात शिकणाऱ्या एका युवकाच्या गोष्टीवर अधारित आहे. आजोबांनी या मुलाला त्याच्या आई-वडीलांचा मृत्यू अपघातात झाल्याचं सांगितलेलं असतं. पण, आई-वडीलांचा मृत्यू अपघातात नाही. तर, इस्लामिक कट्टरवाद्यांनी त्यांची हत्या केली याबाबत त्याला माहिती मिळते.
 
केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने या चित्रपटाला समर्थन दिलंय. पण, या चित्रपटामुळे भारतात मोठा वाद सुरू झालाय. खासकरून सोशल मीडियावर.
 
काश्मिरी पंडितांना का आपलं घरदार सोडून पळून जावं लागलं होतं?
'आम्ही काश्मिरी आहोत, काश्मीर सोडून जायचा प्रश्नच नाही'
चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्र्या मिळाल्या आहेत. पण याचं समर्थन करणारे सांगतात,की हा चित्रपट काश्मीरमध्ये लोकांवर झालेल्या अत्याचाराचं खरं वर्णन करतो, तर काही समीक्षक याला इस्लामविरोधी आणि वास्तवाला धरून नाही असं म्हणतात.
 
काश्मीर वादग्रस्त मुद्दा
या चित्रपटात काश्मीरचा इतिहास सांगण्यात आलाय.
 
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं काश्मीर नेहमीच संवेदशील मुद्दा राहिलेला आहे. मुस्लिम बहुल राज्य असलेल्या काश्मिरमध्ये1980 पासून भारताविरोधात सशस्त्र उठाव सुरू आहे. 1990 च्या दशकात इस्लामिक कट्टरवाद्यांनी काश्मिरमध्ये अल्पसंख्यांक हिंदू पंडीतांना टार्गेट करण्यास सुरूवात केली.
 
या हिंसाचारात अनेकांना जीव गमवावे लागले, तर हजारो लोकांनी काश्मिरमधून पलायन केलं. आपलं घर सोडून निघून गेलेले लोक कधीच परत आले नाहीत.
 
यानंतर भारत सरकारने काश्मीरमध्ये लष्कर तैनात केलं. सैन्याला अटक आणि चौकशी करण्याचे अमाप अधिकार दिले. ज्यामुळे भारतीय सैन्यावर अनेकवेळा लोकांवर अत्याचार करण्याचे आरोपही झाले. वेळोवेळी हे आरोप फेटाळण्यात आले. पण, काश्मिरींमध्ये केंद्राविरोधात तीव्र नाराजी पसरली. काश्मीरमध्ये केंद्राविरोधात अनेक आंदोलनं करण्यात आली ज्यात अनेकांचे जीव गेले.
 
केंद्रातील मोदी सरकारने काश्मीरच्या मुद्याचा राजकारणासाठी वापर केला. हिंदू पंडीतांच्या पलायनाच्या मुद्यावर तत्कालीन कॉंग्रेस सरकारने काश्मीरी हिंदूना वाळीत टाकलं असा आरोप भाजपने केला. पण, काश्मीरी म्हणतात कोणत्याच सरकारने त्यांच्यासाठी काही केलं नाही.
 
पत्रकार आणि लेखक राहुल पंडीता सांगतात, "काश्मीरबाबत अनेक चित्रपट आणि पुस्तकं आहेत. काही हिंदू पंडीतांचं पलायन आणि हे कशामुळे घडलं यावर लक्ष केंद्रीत करतात."
 
'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाबद्दल खूप तीव्र भावना दिसून आल्यात. काश्मीरींना वाटतं आलंय की त्यांची गोष्ट कधीच योग्य पद्धतीने सांगण्यात आलेली नाही, राहुल पंडीता पुढे म्हणाले.
 
काश्मिरी हिंदूंच्या पलायनावर राहुल पंडीता यांनी Our Moon Has Blood Clots: A Memoir of a Lost Home हे पुस्तक लिहिलं आहे. लहानपणी श्रीनगरहून पलायन करताना त्यांनी काय अनुभवलं यावर आधारित हे पुस्तक आहे.
 
"माझं पुस्तक प्रकाशित होऊन 10 वर्ष झाली. अजूनही मला दिवसातून तीन-चार ईमेल येतात. भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही लोक ईमेल करतात. लोक सांगतात आम्हाला ही गोष्ट किती गंभीर आहे याची माहिती नव्हती," राहुल पंडीता सांगतात.
 
