शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (11:29 IST)

Nusrat Bharu 'बॉम्बच्या आवाजाने जाग आली, एखाद्या देशात युद्धात अडकण्याची कल्पनाही केली नव्हती'

Nusrat Bharu  हमासने इस्रायलवर 7 ऑक्टोबरपासून हल्ले करायला सुरुवात केली आणि इस्रायलने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. दोन्ही बाजूला लोक अनेक लोक मृत्यूमुखी पडताहेत. अनेक भारतीय तिथे अडकून पडले आहेत.
 
अभिनेत्री नुसरत भरुचासुद्धा या हल्ल्याच्या दिवशी तिथे होती आणि मोठ्या मुश्किलीने तिने आपली सुटका करून घेतली.
 
तिच्या या सुटकेचा थरार तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून मांडला आहे. जाणून घेऊ या तिचा 36 तासांचा प्रवास.
 
ती लिहिते, “गेला आठवडा माझ्या स्मृतीपटलावर कायमचा कोरला गेला आहे. भावनांचा तो हिंदोळा, ते 36 तास मी कधीही विसरू शकत नाही. 3 ऑक्टोबरला 'अकेली' चित्रपटाचे निर्माते, स्टायलिस्ट आणि मी इस्रायलमध्ये हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गेलो होतो. आमच्या चित्रपटाचं तिथे स्क्रिनिंग होतं.
 
माझे इस्रायलचे सहकलाकार त्साही हलेवी आणि अमीर बोट्रुस सुद्धा माझ्या बरोबर होते. दोन दिवस आम्ही तिथल्या सर्व प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. शुक्रवारी (6 ऑक्टोबर) रात्री आमच्या फिल्मचं तिथे स्क्रिनिंग झालं आणि त्याची पार्टी म्हणून आम्ही जेवायलाही गेलो होतो.
 
हैफा चित्रपट महोत्सवात आमचा चित्रपट निवडला गेला म्हणून आम्ही तो आनंद साजरा केला. एकमेकांना निरोप देऊन दुसऱ्या दिवशी परतण्याची आम्ही तयारी करत होतो.”
 
'बॉम्बचे आवाज, सायरनचा कर्कश आवाज यामुळे उठलो'
“मात्र शनिवारची सकाळ एकदम वेगळी होती. बॉम्बचे आवाज, सायरनचा कर्कश आवाज यामुळे आम्ही उठलो. जीव वाचवण्यासाठी आम्ही हॉटेलच्या छावणीत गेलो. तेव्हापासून वाट पाहण्याचा सिलसिला सुरू झाला. नंतर आम्हाला कळलं की इस्रायलवर हल्ला झाला आहे.
 
आम्ही प्रचंड हादरून गेलो. त्यावेळी पहिल्यांदा मनात विचार आला तो म्हणजे भारतीय दुतावासात जाण्याचा. आमच्या हॉटेलपासून अगदी 2 किमी अंतरावरच दुतावास होता. मात्र स्फोटांच्या आवाजात, वाहतुकीची कोणतीच साधनं उपलब्ध नसताना ते अंतर कापणं आमच्यासाठी अशक्य होतं."
 
नुसरत पुढे सांगते की, "नंतर आम्हाला कळलं की हमासचे कट्टरतावादी अनेक शहरात घुसले आहेत. आता आम्ही सुद्धा रस्त्यावर आलो होतो आणि लोकांना ओरडून ओरडून घराबाहेर काढत होतो. एवढंच काय तर रस्त्यावर आणि वाहनांवर गोळीबार होत होता आणि तिथली परिस्थिती अतिशय भीषण होती. नंतर काही मिनिटांनी सायरन बंद झाला आणि आम्ही पुन्हा बेसमेंट मध्ये गेलो.”
 
“आम्हाला लगेच लक्षात आलं की त्या दिवशीची रात्रीची फ्लाईट आम्हाला पकडता येणार नाही. त्या देशात युद्धाची परिस्थिती होती आणि आम्ही तिथे अडकण्याची दाट शक्यता होती. त्यानंतर आम्ही लोकांना फोनाफोनी करून मदत मागायला सुरुवात केली. त्साहीला आम्ही फोन केला. त्याने तिथल्या लष्करात काम केलं आहे. इस्रायलमध्ये आणीबाणी लागू झाली आहे आणि युद्ध सुरू झालं आहे हे आमच्या लक्षात आलं.”
 
'कोणत्याही क्षणी तेल अविवचं विमानतळ बंद होणार होतं'
“आम्ही सरकारच्या सूचनांवर लक्ष ठेवलं होतं. तसंच भारतीय आणि इस्रायलच्या दुतावासाशी सतत संपर्कात होतो. त्यांनी आम्हाला चांगली मदत केली. आम्हाला माहिती होतं की कोणत्याही क्षणी तेल अविवचं विमानतळ बंद होणार आहे. आमच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज होती आणि नेटवर्कही जात होतं. एखाद्या देशात युद्धात असं अडकण्याची कल्पना आमच्यापैकी कोणीच केली नव्हती.
 
मात्र त्याचवेळी आम्हाला अनपेक्षित मदत मिळाली. इस्रायलचे सहकलाकार, दुतावासातील लोक, हॉटेलमधील स्टाफ आणि एका टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला मदत केली. आम्ही पूर्ण धैर्य एकवटलं आणि कसंतरी एअरपोर्टला पोहोचलो. आपल्या देशात जाण्यासाठी जी फ्लाईट मिळेल ती घेण्याची आमची तयारी होती.”
 
“तेल अविव मधल्या हॉटेलपासून आमचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आम्ही सतत प्रार्थना करत होतो. अधूनमधून आम्हाला रडू येत होतं. एअरपोर्टला जाईपर्यंत आम्ही एकमेकांना भक्कम आधार दिला. विमानात बसेपर्यंतचा वेळ जाता जात नव्हता.
 
हा वेळ नेहमी कसा निघून जातो कळत नाही मात्र त्या दिवशी फक्त अनिश्चितता होती. विमानाची वेळ थोडीही पुढे गेली तरी आमच्या पोटात खड्डा पडत होता. बरीच वाट पाहिल्यानंतर आमचं विमान सुटलं.”
 
“आम्ही त्या दिवशी अगदी थोडक्यात वाचलो. मी घरी सुरक्षित आले आणि मी माझ्या कुटुंबियांबरोबर आहे. सुरक्षा हा मुद्दा आपण कायम गृहित धरतो. मी भारत सरकार, भारतीय दुतावास आणि इस्रायलच्या दुतावासाची मनापासून ऋणी आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सर्वांचे मी आभार मानते.”
 
नुसरतने हा अनुभव सांगणारा एक व्हीडिओसुद्धा केला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये अजूनही जोरदार युद्ध सुरू असून दोन्ही बाजूंच्या शेकडो लोकांनी जीव गमावला आहे.