शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (14:33 IST)

शुद्ध विचार निर्माण करणारे एक मौल्यवान पुस्तक

भुक्तिमात्र प्रदाने तु का परीक्षा तपस्वीनाम् |
ते सन्त: सन्त्वसन्तो वा गृही दानेन शुद्ध्यति ||
 
- श्री सोमदेव सुरी 
 
अलीकडे तपस्वी हा खरा तपस्वी एवं आहार देण्या योग्य आहे की नाही ह्याची गृहस्थी अगदी कसून चौकशी करू इच्छितात, हे किती योग्य आहे? 
 
सर्व ऐहिक सुखसामुग्रीचा व घरादाराचा त्याग करून महाव्रते आचरणा-या ह्या मुनींना केवळ एक वेळचा आहार देण्याचाच काय तो प्रश्न आणि त्यासाठी केवढी ही चिकित्सा?
 
शुद्ध आहार देणे हे महत्वाचे व आपले परम कर्तव्य नव्हे काय? घरी आलेल्या अतिथीला नवधा भक्तीपूर्वक आहार देणे म्हणजे गृहस्थी, हा आपल्या दान वृत्तीने आणि भक्तीने शुद्ध होणारच.
 
आचार्यकल्प पंडित आशाधरजी आज्ञापितात - ज्याप्रमाणे पाषाण मूर्तीत पूर्व तीर्थंकराची आज स्थापना करून आपण त्यांची भक्तिभावे पूजा करतो त्याप्रमाणे या काळातील मुनिजनात पूर्वाचार्यांची कल्पना करून त्यांचीही यथायोग्य सेवा करणे हे गृहस्थी श्रावकाचे आद्य कर्तव्य आहे. उभयपक्षी प्रमाद न व्हावा.
 
धर्म पुरुषांचा योग्य तो मान राखणे, त्यांची सेवा सुश्रुषा निरलसपणे करणे, त्यांच्या आहाराविहाराची योग्य दखल घेणे व त्यांच्या ज्ञानाभ्यासाची सोय करून देणे हे आपले अगत्याचे कर्तव्य आहे. 
 
‘शुद्ध आहार - शुद्ध विचार’ या संदर्भ ग्रंथातून पूजा विधी, श्रावकाची दैनंदिनी, आचरण, तसेच मुनी, आर्यिका, ऐलक, शुल्लक यांच्या शुद्ध आहाराची शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्था कशी करावी याचे अत्यंत सुक्ष्म वर्णन केले आहे. आज तरुण मुला मुलींसाठी या सर्व आचरणाची, क्रियांची एकत्रित माहिती यातून संकलित केलेली आहे. दानाचे प्रकार कथारूपाने, मुनी आहारासंबंधीचे दोष, तसेच सुतक - पातक यांचे शास्त्रीय विश्लेषण आणि शेवटी दुर्लभ मनुष्य जन्माचे कसे कल्याण करावे ह्याचे अतिशय सुंदर वर्णन काव्यातून, गुरुभक्ती, आहारानंतरचे भजन या सर्व अत्यावश्यक बाबींचे अत्यंत उपयुक्त असे वर्णन यातून आले आहे. 
 
‘शुद्ध आहार - शुद्ध विचार’ या पुस्तकात अनेक ग्रंथांचे अवलोकन करून अगदी सोप्या आणि सूत्रबद्ध रचनांचे संकलन परम पूज्य १०८ श्री पावनसागरजी महाराज यांनी परम पूज्य १०८ आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परम शिष्य परम पूज्य अमितसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रकाशित करून श्रावक बंधू - भगिनींना शुद्ध आहार - विचारांचे महत्व पटवून दिले आहे. 
 
गावागावातून, पाठशाळेतून बालबोध, रत्नकरंडक या ग्रंथासोबतच आहार पध्दती, श्रावक व मुनिचर्या याबद्दलचे प्रशिक्षण बालपणीच दिले जावे. दान - धर्म - आचरण, चारित्र्य संवर्धन, याचा तसेच त्यागी मुनींचे वैयावृत्य, देवदर्शन यांचे योग्य मार्गदर्शन झाल्यास नक्कीच राष्ट्र निर्माण, मानवता, अहिंसा याचे संवर्धन होत राहील. संतसंगाने ह्या गोष्टी होत राहतील या उदात्त भावनेने या ग्रंथाचे लेखन आणि श्रेष्ठत्व अनन्य आहे. प्रत्येक श्रावक श्राविकांनी आपल्या संग्रही हे पुस्तक ठेवावे व इतरांनाही वाचनास प्रवृत्त करावे. 
 
