अर्थसंकल्पीय अधिवेशनावर पुन्हा नोटबंदीचे सावट
अर्थसंकल्पाच्या वेळेवरची विरोधकांचा आक्षेप
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून लगेच दुसर्या दिवशी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होत आहे. यावेळी रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नसल्याने एकाच अर्थसंकल्पात दोन्ही प्रस्ताव
असतील.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाप्रमाणे विरोधकांनी यावेळीही नोटबंदीच्या मुद्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली असून पाच राज्यांच्या निवडणुकांआधी अर्थसंकल्प सादर करण्याबाबतचे आक्षेपही विरोधक नोंदविणार आहेत.
माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी तर अधिवेशनाचे दोन दिवस नोटबंदीवर चर्चा व्हायला हवी अशी मागणी सरकारकडे केली आहे. देशभरातील जनतेवर या नोटबंदीचा काय परिणाम व प्रभाव पडला यावर साधक बाधक चर्चा व्हावी व यासाठी किमान दोन दिवस अधिवेशनात राखून ठेवायला हवेत, असेही येचुरी यांनी सरकारला सुचविले आहे. या शिवाय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर केल्यास तिमाहीच्या अर्थविषयक आकडेवारीचा विचारही यामध्ये करता येणार नसल्याचे येचुरी यांचे म्हणणे आहे. ही माहिती साधारणपणे फ्रेब्रुवारीच्या मध्यकाळात येते असेही ते म्हणाले.