गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (20:03 IST)

जेव्हा राजकुमार राव शाहरुखच्या घराबाहेर बसायचा

कधी 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये शमशादची भूमिका साकारणारा तर कधी 'बरेली की बर्फी'मध्ये प्रीतम विद्रोही नावाचं कॅरेक्टर करणारा तर दुसरीकडे न्यूटनमधला न्यूटन कुमार म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडणारा, प्रत्येक पात्रात जीव ओतणारा राजकुमार राव.
 
या अष्टपैलू अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.आपल्याला हे शिखर गाठायचं आहे हे राजकुमार रावने त्याच्या लहानपणीचं ठरवलं होतं.
 
शाळेपासूनच सुरू झालेली नाटकांची मालिका कॉलेजमध्ये रंगभूमीपर्यंत पोहोचली.
 
एफटीआयआयमध्ये सिनेमाचा अभ्यास आणि नंतर चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता बनण्यापर्यंतच्या त्याच्या या प्रवासाचं श्रेय तो देतो शाहरुख खानला.
 
नयनदीप रक्षित यांनी बीबीसी हिंदीसाठी राजकुमार राव यांच्याशी खास बातचीत केली आहे.
 
लहानपणापासूनच अभिनेता बनण्याचं स्वप्न
राजकुमार म्हणतो की, लहानपणापासूनच त्याचा हेतू स्पष्ट होता. त्याला अभिनेताच व्हायचं होतं. तो सांगतो, "शाळेत असतानाच ठरवलं होतं. कधी इतर गोष्टींचा विचार केला ना कधी तसा प्रयत्नही केला. शाळेतच नाटकात भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये थिएटर केलं, मग फिल्म स्कूलमध्ये गेलो."
 
राजकुमार सांगतो की, मध्यमवर्गीय कुटुंबात अभिनयाकडे करिअर म्हणून बघणं कठीण होतं. पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला खूप मदत केली, कधीही कशासाठीही थांबवलं नाही. यामागे प्रेरणा होती शाहरुख खानची.
 
राजकुमार पुढे सांगतो, "शाहरुख खान... एक दिल्लीचा मुलगा, मुंबईला गेला आणि इतका मोठा स्टार झाला. त्याचे सिनेमे बघतच आम्ही मोठे झालो आहोत. तो करू शकतो तर आपण ही करू शकतो असं वाटायचं. त्यानंतर परिस्थिती बदलली आणि दृष्टिकोनही बदलला."
 
राजकुमार रावला वाटतं की तो मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे अजूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो सांगतो की त्याने बरेच अवघड प्रसंग पाहिलेत आणि या अशा प्रसंगातून तरून जायचं असेल तर प्रत्येकाने आनंदी असायला पाहिजे असंही तो म्हणतो.
 
त्याच्या वडिलांचा पगार थकला होता तेव्हाचा किस्सा राजकुमार सांगतो, "माझ्या वडिलांचा पगार होत नव्हता. आम्ही तिघं भावंडं एकाच शाळेत जायचो. आम्ही तिघेही नेहमीच एक्स्ट्राकरिक्युलर अॅक्टिविटीमध्ये सहभागी असायचो त्यामुळे आम्ही शिक्षकांचे लाडके होतो. त्यावेळी शिक्षकांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. आम्हाला दोन वर्षे शिकवलं, आमच्या शाळेची फी भरली. चांगल्या माणसांबरोबर नेहमीच चांगलं होतं."
 
'बूगी वूगी'च्या ऑडिशनसाठी पहिल्यांदा मुंबईत
आता मुंबईत आपलं नाव करणारा राजकुमार राव वयाच्या 16-17 व्या वर्षी पहिल्यांदा मुंबईत आला होता. त्यावेळी तो आपल्या धाकट्या भावासोबत 'बुगी वूगी' या डान्स रिअॅलिटी शोच्या ऑडिशनसाठी द्यायला आला होता
 
हा किस्सा सांगताना राजकुमार म्हणतो, "बुगी-वूगीचं ऑडिशन चालू होतं. काहीच माहिती नव्हतं. अचानकच प्लॅनिंग झालं. मला मुंबईला यायचं होतं, हे शहर बघायचं होतं. आम्ही 90 च्या दशकात जे शॉट्स पाहायचो ते चर्चगेटसमोर झूम आउट केलेले असायचे, एक माणूस रस्ता ओलांडायचा आणि टॅक्सी बोलवायचा. पण आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही चर्चगेटला गेलोच नाही."
 
याच काळात तो तासनतास शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर बसायचा.
 
"शाहरुख सरांना पाहण्यासाठी मी मन्नतजवळ बसायचो. ते तर कधी दिसले नाहीत मात्र गौरी मॅडम एकदा गाडीतून जाताना दिसल्या होत्या," तो म्हणतो.
 
