शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'बिग बॉस' विजेता मुनव्वर फारुकीच्या स्वागताला रस्त्यावर एवढी गर्दी का जमली? - ब्लॉग

मुनव्वर फारुकी 'बिग बॉस' या टीव्ही शोचा नवा विजेता आहे. बिग बॉस पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधी आहे. त्यामुळं विजेता निवडणारेही कोट्यवधी असतील. पण हा विजेता सध्या इतर अनेक कारणांमुळं चर्चेत आहे.
काही लोक हा एका मुस्लीम तरुणाचा विजय असल्याचं म्हणत आहेत. काहीजण याकडं धर्मनिरपेक्ष देशाची ओळख म्हणून पाहत आहेत. तर काही मुनव्वरशी संबंधित जुन्या वादाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करून, त्याला धार्मिक रुप देत आहेत. लोकांच्या दृष्टीकोनावरून या विजयासंबंधीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
मुनव्वर एक कॉमेडी आर्टिस्ट आहे. विनोद हेच त्याच्या जीवनाचं सूत्र आहे. या विनोदामुळंच तो वादांमध्येही अकडलेला आहे आणि त्याला तुरुंगवासही भोगावा लागला आहे. मुनव्वर मुंबईच्या ज्या भागात राहतो, त्याला डोंगरी म्हटलं जातं. हे नाव अनेक कारणांमुळं ओळखलं जातं. हा परिसर तथाकथित उच्चभ्रू लोकांचा नाही.अशा भागातील एक तरुण एका राष्ट्रीय चॅनलवरील कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे.
 
डोंगरीचा हिरो बनला
या भागाचं नाव आतापर्यंत शक्यतो वाईट कारणांमुळंच जगासमोर आलेलं आहे. त्यामुळं अशा भागाचं नाव एखाद्या सकारात्मक कारणामुळं चर्चेत आलं असेल तर लोकांसाठी ती अभिमानाची बाब बनत असते. कदाचित त्यामुळं चाहत्यांची जी गर्दी मुनव्वरच्या स्वागतासाठी डोंगरी भागामध्ये पाहायला मिळाली, ते एखाद्या हिरोच्या स्वागतापेक्षा कमी नव्हतं. मुनव्वरची एक झलक पाहण्यासाठी लोक रस्तेच काय पण घरांच्या छतावर, खिडक्यांमध्ये उभे होते.
 
'बिग बॉस' हा एक मोठा रियालिटी शो आहे ही प्रतिमा खरी आहे. पण तरीही बिग बॉसच्या एखाद्या विजेत्यासाठी अशाप्रकारची गर्दी जमल्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाला. पण असं का झालं? असं मुनव्वरसाठीच का घडलं? कदाचित याच प्रश्नांमुळं मुनव्वरचा विजय सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनला आहे. डोंगरी या परिसराच्या संदर्भात, येथील लोकांबाबत एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा तयार झालेली आहे. त्यातून बाहेर पडण्याच्या तळमळीतून तर हे झालेलं नाही?
 
डोंगरीमध्ये उसळलेल्या गर्दीनं हे सांगण्याचा प्रयत्न केला की, याठिकाणी मुनव्वर फारुकीही आहे. तो यशाचा आणि प्रसिद्धीचा एक नवा आदर्श प्रस्थापित करत आहे. म्हणूनच ही प्रचंड गर्दी डोंगरीच्या तरुणाईची तळमळ असू शकते. जर ही तळमळ चांगल्यासाठी असेल तर त्या तरुणांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करण्याचं काम व्हायला नको.
 
टीव्ही वाहिन्यांवर मुनव्वर फारुकीची चर्चा
काही टीव्ही चॅनलच्या बड्या अँकरना या विजयात आणि गर्दीत जे दिसत आहे, ते नक्कीच त्या तरुणाईचं मनोधैर्य खचवणारं आहे. या विजयालाही ते 'आपला धर्म विरुद्ध त्यांचा धर्म' किंवा 'हिंदू विरुद्ध मुस्लीम' या विखारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरवत आहेत.
 
याठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मुनव्वरच्या विजयामागं फक्त डोंगरीचे लोक असतील हे शक्य नाही. त्यामुळं जे लोक या विखारी चर्चेला खतपाणी घालत आहेत, ते अनेक प्रेक्षकांचं मत आणि आवड यालाही पिंजऱ्यात उभं करत आहेत. मुस्लीम व्यक्तीच्या विजयानं डोंगरीमध्ये कसा आनंद पसरला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. समाजातील लोक 'आपल्या विजेत्याला' कसं डोक्यावर घेत आहे, हे ते दाखवतायत.
 
