1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Trailer of the second season of Mahabharata Ek Dharmayuddha released

अधर्माचा अतिरेक झाल्यावर पुन्हा अवतरणार भगवान श्रीकृष्ण! 'महाभारत: एक धर्मयुद्ध'च्या दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित

जेव्हा अधर्माचा अतिरेक होतो, तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्ण पुन्हा अवतरतात! धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाची गाथा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. जिओहॉटस्टारने 'महाभारत: एक धर्मयुद्ध' या एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेल्या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. कलेक्टिव्ह स्टुडिओजच्या 'हिस्ट्रीव्हर्स' अंतर्गत साकारलेली ही मालिका २४ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, दर आठवड्याला याचे नवे भाग प्रदर्शित केले जाणार आहे.

भारतीय संस्कृतीतील सर्वात प्रभावशाली आणि अजरामर महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारताची कथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे. भारतातील पहिली प्रीमियम एआय-आधारित मालिका म्हणून ओळखली जाणारी ही निर्मिती महाभारतातील व्यक्तिरेखा, प्रसंग आणि मूल्यांना एका वेगळ्या दृश्यात्मक स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणते.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये महाभारताच्या कथेला कलाटणी देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग पाहायला मिळतात. द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा अचूक वेध घेण्याचा पराक्रम असो किंवा भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने केलेली दैवी मदत असो, या प्रसंगांमधून महाभारतातील संघर्षाची तीव्रता अधोरेखित होते. 'छल, कपट, षड्यंत्र, अपराध आणि घोर अपमान' या भगवान श्रीकृष्णांच्या शब्दांतून महायुद्धामागील अन्याय आणि घटनांची मालिका उलगडते. युद्धाचा अंतिम निर्णय रणभूमीवर झाला असला, तरी त्याची बीजे खूप आधीच पेरली गेली होती, याची जाणीवही ट्रेलर करून देतो.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रोहित जयसिंग वैद यांनी या दुसऱ्या पर्वाचे दिग्दर्शन केले आहे. महत्त्वाकांक्षा, बदलती नाती, निष्ठा, संघर्ष आणि कठीण निर्णय अशा अनेक पैलूंमधून ही कथा पुढे सरकते. प्रत्येक कृतीचे परिणाम केवळ संबंधित व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचा व्यापक प्रभाव संपूर्ण समाजावर पडतो, हे या पर्वातून दाखवण्यात येणार आहे. धर्म, कर्तव्य आणि नीतीमूल्यांसारखे कालातीत प्रश्न नव्या पिढीसमोर मांडण्याचा या मालिकेचा प्रयत्न आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

जिओस्टार आणि कलेक्टिव्ह स्टुडिओजच्या 'हिस्ट्रीव्हर्स' यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. मालिकेच्या एआय तंत्रज्ञान आणि निर्मितीची जबाबदारी कलेक्टिव्हच्या 'गॅलरी५' या एआय तंत्रज्ञान व प्रॉडक्शन स्टुडिओने सांभाळली आहे. महाभारताचे विस्तीर्ण विश्व, त्यातील व्यक्तिरेखा आणि भव्य प्रसंग एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारण्यात आले आहेत. या मालिकेची निर्मिती विजय सुब्रमण्यम यांनी केली आहे.
कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्कचे संस्थापक आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सुब्रमण्यम म्हणाले, “भारतीय संस्कृतीत कथांचा अमूल्य ठेवा आहे. यातील अनेक कथा पिढ्यान्पिढ्या प्रेक्षकांना प्रेरणा देत आल्या आहेत. या कथा पारंपरिक माध्यमांच्या पलीकडे नेऊन नव्या आणि प्रभावी स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी संधी आहे. 'हिस्ट्रीव्हर्स'च्या माध्यमातून आम्ही भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेल्या कथा अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. 'गॅलरी५'च्या एआय-आधारित निर्मिती क्षमतेमुळे भव्यता, दृश्यात्मक गुंतागुंत आणि कथाकथनाच्या नव्या शक्यता शोधणे शक्य झाले आहे. 'महाभारत: एक धर्मयुद्ध'च्या दुसऱ्या पर्वातून भारतीय कथाकथनासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काय साध्य करता येऊ शकते, याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत कथेचा गाभा केंद्रस्थानी ठेवला आहे.”

'महाभारत: एक धर्मयुद्ध'चे दुसरे पर्व २४ नोव्हेंबरपासून केवळ जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार असून, दर आठवड्याला मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
पुढील लेख
एकता कपूरच्या 'हीरो की हॉरॉरोइन' या हॉरर चित्रपटाचे थरारक पोस्टर प्रदर्शित