पण काही लोकांचं मत आहे की, भारतात मागास जाती आणि उत्तरपूर्व राज्यात लष्कराकडून लोकांवर करण्यात आलेले अत्याचार याबाबत बॉलिवूडने कधीच काही दाखवलं नाही.
 
डॉक्युमेंन्ट्री बनवणारे संजय काक सांगतात, "ही गोष्ट कधीच दाखवली गेली नाही असं म्हटलं की, मला चकित झाल्यासारखं होतं. ही गोष्ट बॉलीवूडने दाखवली नाही. कारण बॉलीवूड अशा गोष्टी दाखवत नाहीत."
 
संजय काक स्वत: काश्मिरी पंडीत आहेत.
 
"बॉलीवूडने 1984 च्या दिल्ली दंगलीबाबतची गोष्ट कधी सांगितली? 2002 च्या गुजरात दंगलीची गोष्ट सांगण्यात आली? भारतात अशा हजारो घटना आहेत. ज्यावर चित्रपट बनवण्यात आलेले नाहीत," ते पुढे सांगतात.
 
ध्रुवीकरण आणि राजकारण
काश्मीरी पंडीतांमध्ये हा चित्रपट कमी कालावधितच लोकप्रिय झालाय.
 
काही लोकांनी या चित्रपटाचं कौतुक केलंय. मात्र मुस्लिम समुदायाचं खलनायकीकरण योग्य नाही अशी प्रतिक्रिया काहींनी दिलीये.
 
या चित्रपटाबाबत सामान्य प्रेक्षकांच्याही संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.
 
पण, भाजपच्या मंत्र्यांकडून या चित्रपटाबाबत समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकांना हा चित्रपट पहाण्याची आग्रहाची विनंती केलीये.
 
चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तर, अक्षय कुमार, कंगना राणावत यांनी या चित्रपटाच्या बाजूने ट्विट केले आहेत.
 
हा चित्रपट फक्त भाजप सरकारमधे असल्यामुळेच बनवणं शक्य झालं? यावर प्रमुख कलाकार अनुपम खेर म्हणतात, "हे खरं आहे. प्रत्येक चित्रपटाची एक वेळ असते."
 
चित्रपटाने दिग्दर्षक विवेक अग्निहोत्री यांच्यावर भाजपचे समर्थक असल्याचा आरोप नेहमी केला जातो. गेल्या आठवड्यात कोर्टाने अग्निहोत्री यांना चित्रपटात भारतीय वायू सेनेच्या एका अधिकाऱ्याच्या हत्येचं दृश्य दाखवण्यावर बंदी घातली होती. या अधिकाऱ्याच्या पत्नीने तत्थ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्षत केलेला 'द ताश्कंद फाइल्स' चित्रपटही वादात सापडला होता. यात भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण चित्रपट तत्थ्यांना धरून नाही असा आरोप त्यावेळीही करण्यात आला होता.
 
लाल बहादुर शास्त्री यांच्या नातवाने हा चित्रपट अनावश्यक वाद निर्माण करणारा आहे, असं म्हणत विवेक अग्निहोत्री यांना नोटीस पाठवली होती.
 
फॅक्ट चेकिंग वेबसाईट अल्ट-न्यूजचे संस्थापक मोहम्मद झुबैर यांनी काही व्हीडिओ प्रसिद्ध केले होते. यात हा चित्रपट संपल्यानंतर थिएटरमध्ये मुसलमानांविरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचं दिसून येतीये.
 
दुसरीकडे, काश्मिरी पंडितांच्या पलायनावर 2020 साली 'शिकारा' नावाचा चित्रपट बनवण्यात आला होता. मात्र हिंदू कट्टरवाद्यांनी काश्मीरचा प्रश्न योग्य दाखवला नाही असा आरोप चित्रपट निर्मात्यांवर केला.
 
संजय काक पुढे सांगतात, "या चित्रपटात उजव्या विचारसरणीच्या लोकांना अपेक्षित स्टोरी दाखवण्यात आलीये. शिकारा त्या धर्तीवर नव्हता. त्यामुळे यावर आरोप करण्यात आले. "
 
आता 'द कश्मीर फाईल्स' चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उजव्या विचारसरणीचे सर्व लोक पुढे सरसावल्याचं चित्र आहे.