हा हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा विजय आहे, असं ठासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या विजेत्याला 'त्यांचे लोक' याच दृष्टीनं पाहिलं जात असून ते स्वागत करत आहेत. पण, प्रश्न असा आहे की, फक्त डोंगरीमुळं विजय शक्य आहे का? तर नाही. त्यामुळं असे अँकर 'धर्मनिरपेक्ष' असलेल्यांवरही टीका करायला मागं-पुढं पाहत नाहीयेत. कारण त्यांनी मुनव्वर नावाच्या व्यक्तीला 'बिग बॉस'चा विजेता म्हणून निवडलं आहे.
 
अशा लोकांवर टीका करतात जे, 'त्यांच्या' धर्माचा 'अपमान' करणाऱ्यांचा सन्मान करतात किंवा अशा शोममध्ये विजयी बनवतात. कलाकाराच्या कामाकडं पाहण्याचा दृष्टीकोन आणि एखाद्या भाषणाकडं पाहण्याचा दृष्टीकोन एकच असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीकडं धार्मिक चष्म्यातून पाहिल्यानं सौहार्द निर्माण होऊ शकत नाही.
 
त्यामुळं आपली व्याप्ती आपोआप कमी होते. त्यामुळं मुनव्वरच्या विजयाकडं इतर विजयांच्या दृष्टीनं न पाहता 'धर्मयुद्ध' म्हणून पाहणं हे संकुचितपणाशिवाय दुसरं काहीही नाही. आपल्यासारख्या लोकप्रिय संस्कृतीमध्ये सामान्य नागरिकांचा असा वापर केल्यास मनं जोडली जाणार नाहीत तर विभागली जातील.
 
भारताची धर्मनिरपेक्षता
भारत मुनव्वर सारख्यांना नवी ओळख मिळवून देणारा धर्मनिरपेक्ष देश आहे यात काहीही दुमत नाही. भारताच्या या विशिष्ट ओळखीवर काही संकट तर आलं नाही, असा संशय गेल्या काही दिवसांत अनेकदा मनात येऊन गेला.
काही अशा घटना घडल्या ज्यामुळं असं वाटणंही चुकीचं नव्हतं. पण भारत जेवढा मोठा देश आहे, तेवढाच वैविध्यानं भरलेलाही आहे. तसं पाहता अनेकदा मुस्लिमांच्या एका मोठ्या गटाला पोरकेपणाची भावना मनात येत असते. कदाचित मुनव्वर फारुकीच्या विजयानं ती भावना काहीशी कमी होईल. प्रेमामुळं धर्माच्या भिंती तोडता येऊ शकतात हा विश्वास अधिक पक्का होत असेल. त्यामुळंच तर मुनव्वर जिंकू शकतो.
 
मुस्लिमांना जर त्यांच्यातून एखादा लोकप्रिय कलाकार समोर यावा असं वाटत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. साधारणपणे अल्पसंख्याक समुहांमध्ये अशी इच्छा असणं स्वाभाविक आहे. वेग-वेगळ्या अल्पसंख्याक समूहांमध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. मोठ्या नावाशी जोडल्या जाण्याच्या त्या समुहाच्या इच्छेचा आणि ओळखीचाही हा मुद्दा आहे.
 
ओळख दाखवण्याचाही मुद्दा आहे. अल्पसंख्याक समुदायाला त्यांचा आत्मविश्वास दाबण्याचं काम केलं जात आहे किंवा त्यांना दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना आहे, असं काही लोकाचं मत आहे. पण अशा परिस्थितीत मुनव्वरच्या विजयासारखी एखादी घटना त्यांना पुन्हा आत्मविश्वास देते आणि मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी मदत करते. आजच्या काळात मुस्लिमांमध्ये उत्साही अशा लोकप्रिय लोकांची कमतरचा आहे. एवढंच नाही तर मुनव्वर ज्या वर्गातून आलेला आहे, त्या वर्गातील लोकांच्या ओळखीचाही हा मुद्दा आहे.
 
एखाद्याची साधारण ते खास अशी ओळख बनण्याचा हा मुद्दा आहे. त्यामुळं याकडं फक्त एका चष्म्यातून पाहणं योग्य ठरणार नाही. मुनव्वरचा विजय त्यांना हीच ओळख तर मिळवून देत नाही. याच ओळखीचा परिणाम म्हणून आपण त्या गर्दीकडं पाहणं अधिक योग्य ठरेल.