1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (18:23 IST)

परिणिती चोप्रा-राघव चढ्ढा यांची प्रेमकहाणी कधी आणि कशी सुरू झाली?

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचं लग्न रविवारी (24 सप्टेंबर) पार पडलं.
 
त्यांच्या लग्नाचे काही कार्यक्रम दिल्लीत पार पडले, तर लग्न उदयपूरमध्ये झालं.
 
33 वर्षीय राघव चढ्ढा हे दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. पण आता ते पंजाबमधून राज्यसभा सदस्य बनले आहेत.
 
अण्णा हजारे दिल्लीत आंदोलन (2011) करत असताना राघव आणि अरविंद केजरीवाल यांची भेट झाली होती.
 
त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत प्रवेश केला.
 
राघव चड्ढा यांचे कुटुंब जालंधरशी संबंधित असून अनेक दशकांपूर्वी त्यांचे कुटुंब दिल्लीत येऊन स्थायिक झाले होते.
 
दिल्ली आणि लंडनमधून शिक्षण
राघव चढ्ढा यांनी दिल्लीतील मर्दान स्कूलमधून शिक्षण घेतले, तर 2009 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.कॉमची पदवी प्राप्त केली.
 
त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामधून CA केले.
 
चढ्ढा हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत.
 
त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलं. तसंच लंडनमध्ये त्यांना वेळ घालवायला आवडतं, असं चढ्ढा यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
 
परदेशात शिक्षण घेतल्यानंतर ते मायदेशी परतले. कारण त्यांचं देशावर प्रेम आहे आणि त्याचे आई-वडीलही इथेच राहतात, असंही त्यांनी त्या मुलखतीत सांगितलं.
 
चार्टर्ड अकाउंटंट ते राजकारण
आम आदमी पार्टीचा एक लोकप्रिय तरुण चेहरा मानला जाणारे राघव चढ्ढा हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत.
 
2012 साली त्यांनी 'आप'मध्ये प्रवेश केला. 2013 मध्ये ते 'आप'चा निवडणूक जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचे सदस्य होते.
 
राघव चढ्ढा यांनी दिल्ली सरकारमध्ये माजी अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
 
दिल्लीच्या राजिंदर नगरचे आमदार राघव चढ्ढा हे दिल्ली जल बोर्डाचे अध्यक्षही राहिले आहेत.
 
ते आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत.
 
राजकीय पक्षाचे ते सर्वात तरुण प्रवक्ते देखील आहेत.
 
पंजाबमधील 2022 च्या निवडणुकीसाठी ते आम आदमी पक्षाचे सह-प्रभारी होते.
 
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांची पंजाबचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली होती.
 
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मोठ्या विजयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
पण, 2019 मध्ये त्यांनी दक्षिण दिल्लीतून भाजप नेते रमेश बिधुरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा पराभव झाला.
 
त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी दिल्लीतील राजेंद्र नगरमधून निवडणूक जिंकली आणि प्रतिनिधी बनले.
 
2022 मध्ये पंजाबमध्ये आम आदमीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा राघव चढ्ढा यांना पंजाबमधून राज्यसभा सदस्य होण्याची संधी मिळाली.
 
आम आदमी पार्टीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, राघव यांच्या मते, त्यांनी राजकारण निवडले नाही, तर राजकारणाने त्यांची निवड केली आहे.
 
राघव म्हणाले, "माझ्या कुटुंबाला मी AAP सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश करण्याच्या कल्पनेने खूप बरं वाटलं. कारण हा भ्रष्टाचारविरोधी चळवळीला पाठिंबा दर्शविणारा पक्ष होता."
 
परिणिती चोप्राचे बॉलिवूड करिअर
अभिनेत्री परिणिती चोप्रा हे बॉलिवूडमधलं एक प्रसिद्ध नाव आहे.
 
तिने 'इशकजादे', 'गोलमाल अगेन', 'हसीं तो फसीं', 'केसरी', 'मेरी प्यारी बिंदू', 'शुद्ध देसी रोमान्स' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
परिणिती चोप्रा पंजाबी कुटुंबातील असून ती हरियाणातील अंबाला येथील आहे.
 
IMB वेबसाइटनुसार तिचे वडील एक व्यावसायिक आहेत. ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे.
 
परिणितीने मँचेस्टर बिझनेस स्कूल UK येथून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला आहे.
 
चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी तिने यशराज फिल्म्समध्ये PR सल्लागार म्हणून काम केले.
 
राघव-परिणितीची प्रेमकहाणी
परिणिती आणि राघव लंडनमधील शैक्षणिक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात.
 
ANIच्या वृत्तानुसार तेव्हापासून दोघे मित्र आहेत.
 
राघव आणि परिणिती एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते आणि ते मित्र होते.
 
पण 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार जेव्हा परिणीती पंजाबमध्ये तिच्या 'चमकीला' या चित्रपटासाठी शूटिंग करत होती तेव्हापासून ते डेटिंग करत होते.
 
यानंतर ते अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. त्यामुळे ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
 
काही महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टीच्या लुधियानाच्या राज्यसभा सदस्याने या दोघांचे छायाचित्र ट्वीट केले होते. पण राघव यांनी त्याची औपचारिक पुष्टी केली नाही.
 
'चमकिला'मध्ये परिणीती आणि दिलजीत दोसांझ एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती इम्तियाज अली यांनी केली असून अमर सिंग चमकिला आणि अमरजोत कौर या गायक जोडीच्या जीवनावर आधारित आहे.
 
या चित्रपटात परिणीती अमरजोतच्या भूमिकेत तर दिलजीत चमकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.