गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (15:56 IST)

श्री सर्वोत्तम दिवाळी अंक... साहित्याची मेजवानी

मराठी माणसासाठी दिवाळी विशेषांक म्हणजे साहित्याची मेजवानी. खरे तर दिवाळी विशेषांक वाचकाची वैचारिक प्रगल्भता देखील वाढवते. बृहन्महाराष्ट्रातील मध्यप्रदेशच्या माळव्यातील एकमेव मराठी ' श्री
सर्वोत्तम ' मासिक गेल्या २३ वर्षांपासून प्रसिद्ध होत आहे. ' श्री सर्वोत्तम 'चे दिवाळी विशेषांक त्यात असलेल्या आपल्या विविध साहित्य सामग्री मुळे सतत समृद्ध होत असून वाचकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढत
आहे.
 
महाराष्ट्रात अनेक पुरस्कार प्राप्त ' श्री सर्वोत्तम ' चा दिवाळी विशेषांक-२०२३ हा नुकताच प्रसिद्ध झाला असून, सारंग क्षीरसागर द्वारा निर्मित सुंदर रंगीन मुखपृष्ठ विशेषांकाचे आकर्षण वाढवून वाचनाची उत्सुकता देखील वाढवते. संपादक श्री अश्विन खरे, कार्यकारी संपादक श्री अरविंद जवळेकर आणि विशेषांक संपादक जयश्रीताई तराणेकर व यांच्या संपूर्ण टीमचे कौशल्य अंक हाती घेतल्यानंतर च कळते. ललित लेख, कथा, कविता, व्यक्ती रेखा, भटकंती, वार्षिक भविष्य, कार्यक्रमांचे वृत्तांत इत्यादी विविध रंगांने नटला-सजलेला हा विशेषांक विविध श्रेष्ठ साहित्य निर्मिती बरोबर वाचकांची गरज भागविण्यात देखील यशस्वी ठरत आहे असे म्हणावे लागेल.
 
या दिवाळी विशेषांकात एकूण २३ ललित लेख, २२ कथा, ०६ प्रवास वर्णन, ०९ व्यक्ति चित्र, ०४ व्यक्ति विशेष भावांजली, ०२ संमेलन वृत्तांत, ६२ कविता, पुस्तकाचे रसग्रहण, वार्षिक राशी भविष्य, आणि रेखाटने असे एकूण १४० पेक्षा जास्त रचनाकारांना स्थान मिळालेले आहेत. या अप्रतिम अशा दिवाळी अंकात ८५ टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रातील साहित्यिक आहे.
 
महाराष्ट्रात, बृहन्महाराष्ट्रातील साहित्यकांची सदैव उपेक्षा केली जात असेल पण या अंकात महाराष्ट्रातील साहित्यिकांना मिळालेले स्थान बघता अंकाचे कौतुक करावेसे वाटते आणि  हे पटते  देखील की भाषेला भूगोल नसतो.
 
ललित लेखांमध्ये, दिल्लीच्या प्रशांत पोळ यांचा ' सूड पानिपतचा ' हा लेख पानिपत युद्धानंतर झालेल्या घडामोडी बद्धल माहिती देतो तर इंदूरच्या संत साहित्याचे अभ्यासक, डॉ. मोहन बांडे यांचा ' ग्रंथरूप संत ' हा लेख संत साहित्याची ओळख करवितो. मुंबईच्या अनुराधा नेरुरकर यांचा लेख ' पर्यटन आणि संस्कृती ' वाढत असलेल्या पर्यटनाच्या ओढी मुळे देशात बदलत असलेल्या पर्यटन संस्कृतीची ओळख करवितो.
 
भोपाळच्या अनिल निगुडकर यांचा लेख ' मराठी साहित्यातील प्रादेशिक कादंबऱ्या ' हा अभ्यासकांना नक्कीच महत्वाचा वाटेल. इतर १९ लेखांमध्ये, कविता, सनातन धर्म, अन्नाचे महत्व, कोरोना महामारी, मित्रत्व,सोशल मीडिया आणि हास्य सारखे सार्थक लेख आपण वाचू शकतो.
 
प्रवास वर्णन या खंडात आपण ' तीर्थक्षेत्र माळगुंदे ', पृथ्वीवरील स्वर्ग समजले जाणारे ' हरिश्चंद्रगड ' , वीर जवानांचे गाव ' टाकळी ' मध्यप्रदेशची राजधानी ' भोपाळ ' आणि कर्नाटकचे ऐतिहासिक क्षेत्र ' हम्पी
' ची भटकंती करू शकतो. इंदूरच्या डॉ.अस्मिता हवालदार या ' हम्पी ' वर व्याख्यान देखील देतात आणि आपल्या व्याख्यानाने हम्पीच्या वेळेस च्या पुरातन काळाला जिवंत देखील करतात. म्हणून त्यांचा हा लेख वाचण्या सारखा आहे.
 
नाना महाराज तराणेकर संस्थान, इंदूरचे डॉ. बाबासाहेब तराणेकर यांचा ' बिन सद्गुरू नर रहत भुलाना ' हा पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत लिहिलेला अप्रतिम असा लेख आहे. महान गायक पंडित कुमार गंधर्व यांचा त्यांच्या कुटुंबाशी असलेला संबंध आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या अनेक भेटींचा उल्लेख करत लिहिलेला भावनिक लेखा मुळे आपल्याला महान व्यक्तिमत्वाचे महत्व  नव्याने  कळते.लेख वाचताना आपण प्रभावीत तर  होतोच पण भावनिक देखील होतो.
कथा खंडात आणि कविता खंडात देखील अनेक विषय कवी आणि कथाकारांनी हाताळले आहेत. याच प्रमाणे लिवा साहित्य सेवा समिती, इंदूर आणि श्री सर्वोत्तम द्वारे संयुक्त रूपाने इंदूर मध्ये आयोजित आणि गेल्या ०५-०६ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न अद्भुत असे ' भारतातील प्रथम नर्मदा परिक्रमा वासी अखिल भारतीय संमेलन ' चे वृत्तांत आपल्याला भारतातच नव्हे तर जगात नद्यांचे महत्व पटवून देते. श्री सर्वोत्तमच्या दिवाळी विशेषांकात या शिवाय देखील इतर बरेच आकर्षण आहेत. पण वाचकांची उत्सुकता कमी करण्याचा माझा मानस नाही. म्हणून एकच आवर्जून सांगतो प्रत्येकाने अवश्य वाचावा असा हा श्री सर्वोत्तम चा दिवाळी विशेषांक आहेत.
 
एकूण पृष्ठ - २८४  विशेषांक मूल्य ३५०/-
gpay साठी  ९४२५०५६४३२
 
विश्वनाथ शिरढोणकर, इंदूर. म.प्र.