शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. 'बोले' तो स्टार...
Written By वेबदुनिया|

लता मंगेशकरबद्दल 20 रोचक तथ्य

जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो अर्थातच लतादिदींचा. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लतादिदींचा आवाज आपल्याबरोबर असतो. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे जन्मलेल्या लता दिदी यांनी आज 90 वर्ष पूर्ण केले आहेत.

लता मंगेशकर हा एक चमत्कार आहे. त्यांना आवाजाची दैवी देण आहे. त्यांच्या मधुर आवाजातील अंगाई गीत ऐकून चिमुरडी झोपी जातात. तरूणांना त्यांच्या प्रीती गीतांची मोहिनी पडते. मध्यमवयीनांना त्यांचा काळ आठवतो आणि वृद्धांना त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती होतेय असे वाटते. लता नावाचा स्वर म्हणूनच अपार आणि अनंत आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत हा स्वर कायम राहील असे वाटते. लता दिदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या काही वेगळ्या बाबी खास तुमच्यासाठी.

लता दिदीचे गाणे हे ईश्वराच्या पूजेसारखे मानतात. म्हणूनच गाण्याचे रेकॉर्डींगसुद्धा त्या अनवाणीच करतात. तेथे चप्पल घालून त्या अजिबात जात नाहीत.

त्यांच्या वडीलांनी भेट म्हणून दिलेला तंबोरा त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे.

दिदींना छायाचित्रणाचाही छंद आहे. परदेशात त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरले होते.

खेळांमध्ये त्यांना सर्वात जास्त क्रिकेटचा खेळ आवडतो. भारताचा एखाद्या बलाढ्य संघाशी क्रिकेट सामना असेल तर त्या दिवशी सर्व कामे सोडून त्या सामना पाहतात.

कागदावर काहीही लिहिण्यापूर्वी त्या 'श्रीकृष्ण' असे नाव लिहूनच लिहिण्यास सुरवात करतात.

'आएगा आनेवाला' या गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी त्यांना बावीस वेळा रिटेक द्यावा लागला होता.

दिदींना जेवणात कोल्हापुरी मटण आणि मच्छी फ्राय खूप आवडते.

लिओ टॉलस्टॉय, खलिल जिब्रान या लेखकांचे साहित्य त्यांना खूप आवडते. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी आणि गीतादेखील त्यांना आवडते.
WD
कुंदनलाल सहगल आणि नूरजहाँ लता दीदीचे सर्वात जास्त आवडते गायक-गायिका आहेत. शास्त्रीय गायकांमध्ये पंडीत रवीशंकर, जसराज, भीमसेन जोशी, गुलाम अली आणि अली अकबर खान हे त्यांचे आवडते गायक आहेत. गुरूदत्त, सत्यजीत रे, यश चोप्रा, आणि बिमल रॉय यांचे चित्रपट त्यांना खूप आवडतात. रोज झोपण्यापूर्वी त्या देवाचे नामस्मरण करतात. दीपावली त्यांचा सर्वांत आवडता सण आहे.

1984 मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल आणि व्हिक्टोरीया हॉलमधील कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने संस्मरणीय आहे. कारण या कार्यक्रमासाठी जमलेल्या पाच हजारांच्या श्रोतृवृंदाने सलग दहा मिनिटे टाळ्या वाजविल्या होत्या.

भारतीय इतिहास आणि संस्कृतीतील कृष्ण, मीरा, विवेकानंद आणि अरविंद घोष या व्यक्तिमत्वांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.
पडोसन, गॉन विथ द विंड आणि टायटॅनिक हे चित्रपट त्यांच्या आवडीचे आहेत.

दुसर्‍यावर लगेच विश्वास ठेवणे हा त्यांच्या स्वभावाचा कमकुवत भाग आहे, असे त्यांना वाटते.