जल की शोभा कमल है, दल की शोभा पील |
धनकी शोभा धर्म है, कुलकी शोभा शील ||
 
कमलपुष्पांनी सरोवर शोभते, सैन्य हत्तींनी शोभते.
धनवान दानधर्माने शोभतो, कुलीनता ही शीलाने शोभते.
शीलसंपन्नता हेच मानवजीवनाचे सार्थक सर्वस्व समजावे. 
 
ग्रंथ पंथ सब जगतके बात बताये तीन |
ब्रह्महृदय, मन मे दया, तन सेवामे लीन ||
 
भावार्थ - विश्वातील सर्व धर्माच्या किंवा पंथाच्या तत्त्वज्ञानाचा साररूपाने निष्कर्ष काढायचा ठरवले तर तीन निर्विवाद सत्ये त्यातून बाहेर येतात. 
 
•        आत्मा आत्म्यात लीन असावा.
•        अंत:करणात दयाभाव असावा. 
•        शरीर इतरांच्या सेवेकारणी लागावा.     
 
देशकालपरत्वे पृथ्वीच्या पाठीवर अनेक महापुरुष निर्माण झाले स्वपरकल्याणाचा मार्ग त्यांनी अपरंपार तपश्चर्या व चिंतन करून हे तीन मार्ग निश्चत केले ते आपल्या मुक्तीसाठी, सुखासाठी व कल्याणासाठी तीन सर्वसामान्य तत्वे आहेत त्यातील पहिले आत्मा आत्म्यात लीन असावा - आत्म्याचे अस्तित्व सर्वांनाच मान्य आहे. तो बद्ध, अशुद्ध आणि बहिर्मुख आहे हे ही मान्य आहे. तर तो मुक्ततेप्रत (मोक्षास) नेतांना शुद्ध आणि अंतर्मुख केला पाहिजे हे एक विश्वसत्य सिद्ध झाले यात दुमत नाही. 
 
दुसरे विश्वसत्य म्हणजे अंतकरणातील दयेचे अधिष्ठान - जसा आपला जीव तसाच इतरांचा. आपण आज सुखी किंवा दु:खी असू पण आपणापेक्षाही अधिक दु:खी, दरिद्री, पीडीत, अज्ञानी आणि निकृष्ट असे अनेक जीव आपणास दिसतात. त्यांच्याबद्दल अंत:करणात दयाभाव ठेवावा मग तुमचा धर्म, पंथ, देश कोणता का असेना.
 
तिसरे विश्वसत्य - मानव जन्म अत्यंत दुर्लभ असून फार मोठे पुण्याचे मोल देऊन प्राप्त झालेला आहे. म्हणून ही दुर्लभ काया इतर गरजू जीवांच्या सेवेसाठी कारणी लावावी. जे हीन, दीन व्याधिजर्जर, जरा पीडीत, अंध, अपंग जीव आहेत केवळ मानवच नव्हे तर पशु - पक्षी कीटक या सर्वांची सेवा करावी, आपले शरीर त्यांच्या कारणी झिजू द्या. ते अज्ञानी असतील तर त्यांना ज्ञानदान करा. हीच मानवता आहे. ज्या महापुरुषांनी ही तीन विश्वसत्ये धर्मतत्त्वसाररूप आपल्या समोर ठेवली आहेत ती सर्वांना निरपेक्षतेने स्वीकारावी अशीच आहेत. 
 
या ग्रंथाचे महत्व लक्षात घेऊन सर्व मानवजातीला याचा परिचय व्हावा म्हणून डॉ. सुनील दादा पाटील यांनी कवितासागर प्रकाशनाच्या माध्यमातून सर्वविश्वात या ग्रंथाचे वाचन, चिंतन - मनन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना या सत्कार्यासाठी परम पूज्य अमितसागरजी महाराजांचे मंगल आशीर्वाद लाभले असून ते लवकरच या धर्मकार्यात यशस्वी होतील ह्या सदिच्छा!
 
 
- प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य 
संपर्क - ९७६६५८१३५३