मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By

‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ आता ईबुक स्वरुपात

जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अभ्यासक किशोरकुमार काशिनाथ कांबळे यांनी डिसेंबर २००९ मध्ये पीएच. डी. (मराठी) पदवीसाठी सादर केलेला व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त झालेला शोध प्रबंध ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ लवकरच ईबुक स्वरुपात कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर मार्फत प्रसिद्ध होत आहे. ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनास देवचंद कॉलेज, अर्जुननगरचे प्रपाठक डॉ. अच्युत माने यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर संशोधनातील सहा प्रकरणात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे...
 
प्रकरण पहिले - प्राचीन मुस्लीम कवींची काव्य परंपरा: प्रास्ताविक, मुस्लिमांचे भारतात आगमन, भारतात इस्लाम धर्माचा स्वीकार, पार्श्वभूमी, मुस्लीम मराठी संतांचा उदय, मुस्लीम मराठी संत, मुस्लीम मराठी शाहीर, आणि निष्कर्ष.  
 
प्रकरण दुसरे - आधुनिक मुस्लीम कवींच्या मराठी कवितेचा उदय, विकास, स्वरूप व प्रेरणा: प्रास्ताविक, मुस्लीम साहित्याची पार्श्वभूमी, मुस्लीम साहित्य संकल्पना, मुस्लीम साहित्य व्याख्या, मुस्लीम साहित्याच्या प्रेरणा, मुस्लीम साहित्य प्रवाह, मुस्लीम कवितेचे स्वरूप आणि निष्कर्ष. 
 
प्रकरण तिसरे - मुस्लीम मराठी कवितेचा आशय: प्रास्ताविक, सामाजिक आशय, धार्मिक - सांस्कृतिक आशय, राजकीय आशय, आर्थिक आशय, राष्ट्रीय एकात्मता, प्रबोधन, मानवतावाद आणि निष्कर्ष.
 
प्रकरण चौथे - मुस्लीम मराठी कवितेतील सांस्कृतिक संघर्ष: प्रास्ताविक, धर्मांतर, जातीयता, मूलतत्त्ववाद, उपरेपणाचं दु:ख, राष्ट्रनिष्ठा, मुस्लीम पुढा-यांचे राजकारण, मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न, आणि निष्कर्ष.
 
प्रकरण पाचवे - मुस्लीम मराठी कवितेचे वाङमयीन मूल्यमापन: प्रास्ताविक, कवितासंग्रहांची शीर्षके, कवितासंग्रहांची अर्पणपत्रिका, मुक्तछंदात्मक रचना, संवादात्मक, भाषा, प्रतिमा - प्रतीके, गझलेचा रचनाबंध, गझलेतील विषय.
 
प्रकरण सहावे - उपसंहार  
डॉ. किशोरकुमार कांबळे यांच्या ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनात उपरोक्त बाबींचा समावेश आहे. जवळपास ७५० - ८०० पृष्ठांचा हा समिक्षा / संदर्भग्रंथ कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ईबुक स्वरूपात प्रसिध्द होत आहे. मुस्लिम मराठी कवींचे छायाचित्र / फोटो व त्यांच्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सदर ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प्रसिध्द करण्याचा विचार आहे. त्यासाठी मुस्लिम कवींना आवाहान करण्यात येते की, त्यांनी आपले छायाचित्र/पासपोर्ट आयडेंटीसाईज फोटो, आपला साहित्यिक परिचय व कवितासंग्रह / कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ पाठवून सहकार्य करावे. मराठी साहित्य आणि संस्कृती समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त असलेला सदर ग्रंथ इंटरनेटच्या माध्यमातून जगभर वाचला जाणार आहे.