पहिल्यांदा स्टेजवर गाणे गायले, त्यावेळी त्यांना पंचवीस रूपये मिळाले होते. ती त्यांची पहिली कमाई होती. पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात त्यांना पहिल्यांदा तीनशे रूपये मिळाले होते.


WD
उस्ताद अमान खाँ भेंडी बाजारवाले आणि पंडीत नरेंद्र शर्मा यांना दिदी आपले संगीत गुरू मानतात. श्रीकृष्ण शर्मा त्यांचे आध्यात्मिक गुरू होते. महाशिवरात्र, श्रावणी सोमवाराशिवाय त्या गुरूवारीही उपास करतात. लता दिदींनी आपले पहिले चित्रपट गीत 1942 मध्ये 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी गायले होते. पण काही कारणास्तव हे गाणे चित्रपटात नव्हते. त्यानंतर 1942 मध्ये 'पहिली मंगळागौर' या मराठी चित्रपटात त्यांचा आवाज प्रथमच ऐकायला मिळाला.

1947 मध्ये 'आपकी सेवा' या हिंदी चित्रपटात दिंदीनी पहिल्यांदा हिंदी गाणे गायले. 'पा लागू कर जोरी रे' हे त्या गाण्याचे बोल होते. लता दिदींनी पहिल्यांदा नायिका मुन्वर सुलतानासाठी पार्श्वगायन केले.

लता दीदीने इंग्रजी, आसामी, बांग्लादेशी, ब्रजभाषा, डोगरी, भोजपुरी, कोंकणी, कन्नड़, मगधी, मैथिली, मणिपुरी, मल्याळम, सिंधी, तामिळ, तेलगु, उर्दू, मराठी, नेपाळी, उडीया, पंजाबी, संस्कृत, सिंहली आदी भाषांमध्ये गाणे गायले आहेत. दीदी मराठी भाषिक आहेत परंतु त्या हिंदी, बांग्लादेशी, तामिळ, संस्कृत, गुजराती आणि पंजाबी भाषेतही गातात. अभिनेत्रीच्या रूपात त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. हिंदीतील बडी माँ, जीवन यात्रा, सुभद्रा, छत्रपती शिवाजी या चित्रपटात काम केले आहे.

गायिका-अभिनेत्रीबरोबर दीदीने चित्रपटाला संगीत देण्याचे कामही केले. अधिकतर मराठी चित्रपटात त्यांनी आनंदघन नावाने संगीत दिले आहे. चित्रपट निर्माता म्हणूनही काम केले. त्यांनी 'लेकीन', 'बादल', आणि 'कांचनगंगा' या चित्रपटाची निर्मिती केली.

WD
आजा रे परदेशी (मधुमती: 1958), कही दीप जले कही दिल (बीस साल बाद: 1962), तुम ही मेरे मंदिर (खानदान: 1965) आणि आप मुझे अच्छे लगने लगे (जीने की राह: 1969) या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेयर पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांनी हा पुरस्कार स्वीकारणे बंद केले कारण हा पुरस्कार नवीन गायिकांना मिळावा असे त्यांना वाटत होते.

परिचय (1972), कोरा कागज (1974) आणि लेकीन (1990) साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 1951 साली लता दीदीने सर्वाधिक 225 गाणे गायले होते. पुरुष गायकांपैकी मोहम्मद रफीबरोबर त्यांनी सर्वाधिक 440 युगल गीत, किशोर कुमारबरोबर 327 गीत गायन केले. महिला युगल गीते त्यांनी सर्वात जास्त आशा भोसलेबरोबर गायिले.

लक्ष्मीकांत प्यारेलाल 686, शंकर-जयकिशन 453, आर. डी. बर्मन 343 आणि कल्याणजी-आनंदजी यासाठी लता दीदीने 303 गाणे गायिले.
गीतकारांमध्ये आनंद बक्षीद्वारा लिहलेले 700 पेक्षाही अधिक गीत त्यांनी गायिले.