2008 मध्ये कामाच्या शोधात गाठली मुंबई
राजकुमार राव पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा पासआउट आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2008 मध्ये तो मुंबईला पोहोचला.
 
राजकुमार राव सांगतो, "त्यावेळी माझ्याकडे पुण्यात एक बाईक होती. त्यावरच मी माझं सामान आणलं होतं. आम्ही तीन लोक एका छोट्या घरात राहत होतो. ते खूप छोटं घर होतं, माझ्याकडे एक गादी होती, त्याच्या शेजारी एक लहान टेबल होतं ज्यावर मी माझं सामान ठेवायचो. "
 
2008 ते 2010 हा काळ राजकुमार रावसाठी अत्यंत संघर्षाचा काळ होता.
 
या काळात काय काय घडलं याविषयी सांगताना तो म्हणतो, "एकदा माझ्या बँक अकाऊंटमध्ये 18 रुपये होते. तर दुसऱ्या मित्राच्या अकाऊंटमध्ये 27 रुपये. मी विचार केला आता जेवायचं कसं? पण मी खरंच नशीबवान आहे की मी एफटीआयआयमध्ये शिकायला होतो. आमची कम्युनिटी खूपच स्ट्रॉंग आहे. मी एका मित्राला फोन केला आणि सांगितलं की मी जेवायला येतोय. त्यानंतर मी घरी फोन करून पैसे पाठवायला सांगितले."
 
तो पुढे सांगतो, "जेव्हा पहिल्यांदा मला एका जाहिरातीत काम मिळालं तेव्हा मला दिवसाला 5 हजार मिळतील असं सांगण्यात आलं. 8 तास काम करण्यासाठी 5 हजार रुपये मिळणार याचा मला आनंद झाला होता."
 
'तुझी शरीरयष्टी हिरो बनण्यासारखी नाहीये'
राजकुमार राव सांगतो की, करिअरच्या सुरुवातीला जेव्हा तो कामाच्या शोधात होता तेव्हा त्याला बऱ्याच प्रकारच्या कमेंट्स ऐकाव्या लागायच्या.
 
"बऱ्याच जणांनी अनेक गोष्टींवर कमेंट केल्या. कुणीतरी म्हटलं की तू हिरो बनू शकशील असं तुझी बॉडी तशी नाहीये. मो विचार करायचो की, मला हिरोचा टॅग नकोय, मला फक्त अभिनेता व्हायचंय. पण हा सगळा प्रवासाचाच एक भाग आहे, त्यामुळे याविषयी माझ्या मनात कोणतीही खंत नाही."
 
राजकुमार राव पुढे म्हणतो की काही काळानंतर त्याच निर्मात्यांनी मला कामासाठी विचारलं ज्यांनी माझ्या शरीरयष्टीवर कमेंट्स केल्या होत्या.
 
'बरेली की बर्फी' आणि 'स्त्री' खास
राजकुमार रावने ठरवलं होतं की काम करत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याने सुरुवातीला काही छोट्या भूमिकाही केल्या. 'बरेली की बर्फी' आणि 'स्त्री' या चित्रपटांमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली.
 
"आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीबद्दल तो म्हणतो, "मला माहीत होतं की 'एलएसडी' सारखा चित्रपट 100 कोटी कमावणार नाही. पण चित्रपट दिबाकर बॅनर्जीचा असल्यामुळे इतर डायरेक्टर तो नक्कीच पाहणार आणि तसं घडलं ही."
 
"अनुराग कश्यपने मला गँग्स ऑफ वासेपूरमध्ये घेतलं आणि त्यानंतर मला शाहिद चित्रपट मिळाला. 'बरेली की बर्फी' आणि 'स्त्री' या चित्रपटानंतर मला जाणवलं की माझ्याविषयीचं परसेप्शन आता बदलत आहे. याआधी मी ड्रामा जॉनर, इंटेंस आणि बायोपिक रोल करायचो. पण बरेली की बर्फी आणि स्त्री या चित्रपटाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलो."
 
आई-वडील सोबत नसल्याची खंत
राजकुमार रावचे आई-वडील आता या जगात नाहीत. आई सोबत नाहीये याचं मला दररोज दुःख होत असल्याचं तो सांगतो.
 
राजकुमार सांगतो, "ही खंत रोजच जाणवते, ती काही केल्या दूर होत नाही. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा ती माझ्यासाठी टाळ्या वाजवत होती याचाच मला आनंद आहे. ती आज हयात असती तर तिला घेऊन मुंबईला आलो असतो. मला असं वाटतं ती जिथे कुठे असेल तिचं माझ्यावर लक्ष आहे."