मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : गुरूवार, 4 मे 2017 (12:46 IST)

मराठी काव्यक्षेत्रातील मैलाचा दगड - भारतीय संस्कृती

माणूस म्हणून जगण्यासाठी माणसासारखे वागावे लागते
स्वतःचे अस्तित्व विसरून दुस-यांसाठी जगावे लागते
 
असे तत्त्वज्ञान शिकवणा-या भारतीय संस्कृतीचे वर्णन अनेक थोर महात्मे, साधू, संत, सज्जन, कवी, लेखक यांनी अनेकदा केले आहे व अजूनही करतच आहेत. पण भारतीय संस्कृतीचा इतिहास काव्यरुपात मांडण्याचे धाडस करणा-या कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच कारण आभाळाएवढा विषय लीलया पेलून एक दीर्घकाव्य लिहिणे तेही अगदी थोड्याच कालावधीत हे सर्व सामान्य काम नव्हे.
 
संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘त्याला पाहिजे जातीचे - येरा गबाळ्याचे काम नव्हे!’ खरोखरच उच्च कोटीची प्रतिभा शक्ती ठासून भरलेल्या कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांनी विक्रमी काव्य लिहून साहित्य शारदेची जी सेवा केली आहे त्याला तोड नाही. कवी यशेंद्र यांच्या ठायी नावाप्रमाणेच सागराची विशालता व शीर म्हणजेच दुधाची सात्विकता भरलेली आहे. म्हणून साहित्य क्षेत्रातील अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करत ते देवेंद्राप्रमाणे झळकत आहेत. भारतीय संस्कृतीला ‘जगात तोड नाही’ परंतु आजकाल पाश्चात्य संस्कृतीच्या नादी लागून भारतीय माणसे बहकत चालली आहेत.  
 
‘खाओ पिओ मौज करो, हॉटेलमें रहो
और हॉस्पिटल में मरो’
 
अशी अवस्था आज आमची झाली आहे. पण भारतीय संस्कृती सांगते -
 
‘जिओ और जिने दो, अच्छे बनकर माँ बाप की सेवा करो, और साधू बनकर समाधी से मरो’
 
याच आपल्या उच्च, उदात्त, सर्वगुणसंपन्न आणि सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीचे वर्णन करतांना कवी यशेंद्र म्हणतात,
 
‘आमच्या संस्कृतीची शिकवण ध्यानी घेतला तो निवांत झाला
अन् भव्य मानवतेच्या आश्रयाला मग अलगद आला’
 
जगातील अनेक लोक या भारतात आश्रयाला आले व येथेच स्थिरस्थावर झाले. सर्वांना सामावून घेणारी ही भारतीय संस्कृती संवर्धन करण्याचे कार्य येथील ऋषी, मुनी, साधू, संत, महंत व महापुरुषांनी केले आहे. संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला व ‘हे विश्वचि माझे घर’ असे सांगून अवघ्या विश्वासाठी ‘पसायदान’ मागितले. म्हणून कवी यशेंद्र म्हणतात -    
 
‘हे विश्वचि माझे घर, ज्ञानदेव सांगून गेले
संकुचित हे जगणे, तयांनी विश्वरूप केले’ 
 
असे असले तरी आजही काही माणसे संकुचितपणे वागतात.
  
‘आपलीच गाडी - आपलीच माडी
आणि आपल्याच संसाराची लाडी गोडी’
 
ह्यातच व्यस्त राहतात. ‘आम्ही दोन - आमचे दोन आणि आमचाच एक बंदिस्त चौकोन’ या वृत्तीने वागणा-या आणि क्षणिक सुखासाठी अन्यायी मार्ग स्वीकारून आपल्या माता - पित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणा-या भरकटलेल्या तरुण पिढीला भानावर आणण्यासाठी आपली ‘भारतीय संस्कृती’ समर्थ आहे व ते कार्य कवी यशेंद्र हे आपल्या काव्य लेखनाद्वारे करीत आहेत. हरवत चाललेली मानवता - माणुसकी यांचे पुनर्जीवन करण्याचे कार्य ‘भारतीय संस्कृती’ या दीर्घकाव्याद्वारे कवी करत आहेत. ते म्हणतात - 
 
‘प्रत्येक धर्माचा सत्कार येथे, स्पृश्य - अस्पृश्य भाव नाही
माणूस हा ‘माणूस’च असतो, कुणी रंक आणि राव नाही
सूर्य प्रकाश देतो तेव्हा, घर कुणाचे? पाहत नाही
महाल - झोपडी, घर, रस्ता; समभावनेने जग उजळून जाई.’ 
 
कवी यशेंद्र क्षीरसागर यांनी महासागराएवढा विशाल, विस्तृत व अथांग असलेल्या ‘भारतीय संस्कृती’ची महती साध्या - सरळ व सोप्या भाषेत आपल्या काव्याद्वारे वर्णन करून एक दिव्य कार्य केले आहे. त्याला साथ देणारे ‘कवितासागर’चे संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांच्याही कल्पना शक्तीला दाद द्यावीशी वाटते. आज काळाची गरज बनलेल्या या भारतीय संस्कृतीला काव्यबद्ध करणारे कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांच्या काव्यप्रतिभेला सलाम व त्यांच्या भावी लेखणीस मन:पूर्वक शुभेच्छा! 
 
कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांना विक्रमवीर म्हटल्यास वावगे ठरू नये त्याचे कारण असे आहे की, त्यांनी सलग २५ तास अध्यापनाचा विश्वविक्रम केला असून या विक्रमाची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये नोंद झाली आहे. एका तासात ऐनवेळी दिलेल्या विषयांवर २५ कविता लिहिण्याचा विक्रम केला असून त्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद झाली आहे. या दोन विक्रमांच्या नंतर ‘भारतीय संस्कृती’ या विषयावर दीर्घकविता (सर्वात मोठी) लिहिण्याचा तिसरा विक्रम त्यांच्या नावावर लवकरच ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्डस्’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ अशा तीन रेकॉर्डस् बुक मध्ये नोंद होत असून कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात रेकॉर्डस् बुक्स मध्ये स्थान मिळवणारे कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर हे एकमेव मराठी कवी असावेत असे मला वाटते. 
 
‘भारतीय संस्कृती’ या विषयांवरील ही दीर्घकविता (सर्वात मोठी) खरोखरच एक मैलाचा दगड ठरणार यात तिळमात्र शंका नाही. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि लेखक - कवी हे ‘भारतीय संस्कृती’ ही दीर्घकविता आपल्या संग्रही ठेवतील आणि आपल्या ‘भारतीय संस्कृतीचा’ महिमा व मोठेपणा याचा अभ्यास करतील असा मला विश्वास वाटतो. पुनश्चः एकदा कवी यशेंद्र क्षीरसागर  व प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांना हार्दिक शुभेच्छा! 
 
- डॉ. कुमार रामगोंडा पाटील